संगमनेर तालुक्याने ओलांडले कोविड बाधितांचे 34 वे शतक..! शहरातील आठ जणांसह आजही 29 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह..
नायक वृत्तसेवा, संगमनेर
संगमनेर तालुक्यात दररोज रुग्ण सापडण्याची शृंखला आजही कायम आहे. मात्र दिलासादायक बाब म्हणजे रोजच्या सरासरी पेक्षा आज आढळलेले रुग्ण जवळपास निम्म्याने कमी असल्याने रोजच्या धक्कादायक आकडेवारीतून संगमनेरकरांना काहीसा दिलासा मिळाला आहे. आज शासकीय व खासगी प्रयोगशाळेसह रॅपिड अँटीजेन चाचणीतून शहरातील आठ जणांसह तालुक्यातील 29 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह प्राप्त झाले आहेत. त्यामुळे तालुक्याच्या रुग्णसंख्येने बाधितांचे 34 वे शतक ओलांडले असून रुग्णसंख्या 3 हजार 425 वर पोहोचली आहे.
गेल्या काही कालावधीपासून संगमनेर तालुक्याच्या विविध भागात मोठ्या संख्येने रुग्ण समोर येत आहेत. दररोज पन्नासहून अधिक संख्येने बाधीत आढळत असल्याने तालुक्यात एक प्रकारे कोविडची दहशत निर्माण झाली आहे. प्रशासनाकडून वारंवार आवाहन करूनही नागरिक नियमांकडे दुर्लक्ष करीत असल्याने व मनाई असूनही गर्दीच्या कार्यक्रमांचे आयोजन अथवा उपस्थिती यामुळे तालुक्याच्या ग्रामीण क्षेत्रातील कोरोनाचे संक्रमण वाढल्याचे समोर आले आहे. उत्सव, दहावे, लग्नसोहळे, पितृपक्ष अशा विविध कार्यक्रमांमधून तालुक्यातील प्रादुर्भाव वाढल्याचे निरीक्षण वैद्यकीय क्षेत्रातील जाणकारांकडूनही वर्तविले जात आहे.
आज शासकीय प्रयोगशाळेकडून अवघे तीन, खाजगी प्रयोगशाळेकडून 15 तर रॅपिड अँटीजेन चाचणीतून अकरा जणांचे अहवाल प्राप्त झाले. यात शहरातील आठ जणांचा समावेश असून माळीवाडा, कुरणरोड व भारतनगर परिसरातून पुन्हा नव्याने रुग्ण समोर आले आहेत. आज बाधित आढळलेल्या शहरातील आठ जणांमध्ये जानकीनगर परिसरातील 70 वर्षीय ज्येष्ठ नागरिक, घोडेकर मळा परिसरातील तीस वर्षीय तरुण, पावबाकी रोड परिसरातील 37 व 35 वर्षीय तरुण, पवारमळा परिसरातील 75 वर्षीय ज्येष्ठ नागरिक, माळीवाडा परिसरातील 33 वर्षीय तरुण, कुरणरोड परिसरातील 26 वर्षीय तरुण व भारत नगर मधील 46 वर्षीय इसमाचा समावेश आहे.
त्याचप्रमाणे आज तालुक्यातील 21 जणांचे अहवालही पॉझिटिव प्राप्त झाले आहेत. आजही तालुक्यातील काही नवीन गावांमध्ये कोविडचे संक्रमण झाल्याचे दिसून आले आहे. आज चिखली येथील 52 वर्षीय इसम, चिकणी येथील 56 वर्षीय इसम, आश्वी खुर्द मधील 57 वर्षीय इसम, समनापुर येथील 52 वर्षीय इसम, घुलेवाडी येथील 55 वर्षीय इसमासह 13 वर्षीय मुलगा, गुंजाळवाडी येथील 41 वर्षीय तरुण, हिवरगाव पावसा येथील 75 वर्षीय ज्येष्ठ नागरिकासह 40, 18 व 17 वर्षीय तरुण, राजापूर येथील 47 वर्षीय इसम, नांदुरी दुमाला येथील 65 वर्षीय महिला,
जाखोरी येथील 48 वर्षीय इसम, शिंदोडी येथील 35 वर्षीय तरुण, तळेगाव दिघे येथील 51 व 50 वर्षीय इसम, निमगाव जाळी येथील 62 वर्षीय ज्येष्ठ नागरिक, कनोली येथील 45 वर्षीय तरुण, सुकेवाडी येथील 61 वर्षीय ज्येष्ठ नागरिक व ओझर खुर्द येथील 48 वर्षीय इसमाचा अहवाल आज पॉझिटिव्ह प्राप्त झाला आहे. तालुक्याच्या संख्येत आज दररोजच्या तुलनेत जवळपास निम्म्याहून घट झल्याने मोठ्या कालावधीनंतर संगमनेरकरांना काहीसा दिलासा मिळाला आहे. मात्र आजही 29 रुग्णांची भर पडल्याने तालुक्यातील बाधितांची संख्या 34 वे शतक ओलांडून 3 हजार 425 वर जावून पोहोचली आहे.