अकोले तालुक्यातील नागरिक कोरोनाला अजूनही गांभीर्याने घेईनात…
अकोले तालुक्यातील नागरिक कोरोनाला अजूनही गांभीर्याने घेईनात…
धार्मिक कार्यक्रम आणि वाढदिवस कोरोना संक्रमणासाठी ठरताहेत कारणीभूत
नायक वृत्तसेवा, अकोले
अहमदनगर जिल्ह्यातील कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढतच चालला आहे. संगमनेर, कोपरगाव, राहुरी, नेवासा, राहाता तालुक्यासह अकोले तालुक्यातही कोरोना विषाणूचा संसर्ग झपाट्याने होत आहे. गेल्या महिन्यातील गणेशोत्सव, मोहरम आणि आत्ताचा पितृ पंधरवडा व वाढदिवस कारणीभूत ठरत आहे. यामुळे नागरिक अजूनही कोरोनाला गांभीर्याने घेत नसल्याचे स्पष्ट होत आहे. एकीकडे प्रशासन कोरोना रोखण्यासाठी कर्तव्यापासून तसूभरही बाजूला न जाता दिवस-रात्र कर्तव्य निभावत आहेत. तर नागरिक टाळेबंदीतील शिथिलतेचा फायदा उठवून प्रशासनाच्या लढ्याला कमजोर करत आहे. जर गांभीर्यहीन नागरिकांचे वर्तन असेच चालू राहिले तर कोरोनाचा विस्फोट होण्याची शक्यता आहे.

कोरोना विषाणूंनी अवघ्या जगाला विळखा घातला आहे. देश आणि राज्यात रोज बाधितांचा आकडा वाढत आहे. अहमदनगर जिल्ह्याचाही आलेख रोज उंचावत आहे. कोरोनाचे केंद्र बनलेल्या संगमनेरसह आता अकोले तालुकाही केंद्र बनू पाहत आहे. 22 ऑगस्टपासून सुरू झालेला कोरोनाचा प्रवास 22 तारखेला 12 तर त्यापासून पुढे प्रत्येक दिवशी 8, 27, 41, 40, 13, 8, 3, 15, 20, 6, 18, 18, 8, 47, 20 सोमवारपर्यंत (ता.7) 52 असा राहिला आहे. यास राजूर येथील पित्राचे जेवण व रविवारी शेंडी (भंडारदरा) येथील वाढदिवस कारणीभूत ठरला आहे. सोमवारी (ता.7) दिवसभरात तब्बल 52 व्यक्तींना कोरोनाची बाधा झाली आहे. गेल्या महिन्यातील गणेशोत्सव, मोहरम आणि आत्ताचा पितृ पंधरवडा संक्रमणास कारणीभूत ठरत आहे. तालुक्यातील राजूर येथे असाच प्रकार घडला आहे; त्याची शिक्षा संपूर्ण ग्रामस्थांना झाली असून गाव पाच दिवस टाळेबंदीत राहणार आहे. येथील एका घरी पित्र होते. या पित्राच्या जेवणानंतर अनेकांना सर्दी, खोकला व ताप असा त्रास जाणवू लागला. त्यामुळे प्रशासनाची एकच धांदल उडाली. त्यातील 47 व्यक्तींची कोरोना तपासणी करण्यात आली, त्यापैकी 18 व्यक्तींचा कोरोना अहवाल सकारात्मक (पॉझिटिव्ह) आला आहे. यामुळे प्रशासन, सरपंच, तलाठी, ग्रामसेवक व पोलिसांनी तातडीने बैठक घेऊन राजूर गाव पाच दिवस संपूर्ण टाळेबंदीत ठेवण्याचा निर्णय घेतला.

दरम्यान, रविवारी शेंडी (भंडारदरा) येथील एका उत्साही तरूणाचा वाढदिवस होता. त्याचे सिंचन वसाहतीमधील एका हॉटेलमध्ये आयोजन करण्यात आले होते. ही पार्टी झाल्यानंतर सोमवारी सकाळी हॉटेल मालकाच्या घरातील व्यक्तींना सर्दी, खोकला व ताप अशी लक्षणे दिसू लागली. यामुळे वैद्यकीय अधिकारी डॉ.संतोष चोळके यांनी तातडीने या व्यक्तींना अकोले व संगमनेर येथे नेऊन त्यांची कोरोना चाचणी केली. त्यामध्ये हॉटेल मालकाच्या घरातील पाच व इतर अकरा व्यक्तींना कोरोना संसर्ग झाल्याचे स्पष्ट झाले. विशेष म्हणजे या पार्टीला जवळपास पन्नास जणांची उपस्थिती होती. आता प्रशासनाने तातडीने शोध मोहीम हाती घेतली असून पार्टीमध्ये उपस्थित असलेल्या व त्यांच्या संपर्कातील व्यक्तींना घरीच विलगीकरणात राहण्यास सांगितले आहे. तसेच शेंडी येथे प्रतिबंधित क्षेत्र जाहीर करण्यात आले आहे. यामुळे अकोले तालुक्यातील कोरोना बाधितांची एकूण संख्या 727 झाली असून यापैकी सध्या 149 सक्रीय रुग्णांवर उपचार चालू आहेत. तर 567 व्यक्ती यशस्वी उपचारांती घरवापसी झाली आहे. आणि 11 व्यक्तींचा बळी गेला आहे.

सामाजिक, राजकीय व धार्मिक कार्यक्रमानिमित्त एकत्र येणार्या नागरिकांपैकी काहींची प्रतिकारशक्ती उत्तम असल्याने त्यांना तात्काळ कोरोनाची लक्षणे दिसत नाहीत. परंतु ते कोरोना विषाणूवाहक असतात. यामुळे कमी प्रतिकारशक्ती असलेल्यांना बाधा होऊन हा आकडा पुढे आणखी फुगतो. तर उत्तम प्रतिकारशक्ती असणारे नागरिक तोपर्यंत अनेकांनाही बाधा पोहोचवितात. यासाठी नागरिकांनी अधिक सतर्क आणि जागरुक राहून कोरोना संसर्ग टाळण्यासाठी स्वयंशिस्त पाळणे गरजेची आहे. अन्यथा कोरोना संक्रमणाची श्रृंखला अबाधितच राहील.

