चंदनापुरीच्या पशुधन अधिकार्यांवर कारवाईसाठी ठराव! कामचुकारपणा; दवाखान्यात फिरकतच नाहीत; हजारो रुपयांच्या पशु औषधांची नासाडी..
नायक वृत्तसेवा, संगमनेर
राज्यासह संगमनेरातही सध्या लम्पी स्किनचा प्रादुर्भाव वाढत असताना तालुक्यातील महत्त्वाचे केंद्र समजल्या जाणार्या चंदनापुरीतून अत्यंत धक्कादायक वृत्त हाती आले आहे. येथील जनावरांच्या शासकीय दवाखान्याचे सहाय्यक पशुधन अधिकारी नियुक्तीपासूनच कामचुकारपणा करीत दवाखानाच उघडीत नाहीत. त्यामुळे लम्पीच्या संकटात आपले पशुधन वाचविण्यासाठी शेतकर्यांना खासगी पशुवैद्यकाकडून जनावरांचे लसीकरण करवून घ्यावे लागत आहे. विशेष म्हणजे येथील पशुवैद्यकीय दवाखान्याला शासनाकडून मोठ्या प्रमाणात औषधांचा पुरवठा होवूनही त्याचे वितरणच न झाल्याने हजारो रुपयांच्या औषधसाठ्याची नासाडी झाल्याचेही समोर आले आहे. अतिशय उद्धट मनोवृत्तीच्या या अधिकार्याची येथून तत्काळ बदली करावी यासाठी चंदनापुरीच्या ग्रामसभेत ठरावही मंजूर करण्यात आला असून गटविकास अधिकार्यांच्या उपस्थितीत येथील पशु दवाखान्याचा पंचनामाही करण्यात आला आहे.
याबाबत प्राप्त झालेल्या माहितीनुसार सुमारे वर्षभरापूर्वी चंदनापुरीच्या पशुवैद्यकीय दवाखान्यात संजय बापूराव निकाळे यांची सहाय्यक पशुधन अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. तत्पूर्वी संबंधित अधिकार्याची राहाता तालुक्यात वर्णी लावण्यात आली होती. मात्र या अधिकार्याच्या कामचुकारपणाची पूर्वकल्पना असल्याने शिर्डीच्या लोकप्रतिनिधींनी त्यांना त्यांच्या कार्यक्षेत्रात कोठेही पदभार घेवू दिला नाही. त्यामुळे नाईलाजास्तव ‘ज्याला कोणी नाही, त्याला संगमनेर’ या म्हणीनुसार ‘त्या’ अधिकार्याला जिल्हा परिषदेने रिक्त असलेल्या चंदनापुरीच्या पशुवैद्यकीय दवाखान्यात धाडले. मात्र कामचुकारांना कोठेही पाठवा, ते आपली प्रवृत्ती सोबत घेवूनच फिरतात याचा प्रत्यय चंदनापुरीकरांना लागलीच मिळण्यास सुरुवात झाली.
चंदनापुरीत नियुक्ती झाल्यापासून अपवाद वगळता हा अधिकारी आपल्या कार्यस्थळी कधीही हजर नव्हता. विशेष म्हणजे चंदनापुरीच्या या पशुवैद्यकीय दवाखान्याच्या कार्यक्षेत्रात झोळे, हिवरगाव पावसा, सावरगाव तळ, आनंदवाडी, पिंपळगाव माथा या गावांसह त्यालगतचा परिसरही येतो. मात्र कर्तव्याशी काहीएक घेणंदेणं नसल्यागत या अधिकार्याने कधीही या गोष्टी गांभीर्याने घेतल्या नाहीत. देशात जेव्हा पशुधनावर लम्पीचे संकट ओढावले त्यावेळी शासनाने पशुपालकांना वारंवार आपल्या जनावरांचे लसीकरण पूर्ण करुन घेण्याचे आवाहन केले गेले. त्यासाठी जिल्हा परिषदेच्या माध्यमातून महसुली मंडलनिहाय असलेल्या पशूवैद्यकीय दवाखान्यांमध्ये जनावरांच्या पोषण आहारासह लम्पीचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक लस व औषधांचाही मोठ्या प्रमाणात पुरवठा केला.
परंतु वरील सहा गावातील शेतकर्यांनी चंदनापुरीच्या पशु दवाखान्यात वारंवार हेलपाटे मारुनही त्यांना हा दवाखाना कधीच सुरु असल्याचे दिसले नाही. त्यामुळे नाईलाजाने शेतकर्यांनी पदरखर्च करुन खासगी पातळीवर जनावरांचे लसीकरण करुन घेतले. मात्र त्यातून चंदनापुरीत दाखल झालेल्या यो कामचुकार अधिकार्याबाबत जनमनात मोठा रोषही निर्माण झाला. त्यातून ग्रामपंचायतीकडील तक्रारी वाढल्यानंतर साधरण महिन्याभरापूर्वी चंदनापुरीचे सरपंच शंकर रहाणे यांनी काही सदस्य व ग्रामस्थांसह पंचायत समितीत जावून गटविकास अधिकारी अनिल नागणे यांची भेट घेवून तक्रार देण्याचाही प्रयत्न केला, मात्र याची माहिती मिळताच संबंधित अधिकार्याने त्या सर्वांनाच तक्रारीचा ‘धाक’ दाखवण्याचा प्रताप केला.
त्यामुळे ग्रामस्थांच्या संतापात आणखी भरली. त्याचा परिणाम गेल्या 5 सप्टेंबर रोजी चंदनापुरीत ग्रामसभा घेण्यात आली. यावेळी उपस्थित ग्रामस्थांनी चंदनापुरीच्या पशुवैद्यकीय दवाखान्यातील अडचणींचा पाढा वाचत येथील सहाय्यक पशुधन अधिकारी संजय निकाळे यांची ताबडतोब बदली करण्याचा एकमुखी ठरावही करण्यात आला. या ठरावाची प्रत संगमनेर पंचायत समितीच्या गटविकास अधिकार्यांना त्याच दिवशी देण्यात आली. मात्र त्यालाही 20 दिवसांचा कालावधी उलटूनही कोणतीच कारवाई न झाल्याने गटविकास अधिकारीच अशा कामचुकार अधिकार्यांना पोसत असल्याची भावना चंदनापुरीच्या ग्रामस्थांमध्ये निर्माण झाली होती.
अखेर चंदनापुरीच्या ग्रामस्थांच्या तक्रारीची दखल घेवून पंचायत समितीचे गटविकास अधिकारी अनिल नागणे यांनी मंगळवारी (ता.27) चंदनापुरीत जावून ग्रामस्थांशी संवाद साधला. यावेळी उपस्थित शेतकर्यांनी चंदनापुरीचा पशु दवाखाना असून अडचण असल्याची बाब त्यांच्या निदर्शनास आणून देतांना पशुधन अधिकार्याविरोधात तक्रारींचा पाढाच वाचला. यावेळी संबंधित अधिकार्याने लम्पीचा प्रादुर्भाव असूनही या दवाखान्याच्या कार्यक्षेत्रातील एकाही जनावराचे लसीकरण केले नसल्याचा गंभीर प्रकारही समोर आला. सोबतच शासनाकडून वेळोवेळी पुरवठा होणारी औषधे, सिरॅमिक पावडर व अन्य गोष्टींचे वर्षभरात कधीही वितरणच न झाल्याची बाबही समोर आल्यानंतर गटविकास अधिकार्यांनी दवाखान्यातील औषधांचा साठा तपासला असता त्यातूनही अनेक धक्कादायक गोष्टी उघड झाल्या.
यावेळी गटविकास अधिकार्यांनी दवाखान्यात जावून पाहिले असता त्यांना अतिशय महाग असलेल्या सिरॅमिक पावडरच्या दोन-चार नव्हेतर तर तब्बल 40 गोण्या, असंख्य औषधांचा खच, धूळखात पडलेली व मुदत संपलेली विविध औषधे, दवाखान्यातील फ्रीजमध्ये पडून असलेल्या लम्पी लशीच्या बाटल्या असे न वापरता पडून असलेल्या असंख्य गोष्टी आढळून आल्या. या सर्व स्थितीचा पंचनामाही करण्यात आला. हजारो रुपये किंमतीची औषधे व अन्य गोष्टी अस्ताव्यस्त पाहून संतप्त झालेल्या शेतकर्यांनी गटविकास अधिकार्यांनाच फैलावर घेतले. त्यांना उत्तर देताना त्यांनी संबंधित अधिकार्याची चौकशी करुन योग्य ती कारवाई करण्याचे आश्वासन दिल्यानंतर उपस्थित शेतकरी शांत झाले.
पंचायत समितीचे कामचुकार पशूधन अधिकारी संजय निकाळे यांनी चंदनापुरीतील शेतकर्यांसह शासनाकडून प्राप्त झालेल्या हजारो रुपयांच्या औषधांची नासाडी केली आहे. या प्रकाराला ते व्यक्तिशः जबाबदार असल्याने त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करुन झालेले नुकसान त्यांच्या पगारातून भरुन काढण्याची मागणी सरपंच शंकर रहाणे, सामाजिक कार्यकर्ते रामभाऊ रहाणे, उपसरपंच भाऊराव रहाणे, तालुका काँग्रेसचे उपाध्यक्ष विजय रहाणे, मूळगंगा दूध संस्थेचे अध्यक्ष अनिल कढणे, डी. टी. रहाणे, बबलू रहाणे, तंटामुक्तीचे अध्यक्ष भैय्या कढणे, किरण रहाणे, बाळासाहेब रहाणे, पोलीस पाटील ज्ञानदेव रहाणे यांनी केली आहे.