तीन लाख भाविकांनी घेतले पैस खांबाचे दर्शन कार्तिकी एकादशीनिमित्त खिचडी महाप्रसादाचेही वाटप


नायक वृत्तसेवा, नेवासा
कार्तिक वद्य उत्पत्ती एकादशीच्या निमित्ताने तीर्थक्षेत्र नेवासा येथील संत ज्ञानेश्वर महाराज मंदिरातील माऊलींच्या पैस खांबाचे दिवसभरात सुमारे तीन लाख भाविकांनी दर्शन घेतले. यावेळी पायी आलेल्या शेकडो दिंड्यांनी येथे हजेरी लावत ज्ञानोबा माऊली तुकारामचा जयघोष केला. त्यामुळे नेवासेनगरी हरिनामाच्या गजराने दुमदुमली होती.

कार्तिक वद्य एकादशीनिमित्त पहाटे 4 वाजता संत ज्ञानेश्वर मंदिराचे प्रमुख व अखिल भारतीय वारकरी मंडळाचे केंद्रीय मार्गदर्शक शिवाजी महाराज देशमुख यांच्या प्रमुख उपस्थितीत त्रिमूर्ती शैक्षणिक संकुलाचे सचिव मनीष घाडगे व मनीषा घाडगे यांच्या हस्ते माऊलींचे मूर्तीमंत रूप असलेल्या पैस खांबास वेदमंत्राच्या जयघोषात अभिषेक घालण्यात आला. पौरोहित्य प्रवरासंगम येथील उदय देवा यांनी केले. याप्रसंगी संत ज्ञानेश्वर मंदिराचे विश्वस्त ज्ञानेश्वर माऊली शिंदे, कृष्णा पिसोटे, सेवेकरी मार्तंड महाराज चव्हाण, राम महाराज खरवंडीकर, समर्पण फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष डॉ. करणसिंह घुले, शिवाजी होन, देवराव बनकर, गोरख भराट, संदीप आढाव, राजेंद्र परबळकर उपस्थित होते.

कार्तिक वद्य उत्पत्ती एकादशी ही माऊलींची एकादशी म्हणून ओळखली जाते. यावेळी पहाटे पाच वाजेपासूनच भाविकांनी दर्शनासाठी मोठी गर्दी केली होती. दुपारच्या सत्रात गर्दीचे रूपांतर मोठ्या दर्शन बारीत झाले. भाविकांना लवकरात लवकर दर्शन घेता यावे म्हणून संत ज्ञानेश्वर महाराज संस्थानच्यावतीने मुख दर्शनाची व्यवस्था करण्यात आली होती. बन्सी महाराज तांबे वारकरी शिक्षण संस्थेच्या विद्यार्थी सेवेकर्‍यांनी स्वयंसेवकाची भूमिका बजावली. एकादशीच्या निमित्ताने गावागावातून आलेल्या शेकडो दिंड्यांचे शिवाजी महाराज देशमुख यांनी स्वागत केले. पोलीस निरीक्षक विजय करे यांच्या मार्गदर्शनाखाली चौकाचौकात चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. रात्री देवस्थानचे प्रमुख शिवाजी महाराज देशमुख यांचे कीर्तन झाले. त्यानंतर त्रिमूर्ती शैक्षणिक संकुलाचे संस्थापक साहेबराव घाडगे यांच्यावतीने शाबुदाना खिचडीचा महाप्रसाद वाटण्यात आला.

Visits: 19 Today: 2 Total: 115044

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *