कोल्हारच्या गुटखा तस्कराकडून संगमनेरात मालाचा पुरवठा! पोलिसांच्या कारवाईत दीड लाखांचा मुद्देमाल हस्तगत; तिघांवर गुन्हा, दोघे अटकेत..


नायक वृत्तसेवा, संगमनेर
गुटख्याच्या दुष्परिणामांचा विचार करुन राज्य सरकारने महाराष्ट्रात गुटख्याचे उत्पादन, त्याची साठवणूक, वाहतूक, वितरण व विक्री करण्यास दहा वर्षांपूर्वी प्रतिबंध घातले. या निर्णयाने राज्य शासनाला आपल्या कोट्यावधी रुपयांच्या महसुलावर पाणी सोडावे लागले असतांना त्याची अंमलबजावणी करणार्‍या यंत्रणांची मात्र चांदी होत असल्याचे वेळोवेळी समोर आले आहे. बंदीनंतरही राज्यात सर्रास कोठेही मिळणार्‍या गुटख्यावरुन ही गोष्ट अधोरेखीतही होत आहे. यंत्रणांना हाताशी धरुन चालणार्‍या या उद्योगात आता अनेकांनी उड्या घेतल्या असून एक जेरबंद झाला की दुसरा उभा राहत असल्याचेही धक्कादायक चित्र यातून समोर आले आहे. असाच काहीसा प्रकार बुधवारी पोलिसांच्या कारवाईतून समोर आला असून कोल्हारच्या गुटखा तस्कराकडून आणलेला ‘हिरा’ तालुक्यात वितरीत करीत असलेल्या घुलेवाडीच्या दोघांना जेरबंद करण्यात आले आहे. या कारवाईत पोलिसांनी तिघांवर गुन्हा दाखल करुन दोघांना कोठडीत घातले असून तस्करीसाठी वापरल्या गेलेल्या चारचाकी वाहनासह दीड लाखांहून अधिक रुपयांचा मुद्देमालही हस्तगत करण्यात आला आहे.

याबाबत शहर पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार सदरची कारवाई बुधवारी (ता.12) उपविभागीय पोलीस अधिकार्‍यांच्या पथकाने संगमनेर-राजापूर रस्त्यावरील बोगद्याजवळ केली. याबाबत पोलीस उपअधीक्षक राहुल मदने यांना खबर्‍याकडून माहिती प्राप्त झाली होती. त्याची खातरजमा केल्यानंतर त्यांनी आपल्या पथकातील पोलीस नाईक अण्णासाहेब दातीर, पोलीस शिपाई सुभाष बोडखे, अमृत आढाव व प्रमोद गाडेकर यांना याबाबत कारवाईचे आदेश दिले होते. त्यानुसार त्यांच्या पथकाने सकाळी साडेदहा वाजण्याच्या सुमारास राजापूर रस्त्यावरील पुणे-नाशिक महामार्गाच्या बोगद्याजवळ सापळा लावला.

पोलीस पथकाने बराचवेळ प्रतीक्षा केल्यानंतर सकाळी साडेअकराच्या सुमारास मिळालेल्या वर्णनानुसार राजापूरच्या दिशेने एक वाहन येत असल्याचे पथकाने पाहिले. त्यानंतर सावध झालेल्या पोलिसांनी सदरचे वाहन आवाक्यात येताच त्याला थांबण्याचा इशारा केला. त्यानुसार थांबलेल्या मारुती ओमीनी (क्र.एम.एच.02/डी.एस.1032) वाहनातील दोघांना पथकाने आपली ओळख सांगत वाहनात काय आहे याची विचारणा केली. मात्र त्यांच्या बोलण्यात विसंगती आढळल्याने पोलिसांचा संशय वाढला. त्यामुळे त्या दोघांनाही वाहनाच्या खाली उतरवून त्यांच्या वाहनाची झडती घेण्यात आली.

या तपासणीत चालकाच्या पाठीमागील बाजूच्या दोन आसनांच्या मध्यभागी एक मोठी तपकिरी रंगाची गोणी पोलिसांना आढळली. त्यात मोठ्या प्रमाणात गुटखा असल्याचे समोर आल्यानंतर त्या दोघांनाही ताब्यात घेण्यात आले व तेथून सदरचे पथक थेट शहर पोलीस ठाण्यात पोहोचले. यावेळी ‘त्या’ गोणीतील गुटख्याची मोजदाद केली असता त्यात 8 हजार 760 रुपये किंमतीच्या ‘हिरा’ पान मसाल्याची 73 पाकिटे व त्यात मिसळण्यासाठी वापरली जाणारी 2 हजार 190 रुपये किंमतीच्या रॉयल 817 तंबाखूची तितकीच पाकिटे असा एकूण 10 हजार 950 रुपयांचा गुटखा व 1 लाख 50 हजार हजार रुपये किंमतीचे चारचाकी वाहन असा एकूण 1 लाख 60 हजार 950 रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला. यावेळी केलेल्या चौकशीत सदरचा माल कोल्हार (ता.राहाता) येथून आणल्याची माहिती ताब्यात घेतलेल्या दोघांनी दिली.

त्यानुसार पोलीस शिपाई अमृत आढाव यांनी शहर पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीवरुन पोलिसांनी किरण शिवाजी घारे (वय 26, रा.ओमशांती नगर, घुलेवाडी) व शहानवाज आसिफ इनामदार (वय 18, रा.साईबाबा वसाहत, घुलेवाडी) या दोघा वितरकांसह कोल्हार येथील मालाचा पुरवठादार जमीर पठाण या तिघांविरोधात भारतीय दंड संहितेच्या कलम 188, 272, 273, 328 सह अन्न सुरक्षा व मानके कायद्यान्वये त्या तिघांवर गुन्हा दाखल केला असून वाहनात पकडलेल्या दोघांना कारागृहात टाकले आहे, तर सदर मालाचा पुरवठादार जमीर पठाण (रा.कोल्हार) मात्र पसार झाला आहे. या कारवाईतून एकीकडे यंत्रणांमधील काही घटक गुटखा तस्करांना सामील असल्याचे पुन्हा एकदा सिद्ध झाले असून दुसरीकडे संगमनेरातील गुटखा तस्कर व विक्रेत्यांमध्येही खळबळ उडाली आहे.

मध्यंतरी अहमदनगरच्या अन्न व प्रशासन विभागाने संगमनेरातील एका छोट्या व्यावसायिकावर छापा घालून त्याच्याकडून अवघा दीड हजार रुपयांचा किरकोळ गुटखा जप्त करुन आपणच आपली पाठ थोपटून घेतली होती. विशेष म्हणजे संगमनेरात अनेक मोठे गुटखा तस्कर या गोरखधंद्यात असल्याची माहिती या विभागाकडे असतानाही त्यांनी हेतू ठेवून चक्क अहमदनगरहून संगमनेरात येवून केलेल्या या किरकोळ कारवाईच्या ‘मजेशीर’ चर्चाही संगमनेरात रंगल्या होत्या. आता संगमनेरच्या उपविभागीय पोलीस अधिकार्‍यांच्या पथकाने केलेल्या या कारवाईतून अन्न व प्रशासन विभागाचा कारभार कारभार पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे.

Visits: 3 Today: 1 Total: 23171

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *