तलाठ्यांना धक्काबुक्की करीत वाळूने भरलेला ट्रॅक्टर लांबविला! आरोपी तन्वीर शेख दोषी; सहा महिन्यांच्या सश्रम कारावासाची शिक्षा..

नायक वृत्तसेवा, संगमनेर
दिवसाढवळ्या नदीपात्रावर दरोडा घालून बेसूमार वाळू उपसा करणार्या आणि कारवाईसाठी आलेल्या पथकालाच दमबाजी व धक्काबुक्की करीत ताब्यात घेतलेला ट्रॅक्टर पळवून नेणारा कुख्यात वाळू तस्कर तन्वीर कदीर शेख याला सहा महिन्यांच्या सश्रम कारावासाची शिक्षा ठोठावण्यात आली आहे. पाच वर्षांपूर्वी घडलेल्या या प्रकरणाचा मंगळवारी निकाल लागला, यावेळी संगमनेरचे अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश योगेश मनाठकर यांनी आरोपीला सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी दोषी ठरवून सहा महिन्यांच्या सश्रम कारावासासह आर्थिक दंडाची शिक्षा सुनावली.

याबाबतची सविस्तर माहिती अशी की, 17 सप्टेंबर 2017 रोजी दुपारी दिड वाजण्याच्या सुमारास कोल्हेवाडी-संगमनेर या रस्त्यावरुन बेकायदा वाळू वाहतूक करणार्या तन्वीर कदीर शेख या वाळू तस्कराचा ट्रॅक्टर महसूल विभागाचे कर्मचारी तथा कामगार तलाठी साईनाथ ढवळे, बाळकृष्ण सावळे, भीमराज काकड व सुमीत जाधव या चौघांनी पकडला होता. यावेळी ट्रॅक्टरसोबत केवळ त्याचा चालक होता व ट्रॉलीमध्ये जवळपास दोन ब्रास वाळूही भरलेली होती. संबंधित पथकाने ट्रॅक्टर चालकाकडे परवाना मागितला असता त्याने तो नसल्याचे सांगत ट्रॅक्टरचा मालक तन्वीर शेख याला फान करुन बोलावून घेतले.

काही वेळातच घटनास्थळी पोहोचलेल्या तन्वीर शेख याच्याकडेही पथकाने वाळू वाहतुकीचा परवाना मागितला, मात्र तो दाखवण्याऐवजी त्याने पथकातील कर्मचार्यांनाच ‘ट्रॅक्टरला हात लावायचा नाही, माझ्या नादी लागू नका’ असे दरडावणीच्या स्वरात सांगत स्वतः ट्रॅक्टरवर बसून तो पळवून नेला, मात्र पथकाने त्याचा पाठलाग करीत त्याला रोखले. यावेळी त्याने पुन्हा अर्वाच्च शब्दात शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. त्याकडे दुर्लक्ष करीत पथकातील बाळकृष्ण सावळे यांनी ट्रॅक्टरचा ताबा घेतला असता आरोपी शेख याने त्यांचा हात पीरगळला व त्यांना धक्का मारुन ट्रॅक्टरवरुन लोटून देत ट्रॅक्टर घेवून तेथून पसार झाला.

या घटनेनंतर तहसीलदारांच्या आदेशावरुन तलाठी साईनाथ ढवळे यांनी शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यानुसार पोलिसांनी आरोपी तन्वीर कदीर शेख याच्या विरोधात भा.दं.वि. कलम 394, 353, 332, 323, 504, 506, 34 अन्वये गुन्हा दाखल केला. या प्रकरणाचा तपास शहर पोलीस ठाण्याचे तत्कालीन सहाय्यक पोलीस निरीक्षक अरुण परदेशी यांनी पूर्ण करुन आरोपी विरोधात संगमनेरच्या जिल्हा व सत्र न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. या खटल्याचे संपूर्ण कामकाज अतिरिक्त जिल्हा न्यायाधीश एस. वाय. भोसले यांच्यासमोर झाले.

या खटल्यात सरकारी अभियोक्ता बी. जी. कोल्हे यांनी एकूण सहा साक्षीदार तपासले. त्यामध्ये फिर्यादीची साक्ष महत्त्वपूर्ण ठरली. दोन्ही बाजूचा युक्तीवाद ऐकून घेतल्यानंतर जिल्हा व सत्र न्यायाधीश योगेश मनाठकर यांनी आरोपी तन्वीर शेख याला भा.दं.वि. कलम 353 खाली दोषी धरताना सहा महिन्यांचा सश्रम कारावास आणि पाच हजार रुपये दंड, कलम 332 अन्वये पाच तर 323 अन्वये एक हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली. सदर खटल्यात सरकारी अभियोक्ता कोल्हे यांना पैरवी अधिकारी म्हणून पोलीस उपनिरीक्षक सुनील सरोदे, पोलीस हवालदार प्रवीण डावरे, चंद्रकांत तोर्वेकर, महिला पोलीस सारीका डोंगरे, दीपाली दवंगे व स्वाती नाईकवाडी यांनी साहाय्य केले. या खटल्याकडे संगमनेर तालुक्यातील सर्व वाळू तस्करांचे लक्ष लागून होते.

