सध्या लोकशाहीचे आधारस्तंभ डळमळीत झाले आहेत : आ. थोरात भारत जोडो यात्रा; राज्यभरातील सुमारे चारशे किमीच्या यात्रेचे सुयोग्य नियोजन केल्याने थोरातांचे देशभर कौतुक..

नायक वृत्तसेवा, संगमनेर
थोर समाजसुधारक आणि संतांचा समतेचा विचार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्याला घटनेच्या रूपात दिला आहे. मात्र सध्याच्या राजकारणाची पातळी विचारात घेता लोकशाहीचे काही स्तंभ डळमळीत झाले आहेत. त्या स्तंभांना बळ देण्यासाठी आणि लोकशाही व समतेचा विचार अधिक प्रबळ करण्यासाठी खासदार राहुल गांधी यांनी भारत जोडो यात्रा आरंभल्याचे गौरवोद्गार यात्रेचे महाराष्ट्राचे समन्वयक, आमदार बाळासाहेब थोरात यांनी काढले.

शुक्रवारी शेगाव येथे भारत जोडो यात्रेच्या निमित्ताने आयोजित सभेत ते बोलत होते. यावेळी काँग्रेसचे नेते व खासदार राहुल गांधी, राज्य प्रभारी एच. के. पाटील, छत्तीसगडचे मुख्यमंत्री भूपेशसिंह बघेल, प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण, पृथ्वीराज चव्हाण, दिग्विजय सिंह, खासदार मुकुल वासनिक, आमदार यशोमती ठाकूर, अमित देशमुख, आमदार डॉ. सुधीर तांबे, सत्यजीत तांबे, दुगार्र् तांबे, एकविरा फौंडेशनच्या संस्थापक डॉ. जयश्री थोरात आदिंसह महाराष्ट्रातील अनेक नेते उपस्थित होते.

यावेळी बोलताना थोरात पुढे म्हणाले की, शेगावमधील भारत जोडो यात्रेची ही सभा विराट आणि अविस्मरणीय असून लाखो लोक
या सभेला उत्स्फूर्तपणे उपस्थित आहेत. कन्याकुमारीपासून निघालेल्या या यात्रेत विविध पक्ष, पुरोगामी संघटना, लोकशाहीवर विश्वास असणारे विविध नागरिक, गरीब, कष्टकरी, शेतकरी, महिला मोठ्या संख्येने सहभागी होत आहेत. या पदयात्रेदरम्यान राहुल गांधी गोरगरिबांना भेटून त्यांची आस्थेवाईकपणे चौकशी करीत आहेत. गरीबांच्या डोळ्यातील अश्रू पुसत आहेत. या संपूर्ण पदयात्रेत राहुल गांधी यांनी आपुलकी व प्रेम वाटण्याचे काम केल्याचेही ते म्हणाले.

दररोज 25 किलोमीटर चालताना ऊन, वारा, पाऊस, थंडी वेगवेगळ्या बदलत्या वातावरणात ते दररोज लाखो लोकांना भेट असल्याचे सांगत जनतेच्या प्रेमातूनच त्यांना चालण्याचे बळ मिळत असल्याचे थोरात म्हणाले. देशातील लोकशाही वर संकटं आले असून लोकशाही व राज्यघटना अधिक बळकट करण्यासाठी संत आणि महापुरुषांनी दिलेला समतेचा विचार घेऊन आज लढण्याची गरज आहे, राहुल गांधी यांचा लढाही त्यासाठीच सुरु असल्याने त्यांच्या यात्रेत अनेक घटक जोडले जात असल्याचेही त्यांनी सांगितले.

राष्ट्रपिता महात्मा गांधींनी दिलेले स्वातंत्र्य आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेली राज्यघटना यामुळे आपला देश आज स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करीत आहे. गेल्या सात-आठ दशकांत देशाने केलेली प्रगती काँग्रेस आणि लोकशाहीच्या विचारातून झालेली आहे. मात्र, सध्या लोकशाहीचे आधारस्तंभ डळमळीत होवू पाहत आहेत, त्यांना पुन्हा ताकद देण्यासाठी भारत जोडो यात्रा ऐतिहासिक ठरेल असेही थोरात यांनी यावेळी बोलताना सांगितले. यावेळी खासदार राहुल गांधींसह नाना पटोले, अशोक चव्हाण, यशोमती ठाकूर, मुकुल वासनिक यांचीही भाषणे झाली.

2019 च्या निवडणुकीत खासदार राहुल गांधी यांची संगमनेरात सभा आणि त्यानंतर येथेच त्यांचा मुक्कामही झाला होता. त्यावेळी प्रदेशाध्यक्षपदी असलेल्या आमदार बाळासाहेब थोरात यांच्या नियोजनाने ते भारावून गेले होते. त्यानंतरच थोरात यांची उंची दिल्लीपर्यंत वाढली आणि राज्याच्या राजकारणात त्यांचा दबदबाही निर्माण झाला. आता खुद्द राहुल गांधी यांच्या महत्वकांक्षी भारत जोडो यात्रेच्या महाराष्ट्रातील तब्बल 381 किलोमीटरच्या प्रवासाचे समन्वयक म्हणून त्यांनी संपूर्ण जबाबदारी पेलली. राज्यातील पाच जिल्ह्यातून गेलेल्या या यात्रेदरम्यान दोन सभा झाल्या, वादही निर्माण झाला. मात्र ना त्याचा परिणाम यात्रेला मिळणार्या प्रतिसादावर झाला, ना राहुल गांधींच्या सभांची उपस्थिती आटली. त्यामुळे आमदार बाळासाहेब थोरात यांचा डंका आता राज्यातच नव्हेतर देशात वाजवला जावू लागला आहे.

