साईबाबा मंदिराकडे जाणारा पूल खचला! नागरिकांना प्रवेश बंद; परिसराचा संपर्क तुटण्याची शक्यता
नायक वृत्तसेवा, संगमनेर
सततचा वाळू उपसा आणि यंदाच्या वर्षी पावसाळ्यात सलग वाहिलेल्या म्हाळुंगी नदीचा उद्रेक आता दिसू लागला असून त्याचा पहिला परिणाम स्पष्टपणे समोर आला आहे. यावर्षी म्हाळुंगीला वारंवार आलेल्या पुराच्या पाण्याने पुलाच्या आसपासच्या जमिनींची धूप झाल्याने सदरील पुल वाहतुकीसाठी धोकादायक बनत असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्याचा प्रत्यय आज दुपारी एक वाजण्याच्या सुमारास साईनगर परिसरात राहणार्या नागरिकांना अनुभवण्यास मिळाला असून स्वामी समर्थ मंदिराजवळील म्हाळुंगी नदीवरील पूल खचला आहे. याबाबतची माहिती मिळाल्यानंतर माजी नगराध्यक्षा दुर्गा तांबे यांच्यासह पालिका प्रशासनाने धाव घेतली असून सदरील पूल वाहतुकीसाठी बंद करण्याबाबत मंथन सुरु आहे.
गेल्या काही वर्षात मुळा व प्रवरा या तालुक्यातील दोन्ही मोठ्या नद्यांसह म्हाळुंगी व आढळा नद्यांमधून बेसुमार वाळू उपसा सुरु आहे. त्याचे दुष्परिणाम नदीकाठावरील शेतकर्यांना भोगावे लागत असतांना आता शासकीय संसाधनांवरही त्याचे दृष्य परिणाम जाणवू लागले आहेत. त्यातच चालू वर्षी नगर व नाशिक जिल्ह्यांच्या पर्जन्यछायेखालील भागातही जोरदार पाऊस कोसळला. त्यामुळे रडतखडत भरणारे या भागातील जलप्रकल्प अपेक्षेपेक्षा कितीतरी आधीच ओसंडले. त्यानंतरही पावसाने आजवर सातत्य ठेवल्याने अपवाद वगळता गेल्या तीन महिन्यांपासून म्हाळुंगी व आढळा या दोन्ही नद्या आजही वाहत्या आहेत.
त्यातच सध्या राज्यातील काही भागात परतीच्या पावसाने थैमान घातल्याचे चित्रही दिसत आहे. अशाच प्रकारचा पाऊस बुधवारी रात्री भोजापूर धरणाच्या पाणलोटातही झाल्याने यापूर्वीच तुडूंब असलेल्या या जलाशयाच्या भिंतीवरुन पुन्हा एकदा मोठ्या प्रमाणात वेगवान प्रवाह वाहु लागला आहे. गेल्या मोठ्या कालावधीपासून सातत्याने वाहणार्या म्हाळुंगी नदीच्या प्रवाहामुळे नदीपात्राच्या दोन्ही बाजूंच्या जमिनीही काही प्रमाणात वाहून गेल्याचे समोर आलेले असताना आता चक्क साईनगर, संतोषी मातानगर, पंपिंग स्टेशन या भागांना शहराशी जोडणारा प्रमुख मार्ग असलेल्या साईबाबा मंदिर रस्त्यावरील मोठा पुल स्वामी समर्थ मंदिराच्या बाजूने खचला आहे.
त्यामुळे सध्या हा पूल वाहतुकीसाठी अतिशय धोक्याचा बनला असून त्यावरील वाहतुक सुरुच राहिल्यास मोठी दुर्घटना घडण्याची शक्यता आहे. दुपारी एक वाजण्याच्या सुमारास सदरील गोष्ट समोर आल्यानंतर ओहरा कनिष्ठ महाविद्यालय व दिगंबर गणेश शाळेने विद्यार्थ्यांना घरी सोडले आहे. याबाबतची माहिती मिळताच माजी नगराध्यक्षा दुर्गा तांबे यांच्यासह पालिकेचे मुख्याधिकारी राहुल वाघ यांनीही घटनास्थळाकडे धाव घेतली आहे. तूर्ततः सदरील पूल पादचार्यांसाठी खुलाच असून मोठ्या वाहनांना पुलावरुन जाण्यास मनाई करण्यात आली आहे. याबाबत पालिकेने सार्वजनिक बांधकाम विभागाला सूचना दिली असून त्यांच्या पाहणीनंतर पुढील कारवाई केली जाणार आहे.