संगमनेर तालुक्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण आता 99 टक्के! तालुक्यातील कोविडचा प्रादुर्भाव जवळपास आटोक्यात आल्याचे दिलासादायक चित्र
नायक वृत्तसेवा, संगमनेर
जिल्ह्यात लसीकरणाला सुरुवात होण्यासोबतच कोविडचा प्रादुर्भावही जवळपास आटोक्यात आल्याचे चित्र दिसत आहे. यावेळी तर तब्बल पाच दिवसांच्या विश्रांतीनंतर बुधवारी सतरा रुग्ण समोर आले आहेत. त्यात शहरी भागातील तेरा रुग्णांचा समावेश असून एकाच कुटुंबातील आठ जणांना कोविडची लागण झाल्याचे समोर आले आहे. तालुक्यात कोविडचा प्रादुर्भाव सुरु झाल्यापासून आजवर एकूण पन्नास जणांचा बळी गेला असून आजच्या स्थितीत केवळ 78 रुग्णांवर उपचार सुरु आहेत. बुधवारी वाढलेल्या रुग्णसंख्येने तालुक्याला 6 हजार 282 रुग्णसंख्येवर पोहोचवले असले तरीही रुग्ण बरे होण्याचा दर 99 टक्क्यांवर पोहोचल्याने तालुक्यातील कोविडचे संकट जवळपास अंतिम टप्प्यात आले आहे.
संगमनेर तालुक्यात एप्रिलमध्ये पाय ठेवणार्या कोविडने नंतरच्या काळात टप्प्याटप्प्याने पाय पसरायला सुरुवात केली आणि अवघ्या काही महिन्यांतच संपूर्ण तालुक्यावर आपला प्रभाव निर्माण केला. केंद्र सरकारने देशभर लागू केलेल्या टाळेबंदीने सुरुवातीच्या दोन महिन्यात नियंत्रित असलेली रुग्णसंख्या जूनपासून उंचावत गेली. मात्र या काळात नागरिकांनी मास्क, सॅनिटायझर आणि सामाजिक अंतराचे नियमही पाळल्याने रुग्णगतीचा वेग अनियंत्रित झाला नाही. ऑगस्टमध्ये शेवटच्या दहा दिवसांत मात्र श्रद्धेने भितीवर मात केल्याने गणेशोत्सवात मोठ्या प्रमाणात नागरिक घराबाहेर पडले आणि त्याचे दुष्परिणाम सप्टेंबरच्या पहिल्या दिवसापासून समोर येवू लागले.
सप्टेंबरमधील उच्चांकी रुग्णसंख्येनंतर दिवाळीतही असाच अनुभव आणि परिणामांची अपेक्षा व्यक्त होत होती. मात्र गणेशोत्सवात झालेल्या चुका पुन्हा न करण्याचा मनोदय करीत संगमनेरकरांनी गर्दीतही नियमांचे पालन केल्याने दिवाळीनंतरच्या संभाव्य दुसर्या लाटेचा अंदाज फोल ठरला आणि गर्दीने फुललेल्या बाजारपेठांचे चित्र दिसूनही संगमनेर तालुक्याची रुग्णसंख्या अनियंत्रित झाली नाही. डिसेंबर येता येता दोन लशीही बाजारात येवू घातल्याने तब्बल आठ महिने कोविडच्या दडपणात जगणार्या नागरिकांमध्ये नवऊर्जा संचारली आणि त्यातून मनोबल वाढल्याने कोविडच्या घरवापसीचा प्रवास सुरु झाला.
नववर्षात दररोजच्या सरासरीत आश्चर्यकारक घट नोंदविली गेली असून अधुनमधून समोर येणारे रुग्ण वगळता तालुक्यातील कोविडचे संक्रमण जवळपास आटोक्यात आल्याचे दिलासादायक चित्रही निर्माण झाले आहे. त्यातच अगदी सुरुवातीला चाळीस टक्क्यांच्या आसपास असणारी रुग्ण बरे होण्याची सरासरीही या कालावधीत वाढत राहीली, आणि आजच्या स्थितीत तर ती थेट 98.42 टक्क्यांवर पोहोचल्याने तालुक्यातील कोविडचा परतीचा प्रवास सुरु झाल्याचे चित्र उभे राहीले. असे असले तरीही एक्कादुक्का रुग्ण समोर येतच असल्याने धोका कायम आहे याचा मात्र विसर पडता कामा नये.
23 जानेवारीनंतर थेट बुधवारी (ता.27) तालुक्यातून 17 रुग्ण समोर आले. विशेष म्हणजे ग्रामपंचायत निवडणूका, त्यांचा निकाल यासारख्या प्रचंड गर्दीच्या कार्यक्रमानंतरही ग्रामीणभागातील संक्रमण जवळपास नगण्य झाल्याचे या अहवालातून स्पष्ट झाले. बुधवारी आढळलेल्या एकूण रुग्णांमध्ये ग्रामीण क्षेत्रातील अवघ्या चौघांचा समावेश आहे, तर शहरात सापडलेल्या तेरा जणांपैकी तब्बल सातजण एकाच कुटुंबातील असल्याचेही समोर आले आहे.
बुधवारच्या अहवालानुसार नवीन नगर रस्त्यावरील 29 वर्षीय तरुण, रंगारगल्लीतील 45 वर्षीय इसम, अकोले नाका येथील 45 वर्षीय इसम, केवळ संगमनेर असा पत्ता नोंदविलेले 47 वर्षीय इसमासह 21 वर्षीय तरुण व एकाच कुटुंबातील गणेशनगर परिसरातील 70 वर्षीय दोघा ज्येष्ठांसह 54 वर्षीय इसम, 22 वर्षीय तरुण, 71, 47 व 37 वर्षीय महिला आणि 11 वर्षीय मुलगा तर ग्रामीणभागातील घुलेवाडी येथील 21 व 20 वर्षीय तरुण, वरवंडी येथील 59 वर्षीय इसम व निमागव जाळी येथील 39 वर्षीय तरुण संक्रमित झाले आहेत. बुधवारच्या रुग्णसंख्येने तालुका आता 6 हजार 282 रुग्णसंख्येवर पोहोचला आहे. त्यातील केवळ 78 रुग्ण सक्रीय संक्रमित असून तालुक्यातील रुग्ण बरे होण्याचे सरासरी प्रमाणही आता 98.42 टक्के झाले आहे.
जिल्ह्यातील बाधित तालुक्यांमध्ये उच्चांकी रुग्णसंख्येच्या पंक्तित असलेल्या संगमनेरातील कोविडचा प्रादुर्भाव आता जवळपास ओटोक्यात आला आहे. अधुनमधून रुग्ण समोर येत असले तरीही उपचारांती बरे होण्याचे प्रमाणही आता जवळपास 98.42 टक्क्यांवर पोहोचल्याने तब्बल दहा महिन्यांनंतर तालुक्यात आनंददायी चित्र निर्माण झाले आहे. दुर्दैवाने या कालावधीत अधिकृत नोंद झालेल्या पन्नास रुग्णांना आपला प्राण गमवावा लागला आहे.