संगमनेरच्या सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा बोजवारा! शहरात पोलिसांचे अस्तित्वच जाणवेना; बेशिस्त वाहन चालकांकडून सिग्नलचाही फज्जा..


नायक वृत्तसेवा, संगमनेर
राष्ट्रीय आणि राज्य महामार्गावरील प्रचंड वाहतुकीसह शहरातंर्गत वाढलेली प्रचंड रहदारी, नियोजनाच्या अभावाने अरुंद होत गेलेले अंतर्गत रस्ते आणि त्यात बेकायदा रिक्षाथांब्यांसह जागोजागी बोकाळलेली अतिक्रमणे, वाहनधारकांची बेशिस्ती यामुळे प्रगत शहरांच्या पंक्तित मिरवणार्‍या संगमनेर शहरातील सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा अक्षरशः बोजवारा उडाला आहे. शहराच्या बेशिस्त वाहतुकीला लगाम लावण्यासाठी पोलीस अधिक्षकांनी सिग्नल व्यवस्था कार्यान्वीत करुन त्याचे संचालन करण्याचेही आदेश दिले होते. त्यावरुन पालिकेने आपली भूमिका बजावली असली तरीही पोलिसांनी मात्र आपल्याच सेनापतीच्या आदेशाला फाट्यावर उडवल्याने नागरिकांच्या स्वयंशिस्तीने हॉटेल काश्मिरजवळील सिग्नल वगळता उर्वरीत दोन्ही ठिकाणी दिवसभर बेशिस्ती सुरु आहे. त्यातून शहराच्या रस्त्यारस्त्यावर गचाळ आणि बेशिस्तीचे दर्शन घडत असून काही ‘टुकार’ सिग्नलचाही फज्जा उडवीत आहेत.


संगमनेर शहर म्हणजे दोन महानगरांना एकमेकांशी जोडणार्‍या महामार्गासह उत्तर भारतातून दक्षिणेकडे जाण्यासाठी महत्त्वाचा समजल्या जाणार्‍या पुणे-नाशिक महामार्गावरील एक प्रगत शहर. गेल्या काही दशकात येथील ऐतिहासिक बाजारपेठेच्या कक्षा रुंदावल्याने व त्यातच दळणवळणासारख्या संसाधनांचाही मोठ्या प्रमाणात विकास झाल्याने, या महामार्गावरील वाहतूकही त्या प्रमाणात वाढली आहे. मात्र या वाहतुकीचे नियमन करण्यात संगमनेर शहर पोलीस सातत्याने अपयशी ठरत असून सामान्य नागरिकांना त्याचे परिणाम भोगावे लागत आहेत.


विशेष म्हणजे पदभार स्वीकारल्यानंतर गेल्या मे महिन्यात संगमनेरच्या भेटीवर आलेल्या पोलीस अधिक्षक सोमनाथ घार्गे यांनीही संगमनेरच्या ‘बेशिस्त’ आणि अतिशय ‘गचाळ’ वाहतुकीचा अनुभव घेतल्यानंतर बंद पडलेली सिग्नल व्यवस्था तात्काळ सुरु करुन शहरातंर्गत वाहतुकीच्या रस्त्यांवरील अतिक्रमणांवर नियंत्रण मिळवण्याचे आदेश दिले होते. त्यांच्या आदेशानंतर पालिकेचे तत्कालीन मुख्याधिकारी रामदास कोकरे यांनी तातडीने कारवाई करीत संगमनेर बसस्थानक (हॉटेल काश्मिर), तीनबत्ती चौक आणि अकोले नाका (जाजू पेट्रोल पंप) या तीन ठिकाणची सिग्नल व्यवस्था दुरुस्त करुन ती जूनमध्ये अधिकृतपणे पोलिसांकडे सोपवली. मात्र त्यानंतरही जवळपास महिनाभराचा कालावधी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कामचुकारपणात वाया गेला. नियमानुसार सर्व पूर्तता झाल्यानंतर ऑगस्टमध्ये सुरु झालेल्या सिग्नल व्यवस्थेला आज तीन महिन्यांचा काळ लोटूनही शहर पोलिसांचा कोणताही कर्मचारी पूर्णवेळ एकाजागी थांबून सिग्नलचे नियमन करीत नाही.


त्याचा परिणाम ‘शिस्तप्रिय’ नागरिक आणि वाहनचालकांनी स्वयंशिस्तीने पालन करण्यास सुरुवात केलेला बसस्थानकाजवळील सिग्नल वगळता तीनबत्ती आणि अकोलेनाका या दोन्ही ठिकाणच्या व्यवस्थेचा फज्जा उडाला आहे. या ठिकाणी पोलीस असूनही नसल्याप्रमाणेच असल्याने लालबत्ती पडलेली असतानाही सर्रासपणे वाहतूक सुरुच राहते. त्यामुळे या दोन्ही ठिकाणी आता बेशिस्तीच लोकांच्या अंगवळणी पडली असून सिग्नल असूनही त्याचा वापर मात्र जवळजवळ बंद आहे. काही प्रमाणात अशीच स्थिती काश्मिरजवळील सिग्नलवरही दिसून येते. शहरातील काही ‘टुकार’ दुचाकीस्वार स्वयंशिस्तीने अन्य वाहनचालक सिग्नलचे नियम पाळून उभे असतानाही सर्रास त्याचे उल्लंघन करतात. अशावेळी त्यांच्यावर दंडात्मक कारवाई होणे आवश्यक असताना कागदोपत्री नियुक्त असलेला कर्मचारी मात्र विश्रामगृहाजवळील चहाच्या टपरीवर किंवा फूटपाथवरील एखाद्या फळविक्रेत्याच्या ठेल्यावर ठाण मांडून बसत असल्याने शिस्तप्रिय वाहनधारकांचा संताप होताना दिसत आहे.


अगदी प्राचीन काळापासून अमृतवाहिनीच्या काठावर वसलेल्या संगमनेरच्या बाजारपेठेचे महत्त्व अनेक ग्रंथ आणि साहित्यात वर्णिले गेले आहे. शिवकाळातही संगमनेरची बाजारपेठ वारंवार उल्लेखीत झालेली आहे. येथून होणारा व्यापार त्या काळातही आसपासच्या जिल्ह्यांपर्यंत विस्तारलेला होता. त्यामुळे संगमनेरच्या बाजारपेठेला जिल्ह्यात वेगळेस्थान आहे. अगदी त्या काळापासून नाशिक आणि त्याच्या आसपासचे जिल्हे व गुजरातमधून दक्षिणेकडे जाण्यासाठी संगमनेर, चंदनापुरी घाट, आळेफाटा, जुन्नर या मार्गांचा वापर झाल्याचे दाखले इतिहासात आढळतात. त्यामुळे ज्याप्रमाणे संगमनेरच्या बाजारपेठेला ऐतिहासिक महत्त्व आहे, त्याप्रमाणे पुणे-नाशिक या महामार्गालाही तेवढेच महत्त्व प्राप्त आहे.


दिवसोंदिवस या महामार्गावरील वाहतूक वाढल्याने राष्ट्रीय महामार्ग विभागाने रस्त्याचे चौपदरीकरण करुन बाह्यवळण रस्त्याने वाहतुकीचा ताण कमी करण्याचा प्रयत्न केला. गेल्या काही दशकांमध्ये ज्याप्रमाणे रस्त्यांची संख्या वाढली त्या प्रमाणात त्यावरुन धावणार्‍या वाहनांची संख्याही अनेक पटींनी वाढली आहे. त्यामुळे साहजिकच वाहतुकीचे नियमन, अपघात, रस्त्यांची अवस्था या गोष्टीही वारंवार उद्भवतात आणि त्यातून जनक्षोभ निर्माण होतो. अशीच स्थिती सध्या संगमनेरात बघायला मिळत आहे. शहरातील अंतर्गत भागातील सर्वच प्रमुख रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात अतिक्रमण झालेली असल्याने वारंवार वाहतुकीचा खोळंबा होतो.


त्यामुळे नागरिकांना चौका-चौकात अडकून पडावे लागत आहे. सामान्य संगमनेरकरांना पोलिसांकडून रात्रीची सुरक्षित झोप आणि दिवसा शहरातील कोणत्याही भागात अनिर्बंध, विनाअडथळा वावर या दोनच गोष्टी अपेक्षित असतात. मात्र संगमनेर शहर पोलीस ठाणे संगमनेरकरांच्या या दोन्ही गोष्टी पूर्ण करण्यात अपयशी ठरले आहे. एकीकडे महामार्गासह चौका-चौकात होणारी वाहतूक कोंडी आणि दुसरीकडे रात्रीच्या सुमारास होणार्‍या चोर्‍या आणि दुचाकी वाहने लांबविण्याचे प्रकार हेच सांगत आहेत.


पुणे-नाशिक महामार्गावरुन दररोज हजारों वाहनांची वर्दळ असते. शहराची अंतर्गत स्थितीही यापेक्षा वेगळी नाही. दोन महानगरांना जोडणार्‍या महामार्गावरच असल्याने संगमनेरच्या बसस्थानकातही चोवीस तास राज्य परिवहन महामंडळांच्या बसेसची सतत गर्दी असते. शहरात सिग्नल व्यवस्था असली तरीही पोलिसांकडून त्याचे सक्तिने संचालनच होत नसल्याने एकप्रकारे अपवाद वगळता ती व्यवस्थाही कूचकामीच ठरली आहे. शहरातंर्गत वाहतूक हा स्थानिक पोलीस निरीक्षकांसाठी एकूण कामाचा एक भाग असल्याने त्यांचा त्याकडे पाहण्याचा दृष्टीकोन वेगळा असतो. वाहतुकीसोबतच त्यांना शहरातील कायदा व सुव्यवस्था, गुन्ह्यांचे तपास अशा विविध जबाबदार्‍याही पेलाव्या लागतात. पोलीस अधिक्षकांनी केवळ कागदी आदेशाचे घोडे नाचवण्यापेक्षा अडगळीत गेलेल्या जिल्ह्यातील वाहतूक उपशाखांना पुन्हा जिवंत केल्यास जिल्ह्यातील वाहतुकीची निम्मी समस्या जागीच नष्ट होईल, मात्र त्यांच्याकडूनही काही वेगळे घडण्याची अपेक्षा आता अतिशयोक्ती वाटू लागली आहे.


तत्कालीन जिल्हा पोलीस अधीक्षक रंजनकुमार शर्मा यांनी अडगळीत गेलेल्या संगमनेर व श्रीरामपूर वाहतूक शाखांना नवसंजीवनी देतांना प्रत्येक शाखेसाठी स्वतंत्र सहाय्यक पोलीस निरीक्षकांसह 15 कर्मचारी व सरकारी वाहन दिले होते. या बळाचा योग्य वापर करुन यापूर्वी स.पो.नि.गोपाळ उंबरकर व स.पो.नि.पप्पू कादरी या अधिकार्‍यांनी खूप चांगले काम करुन दाखवले. मात्र शर्मा यांच्या बदलीनंतर मनुष्यबळाच्या कारणाने नंतरच्या अधिक्षकांनी या शाखा बंद केल्या आणि संगमनेरसह जिल्ह्यातील सगळ्याच उपविभागात वाहतुकीचा बट्ट्याबोळ झाला. पोलीस अधिक्षक सोमनाथ घार्गे यांनी संगमनेर भेटीत येथील वाहतूक शाखा पुन्हा सुरु करण्याबाबत सकारात्मक संकेत दिले होते, मात्र अहिल्यानगरला परतल्यानंतर त्याचाही त्यांना विसर पडल्याचेच आता स्पष्ट दिसत आहे.

Visits: 515 Today: 2 Total: 1415688

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *