प्लास्टिक पिशव्यांचा वापर करणार्या व्यापार्यांवर कारवाई! पालिका पथकाची गावभर तपासणी; तेहतीस हजारांचा दंडही केला वसूल

नायक वृत्तसेवा, संगमनेर
राज्यात बंदी असतांनाही आणि स्थानिक स्वराज्य संस्थांकडून वारंवार कारवाई होवूनही ग्राहकांना प्लास्टिक पिशव्यांचा मोह आवरत नसल्याचे पुन्हा एका समोर आले आहे. ग्राहकांची नाराजी नको म्हणून दुकानदार नाईलाजाने पर्यावरणाचा कर्दनकाळ ठरत असलेल्या प्लास्टिकची कास सोडीत नसल्याचेही या कारवाईतून दिसून आले आहे. पालिकेच्या पथकाने शुक्रवारी शहरातील सहा ठिकाणी कारवाई करीत प्लास्टिक पिशव्यांचा मोठा साठा जप्त करताना 33 हजार रुपये दंडही वसुल केला आहे. या कारवाईने शहरातील व्यापारीवर्गात खळबळ उडाली आहे.

राज्य सरकारने 2018 साली अधिसूचना प्रसिद्ध करुन 50 मायक्रोनपेक्षा कमी जाडीच्या आणि आठ बाय बारा इंच आकारापेक्षा कमी असलेल्या प्लास्टिक पिशव्यांसह प्लास्टिकपासून तयार होणार्या पत्रावळी, ग्लास, वाट्या, शितपेये पिण्यासाठी वापरल्या जाणार्या नळ्या (स्ट्रॉ) यासह थर्मोकोलच्या वस्तुंचे उत्पादन, साठवणूक व विक्रीला राज्यात पूर्णतः बंदी घातली होती. बंदी घालण्यात आलेल्या प्लास्टिकचा वापर होवू नये यासाठी पहिल्यांदा त्याचा साठा सापडल्यास 5 हजारांचा दंड, दुसर्यांदा 10 हजारांचा दंड आणि तिसर्यांदा 25 हजारांच्या दंडासह तीन महिने कारावासाच्या शिक्षेची तरतूद करण्यात आली आहे.

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या मुख्य अधिकार्यांना या कारवाईसाठी अधिकार प्रदान करण्यात आले असून त्या अनुषंगाने संगमनेर नगर पालिकेचे मुख्याधिकारी डॉ.सचिन बांगर यांच्या नेतृत्त्वाखाली हा कायदा अंमलात आल्यापासून शहरात वारंवार कारवाई करण्यात आली आहे. मात्र त्याउपरांतही संगमनेरातील प्लास्टिकचा वापर कमी होत नसल्याचे शुक्रवारच्या धडक कारवाईतून पुन्हा एकदा समोर आले आहे. या कारवाईनंतर अनेकांनी आपल्या दुकानातील प्लास्टिकचा साठा अन्यत्र हलविला, तर काहींनी कारवाईच्या भितीने दुकानातील पिशव्या थेट कचराकुंडीत नेवून टाकल्या.

शुक्रवारच्या कारवाईत पालिकेच्या पथकाला प्रदीपकुमार माणकचंद पारख यांच्याकडे प्लास्टिक पिशव्यांचा मोठा साठा सापडला. त्यामुळे त्यांना 12 हजार रुपयांचा दंड करण्यात आला. पंजाबी कॉलनीतील तनेश पंजाबी, सय्यदबाबा चौकातील इनामदार ट्रेडर्स व इक्बालसिंग बत्रा या तिघांना प्रत्येकी पाच हजार रुपये तर मनोकामना क्लॉथ सेंटर या दुकानाला एक हजारांचा दंड केला आहे. पालिकेच्या पथकाने शुक्रवारी राबविलेल्या या धडक कारवाईने बंदी असतानाही प्लास्टिकच्या पिशव्या व अन्य वस्तू वापरणार्या दुकानदारांमध्ये एकच खळबळ उडाली होती. अनेकांनी घाईगडबडीत दुकानातील कॅरीबॅग कचराकुंडीत नेवून फेकण्याचे प्रकारही समोर आले. शुक्रवारच्या कारवाईतून पालिकेने व्यापार्यांकडून 33 हजारांच्या दंडाची वसुली केली आहे. या पथकात आरोग्य निरीक्षक अश्विन पुंड, अतिक्रमण पथकाचे प्रमुख सुदाम सातपुते, अरविंद गुजर, राजेंद्र सूरग व अन्य कर्मचार्यांचा सहभाग होता.

23 मार्च, 2018 पासून राज्यात 50 मायक्रोनपेक्षा कमी जाडीच्या प्लास्टिकवर संपूर्ण बंदी आहे. सदरचा कायदा अस्तित्त्वात येवून तीन वर्षांचा कालावधी झाला आहे. या कालावधीत पाकिा प्रशानाने शहरात वारंवार कारवाया करुन मोठी दंड वसुली केली आहे. मात्र त्यानंतरही बंदी असलेले प्लास्टिक संगमनेरातून अद्यापही हद्दपार झाले नसल्याचे शुक्रवारच्या कारवाईतून स्पष्ट झाले आहे. इतक्या मोठ्या कालावधीनंतरही शहरात बंदी असलेले प्लास्टिक विक्रेते आणि वापरकर्ते आढळत असल्याने पालिकेला केवळ दंड हवाय की मनापासून प्लास्टिक मुक्ती हे स्पष्ट होण्याची गरजही आता उभी राहिली आहे.

