नाशिक-पुणे महामार्गाच्या ‘चाळणीला’ आता ‘डांबराचे’ अस्तर! दैनिक नायकच्या वृत्तानंतर टोल प्लाझाकडून शास्त्रीय पद्धतीने खड्डे बुजविण्यास सुरुवात

नायक वृत्तसेवा, संगमनेर
वाहनांचा महापूर झेलणार्‍या आणि त्यातून ठेकेदाराला दररोज लाखोंची कमाई करुन देणार्‍या ‘पुणे-नाशिक’ महामार्गाची अक्षरशः चाळण झाली आहे. त्यावर उतारा म्हणून टोल प्लाझाने चक्क माती टाकून महामार्गावरील खड्डे बुजविण्याचा हास्यास्पद प्रयोग सुरू केला होता. दैनिक नायकने याबाबत सोमवारच्या अंकातून प्रकाश टाकल्यानंतर खडबडून जागे झालेल्या टोल प्लाझाने आता शास्त्रीय पद्धतीने खड्डे बुजविण्यास सुरुवात केल्याने वाहनचालकांमधून समाधान व्यक्त होत आहे. विशेष म्हणजे चालू वर्षाच्या सुरुवातीलाच जिल्हाधिकार्‍यांनीही या महामार्गाच्या दुरावस्थेबाबत नाराजी व्यक्त केली होती, मात्र सहा महिने उलटूनही महामार्ग प्राधिकरणाने त्यावर कोणतीही कारवाई केली नव्हती. आता मात्र महामार्गावरील खड्ड्यांच्या चाळणीला डांबराचे अस्तर लावण्यास सुरुवात झाली आहे.

वाहनांसह प्रवाशांच्या वाढत्या संख्येमुळे जुना पुणे-नाशिक महामार्ग वाहनधारकांसाठी डोकेदुखी ठरला होता. वारंवार होणारी वाहतुकीची कोंडी आणि अपघातांची मोठी संख्या यामुळे नाशिक-पुणे या दोन महानगरांदरम्यान प्रवास करण्यासाठी आठ ते दहा तासांचा कालावधी लागत. त्यातच घाटांची संख्या आणि वळणाचे अरुंद रस्ते यामुळे हा महामार्ग म्हणजे ‘मृत्यूघंटा’ अशीही त्याची ओळख बनली होती. स्थानिक नागरिकांसह या मार्गावरुन प्रवास असंख्य प्रवाशांच्या मागणीनंतर या महामार्गाचे चौपदरीकरण करण्याचा निर्णय शासनाने घेतला.

त्यानुसार आय. एल. एफ. एस. या ठेकेदार कंपनीने महामार्गाची निविदा घेवून 2013 साली आय. एल. एफ. एस. कंपनीने खेड ते झोळे पर्यंतचा रस्ता मॉन्टो कार्लो तर झोळे ते सिन्नर हा रस्ता जी. एच. व्ही. इंडिया प्रा. लि. या अन्य पोट कंपन्यांकडून तयार करुन घेतला व चार वर्षांनंतर 7 फेब्रुवारी, 2017 रोजी खेड ते सिन्नर दरम्यानच्या महामार्गाचे 70 टक्के काम पूर्ण झाल्याने महामार्ग प्राधिकरणाच्या नियमानुसार हा महामार्ग वाहतुकीसाठी खुला करण्यासह संबंधित ठेकेदार कंपनीने टोल वसुली करण्याची परवानगीही मिळविली. टोल सुरु करण्याची परवानगी मिळताच आय. एल. एफ. एस. कंपनीने लागलीच स्वतःची यंत्रणा उभी करुन सिन्नर, झोळे व चालकवाडी (खेड) या तीन ठिकाणच्या टोल नाक्यांवरुन वाहनचालकांकडून वसुलीही सुरु केली.

यादरम्यान महामार्गाचे राहिलेले 30 टक्के काम वेळेत पूर्ण करण्याची व या रस्त्याच्या देखभाल व दुरुस्तीची जबाबदारी साहजिकच आय. एल. एफ. एस. कंपनीची होती. मात्र गेल्या चार वर्षात या कंपनीने केवळ टोल वसुलीशिवाय दुसरे काहीच केले नाही. विशेष म्हणजे 18 जानेवारी, 2021 रोजी अहमदनगर जिल्हाधिकार्‍यांच्या अध्यक्षतेखाली या महामार्गाच्या सद्यस्थितीबाबत आढावा घेण्यात आला. त्यावेळी जिल्हाधिकार्‍यांनी रस्त्याला जागोजागी पडलेले खड्डे तसेच सर्व्हिस रोड व विकासाच्या कामांबाबत झालेल्या दुर्लक्षावर बोट ठेवून तीव्र नाराजीही व्यक्त केली. या बैठकीला राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणाचे प्रकल्प संचालक यांनी ‘ठेकेदार’ मिळत नसल्याचे कारण सांगून फेरनिविदा काढून राहिलेली कामे पूर्ण करण्याचे आश्वासन या बैठकीत दिले होते.

मात्र सहा महिन्यांचा कालावधी उलटूनही ते पूर्ण करण्यात आले नाही. त्यातच चालू पावसाळ्यात या महामार्गाची अवस्था अत्यंत बिकट झाल्याने व संपूर्ण रस्त्यावरच खड्ड्यांचे साम्राज्य निर्माण झाल्याने प्रवाशांना शारीरिक व आर्थिक भुर्दंड बसू लागल्याने प्रवाशांसह स्थानिकाचाही रोष खद्खदू लागला होता. त्यामुळे दबावात आलेल्या आय. एल. एफ. एस. कंपनीच्या टोल प्लाझाने चक्क रस्त्याच्या कडेची माती टाकून सोमवारपासून (ता.28) ‘पुणे-नाशिक’ महामार्गावरील खड्डे बुजविण्यास सुरुवात केली. याबाबतची माहिती मिळाल्यानंतर दैनिक नायकने सोमवारीच (ता.28) ‘टोलवसुली सुरु असूनही ‘नाशिक-पुणे’ महामार्गाची चाळण! देखभालीकडे दुर्लक्ष करुन ठेकेदाराकडून चक्क खड्ड्यात माती भरण्याचे काम..’ या मथळ्याखालील वृत्त प्रसिद्ध करुन ठेकेदाराच्या चुकीच्या कामावर बोट ठेवले. त्याची तत्काळ दखल घेण्यात आली असून माती टाकण्याचे काम बंद करुन टोल प्लाझाकडून आता मुरुम व खडी टाकून तसेच त्यावर डांबराचे अस्तर टाकून शास्त्रीय पद्धतीने महामार्गावरील खड्डे बुजविण्यास सुरुवात झाली आहे. त्यामुळे स्थानिकांसह प्रवाशांनीही समाधान व्यक्त केले आहे.


लॉकडाऊनचे निर्बंध उठल्यानंतर ‘पुणे-नाशिक’ महामार्गावरील प्रवाशी व अवजड वाहतूक करणार्‍या वाहनांमध्ये मोठी वाढ झाली आहे. त्यामुळे या महामार्गावरील लहान खड्ड्यांचे रुपांतर मोठ्या खड्ड्यांमध्ये झाले आहे. त्यातच सध्या पाऊस सुरू असल्याने या खड्ड्यांमध्ये पावसाचे पाणीही साचत असल्याने अडचणी वाढल्या आहेत. मात्र टोल प्लाझा कंपनीने आता महामार्गावरील सर्व मोठे खड्डे बुजविण्यास आजपासून सुरुवात करण्यात आली असून येत्या चार ते पाच दिवसांत हे काम पूर्ण होईल.
– वैभव ढगे
सिव्हील सुपरवायझर, टोल प्लाझा

Visits: 11 Today: 1 Total: 118060

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *