सुयश हॉस्पिटलमध्ये अवघड प्रसुती यशस्वी

नायक वृत्तसेवा, संगमनेर
तीन वर्षांपूर्वी सिझर झालेले असताना या मातेचे आता सुध्दा सिझरच होईल अशी कुटुंबाची भावना होती. त्यात पोटात चार किलोपेक्षा अधिक वजनाचे बाळ असताना नैसर्गिक प्रसुती होणे अतिशय अवघड व धोकादायक असतानाही येथील सुयश हॉस्पिटलच्या तज्ज्ञ डॉक्टरांनी हे शिवधनुष्य पेलून या महिलेची नैसर्गिक प्रसुती केली. या अवघड शस्त्रक्रियेनंतर आता बाळ आणि आई दोघेही सुखरूप आहेत. वैद्यकीय क्षेत्रातील हा एक चमत्कार मानला जात असून सुयश हॉस्पिटलचे स्त्रीरोग तज्ज्ञ डॉ. सागर कोटकर व डॉ. संदीप अरगडे यांनी ही किमया केली आहे.

राहुरी तालुक्यातील सोनई येथील एक महिला पहिले तीन वर्षांचे बाळ असताना दुसर्‍यांदा गर्भवती होती. प्रसुती वेदनेमुळे संगमनेर शहरातील सुयश हॉस्पिटलमध्ये दाखल झाली. त्यानंतर डॉ. संदीप अरगडे यांनी या महिलेची तपासणी केली. या महिलेचे तीन वर्षांपूर्वी सिझर झाले असले तरी आपण नैसर्गिक प्रसुुतीसाठी प्रयत्न करू असा विश्वास डॉ. अरगडे यांनी गर्भवतीच्या कुटुंबियांना दिला. कुटुंबियांनीही त्याला संमती दिली. खरेतर अशा केसमध्ये दुसर्‍यांदा नैसर्गिक प्रसुती होणे अवघड असते. बाळाचे वजन 4 किलोपेक्षा जास्त होते, दिवसही पूर्ण भरलेले होते. तसेच गर्भवती मातेच्या रक्ताचे प्रमाण केवळ 8.5 टक्के होते. त्यामुळे नैसर्गिक प्रसुतीची शक्यता फारच कमी होती.

परंतु स्त्री रोगतज्ज्ञ डॉ. सागर कोटकर यांच्या मार्गदर्शनाखाली उपचार सुरू झाले. त्यानंतर सुयश हॉस्पिटलची संपूर्ण यंत्रणा कामाला लागली. डॉ. सागर कोटकर, डॉ. संदीप अरगडे यांनी महिलेची पूर्ण तपासणी करून नैसर्गिक प्रसुतीचा निर्णय घेतला. अनेक अडचणींवर मात करून व डोळ्यात तेल घालून त्यांनी किचकट व धोकादायक शस्त्रक्रिया करून महिलेची नैसर्गिक प्रसुती केली. दरम्यान अशा केसमध्ये बाळाला व आईला दोघांच्याही जीवीताला धोका असतो. परंतु सुयश हॉस्पिटलमधील अनुभवी व तज्ज्ञ टीमच्या मदतीने त्यांनी हे शिवधनुष्य पेलून महिलेची नैसर्गिक प्रसुती यशस्वी केली. यामध्ये सुयश हॉस्पिटलमधील सिस्टर भाग्यश्री बांबळे, सुजीता भोये, डॉ. मंगेश मिसाळ, डॉ. मकरंद फोडसरे, डॉ. सुशांत फरकडे, व्यवस्थापक स्वाती सानप, प्रमिला अभंग, लीना लहामगे, फार्मासिस्ट सचिन घुले यांचा सहभाग होता आणि बालरोग तज्ज्ञ डॉ. सौरभ सांगळे यांनी नवजात बालकाची तपासणी केली.

सुयश हॉस्पिटलची स्थापना झाल्यापासून येथे अत्यंत गरीब, अडचणीत असलेल्या रुग्णांवर अतिशय प्रामाणिकपणे उपचार केले जातात. रुग्णांच्या हिताचे निर्णय घेण्याचे काम सुयश हॉस्पिटलमध्ये केले जाते. त्याचाच प्रत्यय या प्रसुतीमुळे आला आहे.
– डॉ. किशोर पवार (संचालक – सुयश हॉस्पिटल)

Visits: 98 Today: 2 Total: 1105284

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *