पुणे-नाशिक महामार्गावरील खड्डे पंधरा दिवसांत बुजवा; अन्यथा टोलबंद आंदोलन

पुणे-नाशिक महामार्गावरील खड्डे पंधरा दिवसांत बुजवा; अन्यथा टोलबंद आंदोलन
तालुका युवक काँग्रेस व एनएसयूआयचे हिवरगाव पावसा येथील टोल कंपनीस निवेदन
नायक वृत्तसेवा, संगमनेर
पुणे- नाशिक राष्ट्रीय महामार्गावर पावसामुळे अनेक खड्डे पडले आहेत. यामुळे प्रवाशांना मोठा त्रास होत आहे. हे खड्डे 15 दिवसांच्या आत बुजविण्याबाबत महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे अध्यक्ष सत्यजीत तांबे यांचे मार्गदर्शनाखाली संगमनेर तालुका युवक काँग्रेस व तालुका एनएसयूआय यांच्यावतीने शुक्रवारी (ता.11) निवेदन देण्यात आले.


हिवरगाव पावसा येथील टोल कंपनी आयएलएफएस यांना हे निवेदन देण्यात आले असून यावेळी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सोमेश्वर दिवटे, एनएसयूआयचे जिल्हाध्यक्ष निखील पापडेजा, एनएसयूआयचे तालुकाध्यक्ष गौरव डोंगरे, युवक काँग्रेसचे अध्यक्ष आनंद वर्पे, कारखाना संचालक रमेश गुंजाळ, विजय रहाणे, संतोष मांडेकर, हर्षल रहाणे आदी उपस्थित होते.


नाशिक-पुणे राष्ट्रीय महामार्गावर कर्‍हे घाट ते बोटा खिंड परिसरात सतत पडत असणार्‍या पावसामुळे अनेक खड्डे पडले आहेत. या महामार्गावर पडलेल्या खड्ड्यांत सध्या पावसाचे पाणी साचले जात आहे. त्यामुळे वाहनचालकांना महामार्गावरील खड्डे चुकविताना तारेवरची कसरत करावी लागत आहे. तसेच खड्डे चुकविण्याच्या नादामध्ये अपघात होण्याची दाट शक्यता आहे. या सर्व परिस्थितीचा विचार करता पुणे-नाशिक राष्ट्रीय महामार्गावरील कर्‍हे घाट ते बोटा खिंड परिसरातील खड्डे 15 दिवसांच्या आत दुरुस्त करावेत व रस्त्यांची चांगल्या प्रकारे डागडुजी करावी. अन्यथा 25 सप्टेंबर, 2020 रोजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली व महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे अध्यक्ष सत्यजीत तांबे यांच्या नेतृत्वाखाली टोल बंद आंदोलन करण्यात येईल, असा इशाराही युवक काँग्रेसच्यावतीने टोल प्रशासनाला देण्यात आला आहे.

Visits: 11 Today: 1 Total: 116726

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *