जिल्ह्यात महिन्याभरात चोवीस हजार कोविड बाधितांची भर! महापालिका क्षेत्रात सर्वाधिक रुग्ण; कोविड मृत्यूंची संख्या मात्र नगण्य..

नायक वृत्तसेवा, संगमनेर
तिसर्‍या लाटेचा काळ समजल्या गेलेल्या जानेवारीत अहमदनगर जिल्ह्यात सरासरी 773 रुग्ण दररोज या गतीने 23 हजार 953 रुग्णांची भर पडली तर या कालावधीत जिल्ह्यातील 28 जणांचा कोविडने मृत्यू झाला. मागील तीन दिवसांत जिल्ह्याच्या बाधित संख्येत घट होवून रोजची संख्या तीन आकड्यात आलेली असताना सोमवारी पुन्हा एकदा जिल्ह्याने दीड हजारांचा आकडा गाठल्याने संक्रमणाचा वेग कायम असल्याचेही समोर आले आहे. मात्र इतक्या मोठ्या प्रमाणात रुग्ण समोर येवूनही जिल्ह्यातील कोणत्याही तालुक्यात आरोग्य सेवा फारशी प्रभावित झालेली नाही. वैद्यकीय जाणकारांच्या म्हणण्यानुसार सध्याचा व्हेरिएंट जीवघेणा नसल्याने कोविडबाबत सामान्यांच्या मनातील भीती गायब झाली असून सुमारे 90 टक्के रुग्ण खासगी डॉक्टरांच्या बाह्य रुग्ण विभागातूनच बरे झाले आहेत.

गेल्या महिन्याच्या पहिल्या चार दिवसांपर्यंत पूर्णतः नियंत्रणात असलेल्या जिल्ह्यातील कोविड बाधितांच्या संख्येने 5 जानेवारीपासून अचानक वेग घेतला आणि अवघ्या आठच दिवसांत सरासरी 55 वरुन दैनिक रुग्णसंख्येने साडेचारशेचा आकडा गाठला. नव्याने समोर येणार्‍या रुग्णांची संख्या लक्षात घेता प्रशासनाने जय्यत तयारीही केली होती. मात्र त्याचा फारसा उपयोग झाला नसल्याचे आता स्पष्ट झाले आहे. महिनाभराच्या कालावधीत जिल्ह्यात जवळपास 24 हजार रुग्ण आढळले, त्यातही असंख्य रुग्णांनी लक्षणे जाणवत असतांनाही कोविड चाचणी टाळून परस्पर खासगी डॉक्टरांच्या सल्ल्याने उपचार घेतल्याने त्यांची कोविड बाधित म्हणून कोठेही नोंद झाली नाही. ही संख्या समोर आलेल्या रुग्णांपेक्षा कितीतरी अधिक पटीने जास्त असण्याची शक्यताही या निमित्ताने वर्तविली गेली.

मागील 31 दिवसांत जिल्ह्यात अहमदनगर महापालिका क्षेत्रात उच्चांकी रुग्ण समोर आले. या क्षेत्रात दररोज रुग्ण समोर येण्याची सरासरी तब्बल 258 रुग्ण इतकी प्रचंड होती. त्यातून महिन्याभरात महापालिका क्षेत्रातील 8 हजार चार रुग्णांचे अहवाल पॉझिटिव्ह आले. त्या खालोखाल दुसर्‍या लाटेचा मोठा प्रभाव जाणवलेल्या राहाता तालुक्यातून सरासरी 58 रुग्णांच्या गतीने 1 हजार 785 बाधित आढळले. नगर तालुक्यातील सरासरी रुग्णवाढीचा वेगही या कालावधीत नियंत्रित राहून 31 दिवसांत तेथून सरासरी 52 रुग्णांच्या गतीने 1 हजार 618 रुग्णांची भर पडली. ग्रामीण क्षेत्रातील श्रीरामपूर व अकोले या दोन तालुक्यातील रुग्णगती अधिक होती. या कालावधीत श्रीरामपूरातून सरासरी 44 रुग्ण गतीने 1 हजार 355 तर 43 रुग्णगतीने अकोले तालुक्यातून 1 हजार 328 रुग्ण समोर आले.

दक्षिणेतील पारनेर व पाथर्डी तालुक्यांची सरासरी 39 वर टिकून 31 दिवसांत या तालुक्यातून अनुक्रमे 1 हजार 220 व 1 हजार 213 रुग्ण आढळले. तीस रुग्णांपेक्षा अधिक सरासरी असलेल्या तालुक्यात श्रीगोंद्याचाही समावेश असून तेथून सरासरी 33 रुग्णांच्या गतीने 1 हजार 36 रुग्ण सापडले. राहुरी (सरासरी 24) एकूण रुग्ण 737, संगमनेर (सरासरी 23) एकूण रुग्ण 719, शेवगाव (सरासरी 22) एकूण रुग्ण 683, कोपरगाव (सरासरी 22) एकूण रुग्ण 671, नेवासा (सरासरी 22) एकूण रुग्ण 667, कर्जत (सरासरी 14) एकूण रुग्ण 449 व जिल्ह्यात सर्वात कमी सरासरी 13 रुग्ण या गतीने जामखेड तालुक्यातून महिन्याभरात 399 रुग्ण आढळले. या कालावधीत जिल्ह्याची एकूण दैनिक सरासरी 54.75 रुग्ण प्रति दिवसावरुन थेट 773 रुग्ण दररोज या गतीवर जावून जिल्ह्यातून 23 हजार 953 रुग्ण समोर आले आले तर 28 जणांचा कोविडने बळी घेतला. जिल्ह्याच्या एकूण रुग्णसंख्येत अन्य जिल्ह्यातील रुग्णांचाही मोठा वाटा आहे. या कालावधीत इतर जिल्ह्यातील सरासरी 54 रुग्ण या गतीने 856 जणांना कोविडची लागण झाली, तर अन्य राज्यातील 124 जणांच्याही चाचण्या पॉझिटिव्ह आल्या. भिंगार लष्करी छावणीच्या परिसरातील 644 जणांना बाधा झाली, तर लश्करी रुग्णालयात उपचारांसाठी दाखल झालेल्या 445 जणांचे अहवालही पॉझिटिव्ह आले.

Visits: 9 Today: 1 Total: 118329

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *