आंबीखालसा फाटा येथील दोन मोबाईल शॉपी फोडल्या एकाचे मोबाइल साहित्य तर दुसर्याचा डीव्हीआर चोरला
नायक वृत्तसेवा, घारगाव
संगमनेर तालुक्याच्या पठारभागातील आंबीखालसा फाटा येथील राजेंद्र गाडेकर यांच्या मोबाईल शॉपीचा पत्रा उचकटून चोरट्यांनी मोबाइल साहित्य तर महेश सातपुते यांच्याही मोबाईल शॉपीचा पत्रा उचकटून डीव्हीआर चोरून पोबारा केला आहे. त्यामुळे वारंवार होणार्या चोर्यांमुळे मोबाइल व्यावसायिकांसह व्यापारी संतप्त झाले आहेत.
याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी की, आंबीखालसा फाटा येथे राजेंद्र गाडेकर यांचे सद्गुरू मोबाईल शॉप आहे. नेहमीप्रमाणे ते गुरुवारी (ता.24) संध्याकाळी मोबाइल शॉपी बंद करून घरी गेले होते. अज्ञात चोरट्यांनी दुकानाच्या पाठीमागून शिडी लावून वर चढले आणि पत्रा उचकाटून आत प्रवेश केला. त्यानंतर आतमधील मोबाइल साहित्य चोरून पोबारा केला. याचबरोबर आंबीखालसा परिसरातीलच प्रभाकरनगर येथील महेश सातपुते यांच्याही मोबाइल शॉपीचा पत्रा उचकटून चोरट्यांनी आत प्रवेश केला. मात्र सातपुते यांनी दुकानातील मोबाइलसह इतर साहित्य घरी नेले होते. त्यामुळे चोरट्यांचा डाव फसला. परंतु, आपण सीसीटीव्ही कॅमेर्यात कैद होवू नये म्हणून चोरट्यांनी डीव्हीआर चोरून नेला आहे.
दरम्यान, पठारभागात वाहन चोरीचे सत्र सुरू असण्याबरोबरच दुकान फोडी सुरू झाल्याने घारगाव पोलिसांनी रात्रीची गस्त वाढवावी आणि चोरट्यांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी मोबाइल व्यावसायिकांसह व्यापार्यांनी केली आहे. परंतु, गेल्या काही दिवसांपासून चोरट्यांवर नियंत्रण मिळविण्यात घारगाव पोलिसांना अपयश आल्याने नागरिकांत संतापाचे वातावरण आहे.
आत्तापर्यंत अज्ञात चोरट्यांनी माझी मोबाइल शॉपी जवळपास सहा ते सातवेळा फोडली आहे. प्रत्येकवेळी मी गुन्हाही दाखल केला आहे. आता पुन्हा चोरट्यांनी मोबाइल शॉपी फोडली आहे. वारंवार मोबाइल शॉपी फोडली जात असताना चोरट्यांचा मात्र काही तपास लागत नाहीये.
– राजेंद्र गाडेकर (मोबाइल दुकानदार)