चप्पल दुरूस्तीचे पैसे मागितल्याने केला खून वांबोरी येथील घटना; राहुरी पोलिसांत गुन्हा दाखल

नायक वृत्तसेवा, राहुरी
चप्पल दुरूस्तीचे 20 रूपये मागितल्याचा राग आल्याने विलास कांबळे यांना बेदम मारहाण केल्याची घटना 20 सप्टेंबरला वांबोरी (ता. राहुरी) येथे घडली होती. तेव्हापासून विलास कांबळे यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू होते. अखेर त्यांचा मृत्यू झाला आहे. यामुळे मारहाण करणार्या आरोपीवर खुनाचा गुन्हा दाखल केल्याशिवाय अंत्यविधी करणार नाही असा पवित्रा मयताच्या नातेवाईकांनी घेतल्याने काहीकाळ तणावाचे वातावरण निर्माण झाल्याने खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला.

राहुरी तालुक्यातील वांबोरी येथील खडांबे नाक्याजवळ 20 सप्टेंबरला विलास नारायण कांबळे यांनी नेहमी प्रमाणे चप्पल दुरूस्तीचे दुकान लावले होते. तेव्हा आरोपी भाऊसाहेब वाघमारे हा त्यांच्याकडे चप्पल दुरूस्तीसाठी गेला. चप्पल दुरुस्ती झाल्यानंतर विलास कांबळे यांनी त्यांच्या मजुरीचे 20 रूपये मागितले. आरोपीला त्याचा राग आल्याने त्याने खिळे ठोकण्याचा लोखंडी बत्ता विलास कांबळे यांच्या डोक्यावर मारून बेदम मारहाण केली. तेव्हापासून विलास कांबळे यांच्यावर अहमदनगर येथील रुग्णालयात उपचार सुरू होते. उपचारादरम्यान 29 सप्टेंबरला त्यांचा मृत्यू झाला.

शुक्रवारी (ता.30) सकाळी चर्मकार विकास संघाच्या कार्यकर्त्या सुरेखा देवरे, बाळासाहेब गोळेकर, विठ्ठल देवरे, कैलास वाघमारे, गणेश कानडे, किरण घनदाट, भीमराज तेलोरे, रवींद्र आहेर, बाळकृष्ण वाघ, प्रमोद वर्पे, बाळासाहेब वाघ, विशाल ठोकळ यांनी निवेदन देऊन नातेवाईकांसह राहुरी पोलीस ठाण्यासमोर ठिय्या मांडून आरोपीवर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात यावा, तोपर्यंत अंत्यविधी करणार नाही असा पवित्रा घेतल्याने काहीकाळ तवाण निर्माण झाला होता. अखेर गोरक्षनाथ विलास कांबळे यांच्या फिर्यादीवरून आरोपी भाऊसाहेब किसन वाघमारे (रा. मांजरसुंबा, ता. नगर) याच्यावर खुनाचा गुन्हा दाखल करुन त्याला ताबडतोब ताब्यात घेऊन गजाआड केले. घटनास्थळी श्रीरामपूर विभागाचे पोलीस उपाधीक्षक संदीप मिटके, पोलीस निरीक्षक प्रताप दराडे यांनी भेट देवून पाहणी केली. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक चारूदत्त खोंडे हे करीत आहे.
