आरोग्य धोक्यात येऊ नये यासाठी उपाययोजना करा : आ. खताळ


नायक वृत्तसेवा, संगमनेर
संगमनेर खुर्द परिसरातील कचरा डेपोला आग लागली होती. वाढते वायु प्रदुषण आटोक्यात आणण्यासाठी, व स्थानिक नागरिकांचे आरोग्य धोक्यात येऊ नये यासाठी नगरविकास खात्यामार्फत काय प्रतिबंधात्मक उपाय योजना केली असा सवाल करत या कचर्‍यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात येऊ नये यासाठी उपाययोजना कराव्यात अशी मागणी आमदार अमोल खताळ यांनी विधानसभेत तारांकित प्रश्न उपस्थित करत केली.


मुंबई येथे विधानसभेचे पावसाळी अधिवेशन सुरू आहे. या अधिवेशनाचा दुसर्‍या आठवड्यातील पहिल्या दिवसातील तारांकित प्रश्न मांडताना आ. खताळ म्हणाले की, संगमनेर शहरातील गोळा होणारा सर्व कचरा घंटागाड्यांमधून संगमनेर खुर्द येथील कचरा डेपो मध्ये टाकला जातो. त्यावर शास्त्रोक्त पद्धतीने प्रक्रिया सुद्धा केली जात नाही. याकडे नगरपालिका प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे. मार्च महिन्यामध्ये या कचरा डेपोला भीषण आग लागून वायु प्रदूषणात वाढ होऊन या परिसरातील नागरीकांना श्वास घेणे त्रासदायक झाले असल्याचे निदर्शनास आले होते. या कचरा डेपोतून मिथेन गॅस पसरत असल्यामुळे परिसरात राहत असणार्‍या नागरीकांना श्वसनाचे विकार, त्वचा व संसर्गजन्य रोग यासारखे आजार उद्भवत असल्याच्या असंख्य तक्रारी परिसरातील नागरिकांनी आपल्याकडे केल्या होत्या. नगर पालिका प्रशासनाने याबाबत काय उपाय योजना केली असा सवाल आमदार खताळ यांनी उपस्थित केला.


आमदार खताळ यांच्या प्रश्नाला उत्तर देताना राज्याचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, संगमनेर खुर्द येथील कचरा डेपोला आग लागली होती. या कचरा डेपोतील आगीमुळे निर्माण होणार्‍या धुराने परिसरामध्ये राहणार्‍या नागरिकांना श्वसनासंबंधी त्रास होत असल्याबाबतच्या तक्रारी नगरपरिषदेस प्राप्त झाल्या नसल्याचे मंत्री एकनाथ शिंदे यांनी आमदार खताळ यांच्या प्रश्नाला उत्तर देताना सांगितले.

 

Visits: 109 Today: 1 Total: 1957021

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *