रुग्णालयातील स्थानिकांचे प्रश्न तत्काळ सोडवा : मते एसएमबीटी ट्रस्ट व्यवस्थापनाला मनसेचे निवेदन


नायक वृत्तसेवा, संगमनेर
उत्तर महाराष्ट्रात नव्हे तर राज्यभरात शिक्षण आणि आरोग्यासाठी प्रचलित असलेल्या एसएमबीटी सेवाभावी ट्रस्टला इगतपुरी महाराष्ट्र नवनिर्माण सेना विद्यार्थी सेनेच्यावतीने विविध मागण्या स्थानिकांचे प्रश्न या संदर्भात निवेदन देण्यात आले.

इगतपुरी तालुक्यातील सुशिक्षित बेरोजगार कामगार तरुणांना पन्नास टक्के रोजगार उपलब्ध करून देण्यात यावा, स्थानिक विद्यार्थ्यांना नवीन प्रवेश प्रक्रियेसाठी 50 टक्के आरक्षित कोटा उपलब्ध करून द्यावा व प्रवेश प्रक्रियेत होतकरू गोरगरीब विद्यार्थ्यांना प्राधान्य द्यावे, आपल्या रुग्णालयात उपचारांसाठी दाखल झालेले रुग्ण व त्यांचे नातेवाईक यांची होत असलेली गैरसोय थांबविण्यात यावी, आपल्या रुग्णालयातील कामगारांची पॉलिसी दर पाच वर्षांनी बदलते परंतु 2014 पासून ते आजपर्यंत पॉलिसी बदलल्या गेली नाही. बदल झाला असेल तर तो नवीन कामगारांचाच का? जुन्या कामगारांची का नाही? आपल्याकडे कार्यरत असलेल्या कामगारांना जॉईंट पत्र दिले नसेल तर ते द्यावे, प्रत्येक कामगाराची विमा फाईल द्यावी, जुन्या कामगारांच्या वेतनात वाढ करावी, आपल्या रुग्णालयातील सांडपाणी हे शेजारील जाधववाडी, लोहरेवाडी, घोटी खुर्द भागातील परिसरातील शेतकर्‍यांच्या शेतात जात आहे परिणामी यामुळे येथील शेतकरी बांधवांचे शेतीसह आरोग्य धोक्यात आले आहे. या कारणास्तव दूषित सांडपाण्याचे योग्य व्यवस्थापन करावे, अशा मागणी निवेदनातून करण्यात आल्या आहेत.

दरम्यान यावेळी एसएमबीटी सेवाभावी संस्थेचे व्यवस्थापक श्रीराम कुर्‍हे यांच्याशी मनसे शिष्टमंडळाची विविधांगी प्रश्नांवर चर्चा झाली. यात मनसेचे आत्मराम मते, अशोक गाढवे यांनी गोरगरीब सर्वसामान्य नागरिक, विद्यार्थी व कर्मचार्‍यांच्या अनेक विषयांवर चर्चा केली व त्यांच्या समस्या सोडविण्याची मागणी केली. त्यावर कुर्‍हे यांनी आश्वासन दिले. यावेळी मनसेचे विद्यार्थी सेनेचे माजी जिल्हा उपाध्यक्ष आत्माराम मते, मनविसे विधानसभा अध्यक्ष गणेश मुसळे, अध्यक्ष चंद्रभान फोकणे, अशोक गाढवे, बाजीराव गायकर, सागर गाढवे, दत्तू शिंदे, धनाजी कोकणे, अंकुश जाधव, प्रकाश वाकचौरे, संदीप रोडे आदिंसह कार्यकर्ते उपस्थित होते.

Visits: 10 Today: 2 Total: 79308

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *