श्रीरामपूरच्या ‘लव्ह जिहाद’ टोळीवर मोक्कान्वये कारवाई! पोलीस उपअधीक्षक संदीप मिटकेंच्या प्रस्तावावर विशेष पोलीस महानिरीक्षकांचे शिक्कामोर्तब..

नायक वृत्तसेवा, श्रीरामपूर
श्रीरामपूरमधील वॉर्ड क्रमांक दोनमध्ये राहुन दहशत निर्माण करणार्या आणि अल्पवयीन मुलींवर अत्याचार करुन त्यांना वाममार्गावर नेणार्या कुख्यात मुल्ला कटर टोळी विरोधात पोलिसांनी कठोर पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. त्या अनुषंगाने या टोळीने केलेल्या विविध गंभीर गुन्ह्यांची गंभीर दखल घेत या प्रकरणाचे तपासी अधिकारी, पोलीस उपअधीक्षक संदीप मिटके यांनी या टोळीवर महाराष्ट्र संघटीत गुन्हेगारी नियंत्रण कायद्यान्वये (मोक्का) कारवाईसाठी प्रस्ताव पाठविला होता. त्यावर नाशिक विभागाचे विशेष पोलीस महानिरीक्षक बी.जी.शेखर यांनी शिक्कामोर्तब केले असून या टोळीतील सहा जणांवर मोक्कान्वये कारवाई करण्यात आली आहे.

श्रीरामपूरमधील कुख्यात इम्रान युसुफ कुरेशी उर्फ मुल्ला कटर (वय 35) याने आपल्या अन्य साथीदारांसह वेळोवेळी विविध गंभीर स्वरुपाचे गुन्हे केले आहेत. तो रहात असलेल्या परिसरातील एका अल्पवयीन मुलीला थेट शाळेतून उचलून नेवून त्याने तिच्यावर अत्याचार केला. बळजोरीने तिचे धर्मांतरही घडवून आणले. एका सामाजिक संस्थेच्या मदतीने पीडित मुलीच्या पालकांनी हा सगळा प्रकार उघड केल्यानंतर संपूर्ण राज्यात खळबळ उडाली होती. त्यानंतर मुल्ला कटर आणि त्याच्या गुन्हेगारी टोळीचे एकामागून एक कारनामे समोर येवू लागल्याने पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी या प्रकरणाचा तपास श्रीरामपूर उपविभागाचे उपअधीक्षक संदीप मिटके यांच्याकडे सोपविला होता. त्यांनी या टोळीकडून करण्यात आलेले विविध गुन्हे उघड करण्यासह अत्याचार करुन वेश्या व्यवसायासाठी विक्री करण्यात आलेल्या मुलीची सुटकाही केली आणि या कुख्यात गुंडाची टोळीही उघड केली.

टोळीचा म्होरक्या असलेल्या व एखाद्या सिनेमातील कुख्यात गुन्हेगाराचे प्रतिरुप असलेल्या या कान्या मुल्ला कटरचे श्रीरामपूरच्या वॉर्ड क्रमांक दोनमध्ये कायम वास्तव्य आहे. त्याने आपल्या टोळीच्या साथीने संघटीतपणेे मालमत्ता विषयक, शरीरा विरुद्ध व महिला अत्याचार संबंधी अनेक गुन्हे केल्याचे पोलीस तपासातून उघड झाले आहे. कोणताही कामधंदा नसलेल्या मुल्लाने बळाचा वापर करुन आपल्या आर्थिक फायद्यासाठी टोळीतील सदस्यांसह श्रीरामपूर शहर व परिसरात अत्यंत गंभीर स्वरूपाचे गुन्हे केले आहेत. त्याच्या टोळीच्या कारनाम्यांमुळे संपूर्ण श्रीरामपूर तालुक्यात त्याची मोठी दहशत निर्माण झाली होती. त्याच्यासह या टोळीवर श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात भारतीय दंडसंहितेच्या कलम 363 (अ), 368, 370 (4), 370(अ), बालकांचे लैंगिक अत्याचारापासून संरक्षण करणार्या कायद्याचे (पोक्सो) कलम 3, 4, 5, (जी), 6, 17, पिटा अॅक्ट 4, 5, 6, 7, अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्याचे कलम 3(1), डब्ल्यु (।) (॥), 3 (2), (व्ही), (3) (2) (5 ए) प्रमाणे यापूर्वीच गुन्हे दाखल झालेले आहेत.

श्रीरामपूर मधील एका तरुणीवर या टोळीतील सदस्यांनी सामूहिक बलात्कार करुन तिला पांढरी पुल येथे राहणार्या टोळी सदस्य बाबा चेंडवाल याला तिची विक्री केली होती, त्यानेही तिच्यावर बळजबरीने अत्याचार केला. त्यानंतर टोळीचा प्रमुख मुल्ला कटर, बाबा चेंडवाल, पप्पू उर्फ प्रशांत दादासाहेब गोरे यांनी पीडितेची शेवगाव येथील मिना मुसवत हिच्या कुंटणखाण्यात विक्री केली. या प्रकरणात महिला आरोपी सुमन मधुकर पगारे व सचिन मधुकर पगारे यांनी मदत केल्याचे तसेच वेश्या व्यवसाय करुन मिळणार्या पैशांवर उदरनिर्वाह केल्याचे निष्पन्न झाल्याने गुन्ह्याचे तपासी अधिकारी पोलीस उपअधीक्षक संदीप मिटके यांनी सदर गुन्ह्यास महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी प्रतिबंध अधिनियम 1999 चे कलम 3 (1), (॥), 3 (2), 3 (4) प्रमाणे वाढीव कलम लावण्यास मंजुरी मिळणे बाबतचा प्रस्ताव अप्पर पोलीस अधीक्षक श्रीरामपूर, पोलीस अधीक्षक अहमदनगर याच्या मार्फत नाशिक परिक्षेत्राच्या विशेष पोलीस महानिरीक्षकांना सादर केला होता. या प्रस्तावाला त्यांनी मंजुरी दिल्याने मुल्ला कटर टोळीवर वाढीव कलमान्वये कारवाई करण्यात आली आहे.

