संगमनेरातील गोवंश कत्तलखान्यावर पोलिसांचा पुन्हा छापा! आठ दिवसांत एकाच कसायावर दुसरी कारवाई; साडेचारशे किलो मांस हस्तगत


नायक वृत्तसेवा, संगमनेर
संगमनेरातील कसायांना पोलिसांचा धाकच उरला नसल्याचे पुन्हा एकदा समोर आले असून आज पहाटे झालेल्या कारवाईतून ते सिद्धही झाले आहे. आज (ता.16) शहर पोलिसांच्या पथकाने जमजम कॉलनीत घातलेल्या छाप्यात मोठ्या प्रमाणात गोवंशाचे मांस हस्तगत झाले असून कत्तलखान्याचा चालक मात्र नेहमीप्रमाणे पोलिसांच्या हातावर तुर्‍या ठेवून पसार झाला आहे. यापूर्वी 7 मे रोजी समनापूर शिवारातील छाप्यात सापडलेली 69 गोवंश जनावरेही याच कसायाची होती, मात्र पोलिसांना त्याच्या नावाशिवाय अद्याप त्याची अधिक माहिती मिळवता आली नसल्याने या कारवाया चर्चेचा विषय ठरत आहेत. राजीक रज्जाक शेख असे गुन्हा दाखल झालेल्या कसायाचे नाव असून मागील आठ दिवसांत त्याच्यावरील हा दुसरा गुन्हा आहे.

याबाबत संगमनेर शहर पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार शहरालगतच्या जमजम कॉलनीत मोठ्या प्रमाणात गोवंश जनावरांची कत्तल झाल्याची माहिती पोलीस निरीक्षक भगवान मथुरे यांना समजली होती. त्यानुसार त्यांनी आपल्या पथकाला कारवाईचे आदेश दिल्यानंतर पहाटे दीड वाजण्याच्या सुमारास पोलिसांनी तेथे छापा घातला. यावेळी एका पत्र्याच्या शेडमध्ये अनेक गोवंश जनावरांची कत्तल करुन त्यांचे मांस साठवून ठेवल्याचे पोलिसांना दिसले, मात्र नेहमीप्रमाणे आरोपी तेथून पसार होण्यात यशस्वी ठरला. पोलिसांनी घटनास्थळावरुन सुमारे साडेचारशे किलो गोवंशाचे कापलेले मांस हस्तगत केले आहे.

याप्रकरणी पोलीस शिपाई महादू खाडे यांच्या फिर्यादीवरुन शहर पोलिसांनी आरोपी राजीक रज्जाक शेख (रा.संगमनेर) याच्याविरोधात महाराष्ट्र गोवंश हत्याबंदी कायद्यासह प्राणी संरक्षण कायद्यान्वये गुन्हा दाखल केला असून या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस नाईक गायकवाड यांच्याकडे देण्यात आला आहे. या कारवाईत सहाय्यक पोलीस निरीक्षक राजेंद्र पवार, पोलीस उपनिरीक्षक विठ्ठल पवार यांच्यासह पोलीस कर्मचार्‍यांचा समावेश होता.

यापूर्वी गेल्या 7 मे रोजी समनापूर शिवारातील हॉटेल सासुरवाडी नजीक असलेल्या एका मोठ्या पत्र्याच्या शेडमध्ये कत्तलीसाठी जनावरे बांधून ठेवल्याची माहिती काहींनी पोलिसांना दिली होती. त्यानुसार पोलिसांनी त्याच दिवशी सायंकाळी सातच्या सुमारास तेथे छापा घातला असता सदरील शेडमध्ये अत्यंत निर्दयीपणाने 68 गोवंश जनावरांसह एक गाय बांधून ठेवल्याचे पथकाला आढळले. त्यासर्व जनावरांची तेथून सुटका करुन त्यांना गोरक्षण संस्थेत पाठविल्यानंतर ‘त्या’ प्रकरणात पोलिसांनी राजीक रज्जाक शेख या कसाया विरोधात गुन्हा दाखल केला होता, मात्र या घटनेला आठ दिवसांचा कालावधी लोटूनही पोलिसांनी आरोपीवर कारवाई न केल्याने त्याचे मनोबल वाढले आहे.

आज (ता.16) पोलिसांनी जमजम कॉलनीत घातलेल्या छाप्यात साडेचारशे किलो गोवंशाचे मांस हस्तगत झाले आहे. सदरील कत्तलखाना राजीक रज्जाक शेख हाच चालवत असल्याचेही समोर आले आहे. आठच दिवसांपूर्वी गुन्हा दाखल होवूनही या कसायाच्या मनात कायद्याची भिती निर्माण झाली नसल्यानेच त्याने इतक्या जनावरांची कत्तल केल्याचेही आता उघड झाले असून त्यातून कसायांसह गुन्हेगारांवरील पोलिसांचा धाक संपुष्टात आल्याचेच दिसून येत आहे. शिर्डी पोलीस ठाण्यात बदली होवूनही शहर पोलीस ठाण्यात कार्यरत असलेला एक कर्मचारी हे सगळे प्रकार घडवून आणीत असल्याचेही यानिमित्ताने समोर आले असून सदरील कर्मचार्‍याची बदली होवून मोठा काल उलटला तरीही त्याला येथून सोडले जात नसल्याने आश्चर्यही व्यक्त केले जात आहे.

Visits: 193 Today: 1 Total: 1594472

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *