सुगाव फाटा येथे 10 ते 12 एकर ऊस आगीत खाक

नायक वृत्तसेवा, अकोले
उसाला अचानक लागलेल्या आगीत सुमारे 10 ते 12 एकर ऊस जळून खाक झाल्याची घटना अकोले तालुक्यातील सुगाव फाटा परिसरात नुकतीच घडली आहे.

दुपारच्या वेळी लागलेल्या आगीत वार्‍याचा जोर आणि ज्वाला एवढ्या मोठ्या होत्या की जवळच असलेल्या वेगवेगळ्या शेतकर्‍यांचा दहा ते बारा एकर जळून गेला आहे. ही आग लागल्याचे निदर्शनास येताच अगस्ति सहकारी साखर कारखान्याच्या अग्निशामक बंबास पाचारण करण्यात आले. त्यानंतर ही आग विझविण्याचा प्रयत्न केला. मात्र तोपर्यंत खूप उशीर झाला होता. यातील काही एकर ऊस हा तोडणीच्या प्रतीक्षेत होता तर काही सहा महिन्यांचा होता. यामुळे नुकसानग्रस्त शेतकरी हवालदिल झाले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार या ऊस जळीतामध्ये विराज रामनाथ शिंदे, सुनील गंगाधर देशमुख, रमेश गंगाधर देशमुख, अशोक त्र्यंबक देशमुख, नारायण शांताराम देशमुख, नितेश तान्हाजी देशमुख, विजय पंढरीनाथ देशमुख, विलास निवृत्ती देशमुख आदी शेतकर्‍यांचे नुकसान झाले आहे. या आगीची झळ उसाच्या शेताला लागूनच असलेल्या चारा व कांदा पिकालाही बसली आहे. दरम्यान, ही आग नेमकी कशामुळे लागली याचे कारण मात्र समजू शकले नाही. आग एवढी प्रचंड होती की डोळ्यादेखत ऊस जळत असताना केवळ त्याकडे हातबल होऊन पाहण्यापलीकडे शेतकर्‍यांच्या हाती काहीच राहिले नव्हते.

Visits: 148 Today: 2 Total: 1106084

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *