प्रसाद लाड यांनी वक्तव्य चुकलं असल्याचं म्हटलंय ः बावनकुळे अशा वक्तव्यांचे भाजप कधीही समर्थन करणार नसल्याचेही केले स्पष्ट


नायक वृत्तसेवा, नगर
छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबाबत करण्यात आलेल्या वक्तव्यांवरून वाद रंगला असताना भाजप आमदार प्रसाद लाड यांनी त्यात भर घातली. यामुळे विरोधकांनी जोरदार टीका केली. भाजपची अडचण झाल्यानंतर अखेर आमदार प्रसाद लाड यांनी वक्तव्याबद्दल दिलगिरी व्यक्त केली. प्रसाद लाड यांच्या वक्तव्यावरून भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांना प्रश्न विचारण्यात आला. लाड यांनी आपल्या वक्तव्यावर दिलगिरी व्यक्त केली आहे. तसंच आपलं वक्तव्य चुकलं असल्याचंही लाड यांनी म्हटलं असल्याचं चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले. ते अहमदनगर येथे एका खासगी कार्यक्रमासाठी आले होते.

केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांचा एकेरी उल्लेख केल्याचा व्हिडिओ व्हायरल होतोय. यावरही बावनकुळे यांना प्रश्न विचारला गेला. सध्या व्हिडिओ कटछाट करून व्हायरल करण्याचा ट्रेंड सुरू आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान हा कोणीही करू नये. मागच्याही पिढीमध्ये कुणाची छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान करण्याची हिंमत नव्हती आणि पुढच्या शंभर वर्षांत कुणी त्यांचा अवमान करण्याची हिंमत नाही, असं चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले. अशा पद्धतीने कोणाचं वक्तव्य असेल तर त्याचे समर्थन भाजप करू शकत नाही, असंही ते म्हणाले. जेव्हा जेव्हा आम्ही सत्तेत आलो तेव्हा आमच्या शीर्ष नेतृत्वाने छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासातून प्रेरणा घेऊनच काम केलेलं आहे. त्यामुळे भाजपला लक्ष करण्यासाठी काही व्हिडिओ कटछाट करून आणले जातात, असं उत्तर बावनकुळे यांनी दिलं.

देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना त्यांनी विदर्भ, मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र यांना जोडणार्‍या समृद्धी महामार्गाचे स्वप्न पाहिलं होतं. या महामार्गाचं उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी हे अकरा तारखेला करत आहेत. या महामार्गामुळे संपूर्ण महाराष्ट्राचे चित्र बदलणार आहे. खरंतर हा विकास याआधीच करता आला असता. 50-50 वर्षे ज्यांनी सरकार चालवलंय, त्यांनी केवळ स्वतःपुरतचं सरकार चालवलं. सत्तेपासून पैसा, पैशपासून सत्ता एवढेच धोरण मागील सरकारचे राहिले. मात्र देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात जो विकास झाला, त्यामुळे हा महाराष्ट्र बदलणार आहे, असं बावनकुळे म्हणाले. हा महाराष्ट्र जो दहाव्या क्रमांकावर गेला तो एक नंबरवर आणण्याची क्षमता देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांच्यात आहे, असा दावा बावनकुळे यांनी केला. भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारणीची आज दिल्लीत बैठक आहे. या बैठकीदरम्यान भाजपची पुढची रणनीती ठरवली जाणार असल्याचं बावनकुळे म्हणाले. या बैठकीसाठी पंकजा मुंडे, विनोद तावडे हे देखील उपस्थित राहणार असल्याची माहिती चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली.

Visits: 9 Today: 1 Total: 118603

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *