अत्याचारी डॉक्टरला कारागृहात पोलिसांकडून ‘खास’ सुविधा? पीडितेच्या नातेवाईकांचा आरोप; पोलीस ठाण्यासह रुग्णालयातही गोंधळ..
नायक वृत्तसेवा, संगमनेर
खासगी रुग्णालयात उपचारार्थ दाखल असलेल्या सोळा वर्षीय विद्यार्थीनीवर डॉक्टरकडूनच अत्याचार झाल्याच्या घटनेने अवघा जिल्हा हादरलेला असताना आता आरोपीला पोलिसांकडून ‘खास’ सुविधा दिली जात असल्याचा आरोप होवू लागल्याने एकच खळबळ उडाली आहे. श्रीरामनवमीच्या दिनी पहाटे घडलेल्या या संतापजनक प्रकारानंतर शहर पोलिसांनी तातडीने तपास करुन आरोपी डॉ.अमोल संताजी कर्पे याला नाशिकमधून ताब्यात घेत रात्री उशिराने अटक केली. मात्र दरम्यानच्या काळात आरोपी पोलीस ठाण्याच्या आवारात मोबाईलवरुन संपर्क साधीत असल्याचे बघितले गेल्याने विविध चर्चा सुरु होवून त्याचे पर्यवसान पीडितेच्या नातेवाईकांचा संताप अनावर होण्यात झाल्याने आरोपीला ताब्यात घेतल्यापासूनच त्यांनी गोंधळ घालण्यास सुरुवात केली. रविवारी रात्री उशिरापर्यंत पोलीस ठाण्यात सदरचा प्रकार घडल्यानंतर आज (ता.7) सकाळी आरोपी डॉक्टरला वैद्यकिय तपासणीसाठी ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आल्यानंतर तेथेही मोठा गोंधळ उडाल्याने पोलिसांविषयी संशय निर्माण झाला आहे. या प्रकरणात अटक करण्यात आलेल्या डॉ.कर्पे याला न्यायालयाने दहा दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.
शहरातील एका महाविद्यालयात शिक्षण घेणार्या 16 वर्षीय विद्यार्थीनीला श्वसनाचा त्रास होवू लागल्याने तिला शुक्रवारी (ता.4) सकाळी साडेसातच्या सुमारास प्रशासकीय भवनाच्या पाठीमागील बाजूस असलेल्या डॉ.अमोल कर्पे याच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. दोन दिवस तिच्यावर उपचार झाल्यानंतर रविवारी (ता.6) पहाटे चारच्या सुमारास सदर रुग्णालयाचा संचालक डॉ.अमोल कर्पे सदरील रुग्ण दाखल असलेल्या खोलीत आला व त्याने तिच्या तब्येतेची विचारणा करीत बोलतबोलत तिला थेट रुग्णालयाच्या छतावर घेवून गेला. यावेळी त्याने अचानक त्या विद्यार्थीनीला मिठी मारुन अश्लिल वर्तन करण्यास सुरुवात केली. त्याला पीडितेने विरोध केला असता उलट त्या नराधमाने तिलाच धमक्या भरुन ती रडत असतानाही तिच्यावर बळजबरीने शारीरिक अत्याचार केला व सदरचा प्रकार कोणाला सांगितल्यास जीवे ठार मारण्याची धमकीही दिली.
या प्रकाराने घाबरलेल्या ‘त्या’ विद्यार्थीनीने श्रीरामनवमीच्या दिवशी (ता.6) सकाळी नऊ वाजता रुग्णालयात आलेल्या तिच्या चुलत्याला घडला प्रकार सांगितल्यानंतर सुरुवातीला संतप्त झालेल्या तिच्या नातेवाईकांनी दवाखान्यावर हल्ला चढवला. मात्र नराधम डॉक्टर तेथून सहीसलामत पसार होण्यात यशस्वी झाला. त्यानंतर संतप्त झालेल्या नातेवाईकांनी रुग्णालयातून थेट पोलीस ठाणे गाठले. तेथेही बराचवेळ गोंधळ निर्माण झाल्यानंतर पोलिसांनी रुग्णालयात जावून पीडित विद्यार्थीनीचा जवाब नोंदवला व त्यानंतर तत्काळ पसार झालेल्या आरोपीचे तांत्रिक विश्लेषण करुन त्याचा माग काढण्यास सुरुवात केली. त्यातून तो नाशिकमधील सातपूर औद्योगिक वसाहतीच्या परिसरात असल्याचे समोर येताच नाशिक पोलिसांकरवी त्याला जेरबंद करण्यात आले. स्थानिक गुन्हे प्रकटीकरण शाखेचे उपनिरीक्षक समीर अभंग यांनी तातडीने नाशिकला जावून आरोपीला ताब्यात घेत सायंकाळी संगमनेरला आणले.
दरम्यानच्या काळात त्याच्या अटकेची प्रक्रिया सुरु असतानाच तो निर्विकारपणे पोलीस ठाण्याच्या आवारात फिरुन फोनाफोनी करीत असल्याचे चित्र दिसल्यानंतर पीडितेच्या नातेवाईकांनी पुन्हा गर्दी केली आणि पोलीस या प्रकरणात गंभीर नसल्याचा आरोपही केला जावू लागला. त्यामुळे चक्क पोलीस ठाण्यातील वातारणच तणावपूर्ण बनले. एकीकडे हा प्रकार घडत असताना दुसरीकडे श्रीरामनवमीची मिरवणूकही सुरु असल्याने बहुतेक अधिकारी व कर्मचारी बंदोबस्तावर असल्याने उपस्थित कर्मचार्यांनी त्यांची समजूत काढण्याचाही प्रयत्न केला. त्यातच आरोपीला ताब्यात घेतल्यानंतर त्याला पीडितेच्या आसपास फिरण्याची मुभा मिळाल्यानेही संताप निर्माण झाला. वरीष्ठ अधिकारी पोलीस ठाण्यात आल्यानंतर त्यांनी अटकेची प्रक्रिया पूर्ण करण्यास थोडा वेळ लागत असल्याचे सांगून वैद्यकिय तपासणीनंतर आरोपीला गजाआडच घालणार असल्याचे आश्वासन दिल्याने अटकेवरुन काहीकाळ सुरु असलेला गोंधळ शमला.
मात्र आज (ता.7) आरोपी डॉ.अमोल कर्पे याने आरोग्यविषयक तक्रार केल्याने त्याला तपासणीसाठी सरकारी वाहनातून घुलेवाडीच्या ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आले. वास्तविक रविवारी रात्री त्याला अटक करण्यापूर्वी त्याची वैद्यकिय तपासणी झालेली असतानाही अवघ्या बारा तासांतच त्याला रुणालयात नेण्यात आल्याने नातेवाईक आणि ग्रामस्थांमध्ये त्याला पोलीस साथ देत असल्याचा गैरसमज निर्माण होवून त्यांनी थेट ग्रामीण रुग्णालयात धाव घेत तेथेही गोंधळ घातला. यावेळी आरोपीला घेवून गेलेल्या कर्मचार्यांना नातेवाईकांच्या संतापासमोर थांबणं असह्य झाल्याने त्यांनी पोलीस ठाण्यात संदेश पाठवून अतिरीक्त फौजफाटा मागवला.
यावेळी हजर झालेल्या वरीष्ठ अधिकार्याने आरोपीच्या तक्रारीवरुनच त्याला तपासणीसाठी रुग्णालयात आणल्याचे सांगत तपासणीनंतर त्याची रवानगी कारागृहातच होणार असल्याचे सांगण्यात आले. त्यानंतर पीडितेचे नातेवाईक शांत झाले. काल सायंकाळपासून सुरु असलेल्या या गोंधळातून पीडितेच्या नातेवाईकांची आरोपीवर करडी नजर असल्याचेही दिसून आले. दरम्यान आरोपी डॉ.अमोल कर्पे याला आज न्यायालयात हजर केले असता त्याची रवानगी दहा दिवसांच्या पोलीस कोठडीत करण्यात आली आहे.
वास्तविक कोणत्याही गुन्हेगारी प्रकरणात पोलिसांकडून आरोपीला ताब्यात घेताच त्याचा मोबाईल जप्त केला जातो. मात्र या प्रकरणातील आरोपी अनेक राजकीय नेत्यांशी संबंध बाळगणारा असल्याने नाशिकहून संगमनेरला आणल्यानंतरही तो चक्क पोलीस ठाण्याच्या आवारातच आपल्या फोनद्वारे संपर्क साधीत असल्याचे दिसून आल्याने पोलिसांच्या कार्यशैलीबाबत संशय निर्माण झाला आहे. त्यातही रविवारी रात्री उशिराने अटक होण्यापूर्वी आरोपी डॉ.अमोल संताजी कर्पे याची वैद्यकिय तपासणी झालेली असतानाही आज सकाळीच त्याला पुन्हा रुग्णालयात नेण्यात आल्याने पीडितेचे नातेवाईक साशंक झाले आहेत.