हिवरगाव पावसा टोलनाक्याजवळ कार उलटून दोन ठार एक गंभीर जखमी; महामार्गावरील खड्डे घेताहेत बळी


नायक वृत्तसेवा, घारगाव
नाशिक-पुणे महामार्गावरील उड्डाणपुलावर कार दुभाजकाला धडकून थेट रस्त्यावर येऊन तीनचार वेळा उलटली. यात कारमधील दोघांचा मृत्यू झाला असून एक गंभीर जखमी झाला आहे. हिवरगाव पावसा टोलनाक्याजवळ मंगळवारी (ता.20) रात्री आठ वाजेच्या सुमारास हा अपघात घडला आहे.

अभिषेक साहेबराव रहाणे (वय 29, रा. चंदनापुरी, ता.संगमनेर), प्रथमेश विकास कुरकुटे (वय 23, रा. कुरकुटवाडी, बोटा, ता. संगमनेर) अशी अपघातात मयत झालेल्या युवकांची नावे असून विजय तबाजी काळे (वय 35, रा. पावबाकी रस्ता, संगमनेर) असे गंभीर जखमी झालेल्या तरुणाचे नाव असून त्याला पुढील उपचारांसाठी नाशिक येथील खासगी रुग्णालयात हलविण्यात आले आहे. रहाणे, कुरकुटे आणि काळे हे तिघेही कारमधून संगमनेरकडे येत होते. हे तिघेही वाढदिवसासाठी कारमधून चालले होते.

हिवरगाव पावसा शिवारात आले असता उड्डाणपुलाहून जात असताना कार दुभाजकाला धडकून थेट खाली कोसळली. त्यानंतर कार तीनचार वेळा उलटल्याने कारमधून प्रवास करणारे तिघेही गंभीर जखमी झाल्याने त्यांना शहरातील खासगी रुग्णालयामध्ये उपचारांसाठी दाखल केले. परंतु रक्तस्त्राव अधिक होऊन अभिषेक रहाणे आणि प्रथमेश कुरकुटे या दोघांचा मृत्यू झाला. गंभीर जखमी झालेल्या विजय काळे या तरुणास पुढील उपचारांसाठी नाशिक येथील खासगी रुग्णालयात हलविण्यात आले. दरम्यान, नाशिक-पुणे महामार्गावर अनेक ठिकाणी खड्डे पडले आहेत. तसेच सव्हिर्स रस्त्यांची अवस्था देखील अत्यंत खराब आहेत. अनेकदा मागणी करूनही रस्त्याची कामे केली जात नसल्याने नागरिकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. खराब रस्त्यामुळे अपघाताचे प्रमाण वाढले असून अनेक ठिकाणचे नागरिक आंदोलन करणार असल्याची माहिती मिळाली आहे.

Visits: 164 Today: 1 Total: 1869871

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *