सेवाश्रमातील वृद्धांसह पुरोहित प्रतिष्ठानची दिवाळी सनई चौघडे व मंत्रोच्चारांच्या घोषात फराळ वाटप

नायक वृत्तसेवा, संगमनेर
दीपावलीनिमित्त पुरोहित प्रतिष्ठानने विविध सामाजिक उपक्रम राबवून आदर्श निर्माण केला. सेवाश्रम वृद्धाश्रमात निराधार ज्येष्ठ नागरिकांच्या सोबत दिवाळी साजरी करून त्यांचा आनंद द्विगुणीत केला.

सेवाश्रमातील वृध्द म्हणजे निराधार नसून तेच आमचे माता पिता आहेत असे आम्ही मानतो. येथून पुढे सर्व दीपावली सण आम्ही येथेच साजरे करण्याचा संकल्प केला आहे. सेवाश्रम संस्थेचे कार्य अतिशय उल्लेखनीय असून या संस्थेच्या पाठिशी पुरोहित संघ भक्कमपणे उभा राहील’ असे आश्वासन पुरोहित प्रतिष्ठानचे अध्यक्ष भाऊ जाखडी यांनी येथे दिले.

संगमनेरमधील पुरोहित प्रतिष्ठानच्यावतीने नाशिक-पुणे राष्ट्रीय महामार्गावरील सेवाश्रम वृद्धाश्रमातील वृद्धांसोबत दीपावलीचा सण साजरा करण्यात आला. संघाच्यावतीने तेथील वृद्धांची आस्थेने विचारपूस करण्यात येऊन त्यांना आणि फराळाचे वाटप करण्यात आले. सनई चौघड्यांच्या मंजूळ स्वरात तेथे आकाशकंदील लावून दिवाळीच्या शुभेच्छा दिल्याने सर्व वृद्धांच्या चेहर्‍यावर आनंद झळकला. या वृद्धांचे उजळलेले चेहरे पाहून आम्हांला मिळालेले समाधान अवर्णनीय आहे असे जाखडी म्हणाले. पुरोहित संघाने ज्या आपुलकीच्या ओलाव्याने आमची दिवाळी साजरी केली ती पाहून आम्ही भारावून गेलो आहोत. कुटुंबातील सदस्य समजून त्यांनी आमचे कोडकौतुक केले. त्यामुळे आमचे डोळे आनंदाने पाणावले अशी भावना वृद्धांनी व्यक्त केली.

सेवाश्रमचे व्यवस्थापक थिटे यांनी संस्थेच्यावतीने पुरोहित संघाला धन्यवाद दिले. तसेच यावर्षी दिवळीपूर्वी ज्यांच्या घरामध्ये दुःखद निधनाची घटना घडलेल्या न्याती बांधवांना चहापाणीसह फराळ देण्यात आला व दुःखामध्ये सहभागी आहोत अशी भावना पुरोहित संघाने व्यक्त केली. यावेळी संघाचे अध्यक्ष भाऊ जाखडी, उपाध्यक्ष संदीप वैद्य, अरुण कुलकर्णी, विशाल जाखडी, सागर काळे, रवी तिवारी, प्रतीक जोशी, बापू दाणी उपस्थित होते. यावेळी खास मुंबईहून सुहास बेलापूरकर हेही उपस्थित होते. हिवाळ्यात या वृद्धांना नवीन उबदार कपडे देण्याचा संकल्प संघाच्या सदस्यांनी यावेळी व्यक्त केला.

Visits: 377 Today: 1 Total: 1982105

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *