साईबाबांचे निस्सीम भक्त पोपटराव इंगळे यांचे निधन! संगमनेरच्या साई परिवाराला शोक; वयाच्या 85 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास..
नायक वृत्तसेवा, संगमनेर
हजारों संगमनेरकर साईभक्तांचे श्रद्धास्थान असलेल्या पोपटराव इंगळे तथा पूज्य इंगळे बाबा यांचे आज सकाळी 11 वाजण्याच्या सुमारास निधन झाले. गेल्या पंधरवड्यात त्यांना कोविडचे संक्रमण झाले होते, त्यातून स्वस्थ झाल्यानंतर ते घरीही परतले होते. मात्र त्यांना पुन्हा अत्यवस्थ वाटू लागल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र त्यांच्या प्रकृतीत कोणतीही सुधारणा न झाल्याने आज त्यांना घरी सोडण्यात आले. त्यातच त्यांचे निधन झाले. त्यांच्या निधनाने संगमनेरातील असंख्य साईभक्तांना शोक अनावर झाला असून त्यांच्या अनुयायांनी अंतिम दर्शनासाठी साईनगरमध्ये गर्दी केली आहे.
गोरगरीब व वंचितांना शिक्षण देणार्या सिद्धार्थ हायस्कूलमध्ये शिक्षकाची नोकरी करुन विद्यार्थ्यांच्या जीवनात प्रकाश निर्माण करणार्या पोपटराव इंगळे यांनी 1996 साली निवृत्ती स्वीकारली. त्यानंतर ते संगमनेरात निर्माण झालेल्या साई मंदिराचे व्यवस्थापन पाहू लागले. साई परिवार आणि इंगळे बाबा हे सूत्र गेल्या तीन दशकांपासून हजारों संगमनेरकरांनी प्रत्यक्ष अनुभवले आहे. साईबाबांच्या दर्शनाला जाणारा प्रत्येक साईभक्त इंगळेबाबांना हमखास भेटत व त्यांच्याकडून ज्ञानार्जन करण्याचा प्रयत्न करीत.
मागील पंधरा दिवसांपूर्वी त्यांना कोविडची लागण णाल्याने खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. आपल्या पबळ इच्छाशक्तिच्या बळावर त्यांनी कोविडवर मात करुन पुन्हा घरही गाठले होते. मात्र त्यानंतर त्यांची प्रकृती खालावत गेल्याने त्यांना पुन्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांच्या प्रकृतीत सुधारणा होत नसल्याने आज (ता.20) सकाळी त्यांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आले. घरी आणल्यानंतर काही वेळातच 11 वाजण्याच्या सुमारास ‘ओम साई राम’ म्हणत त्यांनी अखेरचा श्वास घेत जगाचा निरोप घेतला. त्यांच्या निधनाचे वृत्त समजतात त्यांच्या शेकडों अनुयायांनी त्यांच्या निवासस्थानाकडे धाव घेतली. इंगळेबाबा यांच्या पश्चात पत्नी, दोन मुली व जावई असा परिवार आहे. आज सायंकाळी चार वाजता त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे.
