उठा उठा दिवाळी आली; खड्डे बुजवायची वेळ झाली ः जाखडी नागरिकांना सोबत घेऊन जनआंदोलन उभारण्याही दिला इशारा
नायक वृत्तसेवा, संगमनेर
संगमनेरमधील प्रत्येक रस्ता धोकादायक खड्ड्यांमुळे नागरिकांच्या जीवाला धोका निर्माण करणारा झाला आहे. दिवाळीचा सण चार दिवसांवर येऊन ठेपला आहे. आता तरी पालिका प्रशासनाने जागे व्हावे आणि खड्डे बुजविण्याची मोहीम युद्ध पातळीवर हाती घ्यावी अशी मागणी पुरोहित प्रतिष्ठानचे अध्यक्ष भाऊ जाखडी यांनी केली आहे.
मागील सात-आठ महिन्यांपासून संगमनेरमध्ये रस्ता दुरुस्तीची कामे सुरू आहेत. भूमिगत गटारींची कामेही सुरू आहेत. मात्र या कामांना अजिबात वेग नसल्याने अजूनही अनेक ठिकाणी अपूर्ण अवस्थेत ही कामे पडलेली आहेत. नव्यानेच करण्यात आलेल्या अनेक रस्त्यांनाही मोठ्या प्रमाणात खड्डे पडले आहेत. त्यामुळे नागरिकांना जीव मुठीत घेऊन चालावे लागत आहे. विशेषतः महिला विद्यार्थी आणि ज्येष्ठ नागरिक यांचे प्रचंड हाल होत आहेत.
पालिका प्रशासन मात्र याकडे साफ दुर्लक्ष करीत असल्याबद्दल जाखडी यांनी तीव्र शब्दांत नाराजी व्यक्त केली आहे. खरेतर पालिकेच्या मुख्याधिकार्यांनी संगमनेरमधील प्रत्येक गल्लीबोळामध्ये स्वतः फेरफटका मारणे अपेक्षित आहे. त्यातूनच त्यांना रस्त्यांची खरी परिस्थिती कळू शकेल ज्याप्रमाणे घरपट्टी आणि नळपट्टी नागरिकांकडून वसूल घेण्यासाठी पालिका प्रशासन सदैव घाई घाई कार्यवाही करीत असते त्याप्रमाणेच उत्तम रस्ते सर्वांना मिळावेत आणि नागरिकांना कमीत कमी त्रास व्हावा हेही पालिकेचे कर्तव्य आहे. मात्र ते कर्तव्य बजावताना पालिकेचे प्रशासन सध्या तरी दिसत नाही. कोट्यवधी रुपयांचा कर भरणारे नागरिक हजारो खड्ड्यांमधून कशीबशी वाट काढत आपले दैनंदिन कामकाज करीत आहेत. नागरिकांच्या मनातील तीव्र नाराजीला पुरोहित प्रतिष्ठानच्या माध्यमातून वाट करून दिली आहे. पालिका प्रशासनाने याची दखल न घेतल्यास लवकरच सर्व लोकांना सोबत घेऊन मोठे जनआंदोलन उभारले जाईल असा इशाराही देण्यात आला आहे.