हाथरस घटनेतील दोषींवर तात्काळ कारवाई करा; रिपाईची मागणी
हाथरस घटनेतील दोषींवर तात्काळ कारवाई करा; रिपाईची मागणी
नायक वृत्तसेवा, राहाता
हाथरस घटनेतील दोषींवर तात्काळ कारवाई करावी. या मागणीचे निवेदन रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया यांनी नुकतेच राहाता पोलिसांना दिले आहे.
रिपाईचे तालुकाध्यक्ष रमेश गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली पोलीस निरीक्षक सुभाष भोये यांना निवेदन देण्यात आले. या निवेदनात म्हंटले आहे की, हाथरस येथे घडलेली घटना अतिशय निंदनीय आणि दुर्दैवी आहे. पीडित तरुणीवर सामूहिक अत्याचार करून तिची जीभ कापून हातपाय मोडण्यात आले. त्यामुळे ही घटना मानवतेला काळिमा फासणारी असून उत्तर प्रदेशात कायदा व सुव्यवस्थेचे अक्षरशः धिंदवडे निघाले आहे. पीडितेला न्याय मिळवून देण्यासाठी खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवून लवकरात लवकर न्याय द्यावा, येथील पोलिसांनी पीडितेचे शव कुटुंबाला न देता परस्पर तिच्यावर रात्रीच्या वेळी अंत्यसंस्कार केले, तिच्या कुटुंबियांना जवळ जाऊ न देता पोलिसांनी ही घटना अमानवी पद्धतीने हाताळली असून तेथील पोलिसांना व प्रशासनाला सहआरोपी करावे, अशीही मागणी जिल्हा संपर्कप्रमुख श्रीकांत भालेराव, जिल्हाध्यक्ष सुरेंद्र थोरात, तालुकाध्यक्ष रमेश गायकवाड, रवींद्र शेजवळ, संतोष पारखे, रामा डांगे, सनी पवार, आकाश बनसोडे, प्रसाद चित्ते, अविनाश पंडीत, योगेश शेंडगे, दीपक कसबे आदिंच्यावतीने करण्यात आली आहे.