अजित पवारांच्या बंडानंतर अकोलेतील राष्ट्रवादीतही पडले गट आमदार लहामटे शरद पवारांच्या तर गायकर अजित पवारांच्या गटात सामील


नायक वृत्तसेवा, अकोले
विद्यमान उपमुख्यमंत्री अजित पवार व त्यांच्या सहकार्‍यांच्या बंडानंतर अकोले तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेस देखील दुभंगली आहे. आमदार डॉ. किरण लहामटे हे शरद पवार यांच्या गटात सामील झाले तर जिल्हा बँकेचे माजी अध्यक्ष, ज्येष्ठ संचालक व अगस्ती कारखान्याचे अध्यक्ष सीताराम गायकर, जिल्हा परिषद अर्थ व बांधकाम समितीचे माजी सभापती कैलास वाकचौरे आदिंनी अजित पवार यांना साथ देण्याचा निर्णय घेतला आहे.

दरम्यान माजी मंत्री मधुकर पिचड व माजी आमदार वैभव पिचड यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केलेली नाही. आगामी निवडणूक राष्ट्रवादीच्या अजित पवार गट, भाजप-शिवसेना (शिंदे गट) यांनी एकत्रित लढविली तर त्याचा फायदा वैभव पिचड यांना होऊ शकतो. दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार यांच्या गटामध्ये आमदार डॉ. किरण लहामटे व जिल्हा परिषदेच्या माजी सदस्या सुनीता भांगरे यांच्यामध्ये स्पर्धा राहणार आहे. राज्यातील राजकीय भूकंपामुळे शरद पवार व अजित पवार असे दोन गट राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पडले असून या पार्श्वभूमीवर कोण आमदार कोणत्या गटासोबत? अशी चर्चा सुरू असताना अकोले मतदारसंघातील आमदार डॉ. किरण लहामटे यांनी अकोल्याच्या जनतेचा कौल मान्य करत शरद पवारांसोबत राहण्याचा निर्णय घेतल्याचे जाहीर केले. तर सुनीता भांगरेंनी शरद पवारांना आधीच पाठिंबा दर्शविला होता. राष्ट्रवादीमध्ये आता फूट पडून अकोले तालुक्यात राष्ट्रवादीचे दोन गट पडले आहेत. पण मात्र बहुतांशी अकोलेकर, जुने व नवीन कार्यकर्ते शरद पवारांना पाठिंबा देत पवार साहेब हाच आमचा पक्ष असल्याचा नारा देताना दिसत आहेत.

राष्ट्रवादीच्या जिल्हा उपाध्यक्ष नीता आवारी, अकोले राष्ट्रवादी महिला तालुकाध्यक्ष स्वाती शेणकर, ओबीसी सेलच्या तालुकाध्यक्ष उज्ज्वला राऊत, सचिव सुजाता भोर, महिला कार्याध्यक्षा सीमा मालुंजकर, शहराध्यक्ष भीमा रोकडे, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष भानुदास तिकांडे, महाराष्ट्र राज्य युवक काँग्रेसचे सरचिटणीस विनोद हांडे, विकास बंगाळ, राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते सुरेश गडाख, युवक कार्यकर्ते संतोष नाईकवाडी यांनी शरद पवारांना पाठिंबा दिला आहे. यावरुन आमदार डॉ. किरण लहामटे यांनी घेतलेल्या निर्णयामुळे समर्थकांमध्ये आनंदाचे वातावरण दिसून येत आहे.

दुसर्‍या बाजूला अजित पवारांचे कट्टर समर्थक असलेले अगस्ती कारखान्याचे अध्यक्ष तथा जिल्हा बँकेचे ज्येेष्ठ संचालक सीताराम गायकर, जिल्हा परिषदेतील राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी गटनेते कैलास वाकचौरे, कारखान्याचे माजी अध्यक्ष प्रकाश मालुंजकर, राष्ट्रवादी युवकचे तालुकाध्यक्ष बबन वाळुंज, अकोले खरेदी-विक्री संघाचे अध्यक्ष प्रकाश नाईकवाडी आदी कार्यकर्त्यांनी मुंबईतील बैठकीला हजेरी लावून अजित पवार यांना साथ देण्याचा निर्णय घेतला आहे.

Visits: 4 Today: 1 Total: 22844

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *