सोयाबीनचे पीक वाचविण्यासाठी ड्रोनद्वारे औषध फवारणी प्रवरा परिसरातील शेतकर्‍यांनी स्वीकारलेले तंत्रज्ञान ठरतेय आशादायी


नायक वृत्तसेवा, राहाता
शेतातील अतिवृष्टीग्रस्त सोयाबीनचे पीक वाचविण्यासाठी ड्रोनद्वारे औषध फवारणीची मात्रा लागू पडत आहे. प्रवरा परिसरातील शेतकर्‍यांनी स्वीकारलेले हे आधुनिक तंत्रज्ञान आशादायी ठरू लागले आहे. अस्मानी संकटाच्या फेर्‍यात सापडलेल्या सोयाबीन उत्पादकांची उभी पिके वाचविण्यासाठी सध्या धडपड सुरू आहे.

याबाबत राजुरी येथील कृषीतज्ज्ञ बाबासाहेब गोरे यांनी सांगितले, की योग्य निचरा असलेल्या जमिनीतील सोयाबीनची परिस्थिती अजून बरी आहे. मात्र, भारी जमिनीतील सोयाबीनचे पीक अतिवृष्टीमुळे गेल्यात जमा आहे. ते वाचविण्यासाठी शेतकर्‍यांचे प्रयत्न सुरू आहेत. नव्या, जास्त उत्पादन देणार्‍या जातींमध्ये ज्या पद्धतीने अन्नद्रव्य व्यवस्थापन होणे आवश्यक होते, त्या पद्धतीने ते केले गेले नाही. ज्यांनी ते केले, त्यांच्या जमिनीत खतांचा निचरा झाला.

त्यामुळे सोयाबीनच्या दाण्यांच्या फुगवट्यासाठी लागणारे अन्नद्रव्य मिळत नाही. परिणामी, रस शोषणार्‍या किडींचा प्रादुर्भाव वाढला. सध्याची परिस्थिती अशी आहे, की सोयाबीनची वाढ गुडघ्यापर्यंत झालेली असल्याने शेतात फिरून फवारणी करणे शक्य नाही. त्यामुळे शेतकर्‍यांनी ड्रोनद्वारे फवारणीचा पर्याय स्वीकारला आहे. मात्र, जोराचा वारा आल्यावर फवारणी करता येत नाही. तसेच, शेतावरून उच्चदाब विद्युतवाहिनी गेली असल्यास अडचण येते.

सततच्या पावसामुळे सोयाबीनच्या पिकात जाता येत नव्हते. अळी व किडींचा प्रादुर्भाव वाढत चालला आहे. तो थांबविण्यासाठी ड्रोनने फवारणी करणे सुलभ होत आहे. या तंत्रामुळे दोन तासांत बारा एकर क्षेत्राची फवारणी करणे शक्य झाले.
– गीता थेटे (अध्यक्षा, प्रवरा फळे-भाजीपाला संस्था)

Visits: 197 Today: 1 Total: 2061796

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *