घराची भिंत कोसळून दोघे दगडाखाली दबले! खंदरमाळ येथील घटना; एकजण जखमी


नायक वृत्तसेवा, घारगाव
संगमनेर तालुक्यातील खंदरमाळवाडी येथे देवराम रामभाऊ दोंदे यांची भीज पावसामुळे घराची भिंत कोसळून दोघे भाऊ दगडाखाली दबले होते. त्यातील एकजण जखमी झाल्याची घटना सोमवारी (ता.17) संध्याकाळी सात वाजेच्या सुमारास घडली आहे.

खंदरमाळवाडी गावांतर्गत असलेल्या बोरबेटमळा दोंदे वस्ती येथे देवराम दोंदे वास्तव्यास आहे. सोमवारी संध्याकाळी संतोष व गणेश हे दोघे भाऊ घरामधील खाटेवर झोपलेले होते. दरम्यान, भीज पावसामुळे अचानक घराची भिंत आती बाजूने दोघा भावांच्या अंगावर पडली. त्यामध्ये मोठमोठे दगडं होते. त्यामुळे ते दबले गेले आणि त्यांनी मोठ्याने आरडाओरड केली. हा आरडाओरड ऐकून वडील देवराम व तिसरा भाऊ हे घाबरून गेले आणि त्यांनी घरात तत्काळ धाव घेतली तर समोर दोघेही दगडाखाली दबलेले होते.

त्यानंतर दोघा भावांनांही दगडाखालून बाहेर काढले. यामध्ये संतोषच्या डोक्याला मार लागला होता. आजूबाजूच्या तरूणांनी घराकडे धाव घेतली. त्यानंतर त्यांना औषधोपचारांसाठी घारगाव येथील खासगी दवाखान्यात हलविले होते. यामध्ये संतोष हा जखमी झाला आहे तर भिंत पडल्यामुळे संसारोपयोगी साहित्याचे नुकसान झाले आहे. केवळ आमचे दैव बलवत्तर असल्याने आम्ही दोघे भाऊ बालंबाल बचावलो असल्याचे प्रतिक्रिया त्यांनी दिली. दरम्यान भीज पावसामुळे पठारभागात अनेक घरांच्या भिंती पडल्या आहेत. त्यामुळे नागरिकांनी देखील खबरदारी घेणे गरजेची आहे.

Visits: 9 Today: 1 Total: 79425

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *