ज्यांनी बलिदान दिले त्यांनी देशाला विकासाच्या मार्गावर नेले : देसाई कवी अनंत फंदी व्याख्यानमाला; पुष्प पहिले

नायक वृत्तसेवा, संगमनेर
देश स्वतंत्र होण्यात ज्यांनी बलिदान दिले, त्यांनी देशाला विकासाच्या मार्गावरही नेले. आज मात्र काही जणांकडून त्यांच्या बलिदानावरच प्रश्न उपस्थित केले जात आहेत. देशाच्या स्वातंत्र्य लढ्यातील गांधी-नेहरु परिवाराचे योगदान कोणीही नाकारु शकत नाही ही वस्तुस्थिती आहे. आपला देश स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करतोय, अशावेळी देशाला स्वातंत्र्य कधी मिळाले यावरुन वाद निर्माण करण्याचे काम सुरु आहे. अलिकडेच अभिनेत्री कंगना रानावत आणि अभिनेते विक्रम गोखले यांनी केलेले वक्तव्य अत्यंत धक्कादायक असून देशातील प्रत्येक नागरिकाने स्वातंत्र्याचा इतिहास जाणून घेण्याची गरज निर्माण झाल्याचे प्रतिपादन ज्येष्ठ पत्रकार, लेखक व विश्लेषक हेमंत देसाई यांनी केले.

संगमनेर येथील कवी अनंत फंदी व्याख्यानमालेच्या 44 व्या वर्षातील व्याख्यानमालेचे पहिले पुष्प गुंफतांना ते बोलत होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राज्याचे महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, आमदार डॉ.सुधीर तांबे, नंदना देसाई, कवी अनंत फंदी प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रा.ओंकार बिहाणी, प्रकल्प प्रमुख अरुण ताजणे, जसपाल डंग, अनिल राठी आदी उपस्थित होते. स्वातंत्र्यानंतरच्या सात दशकांत देशात खुप बदल झाल्याचे सांगताना देसाई पुढे म्हणाले की, नेताजी सुभाषचंद्र बोस आणि पंडित जवाहरलाल नेहरु यांच्यात टोकाचे मतभेद होते, काँग्रेस पक्षात आजही असे मतभेद बघायला मिळतात. मात्र ते तात्त्वीक स्वरुपाचे होते, त्यातून कधी मनभेद झाले नाहीत. देशात सध्या काँग्रेसची अवस्था वाईट आहे. पंतप्रधान मोदींच्या कार्यपद्धतीला विरोध असला तरीही त्यांच्यात जे चांगले आहे त्याचा स्वीकार करावा लागणार आहे. मात्र सध्याच्या स्थितीत देशातील राजकारणाचा स्तर खालावला असून सत्ताधारी आणि विरोधक एकमेकांचा सन्मान सोडून शत्रू असल्याप्रमाणे व्यक्तिगत पातळीवर जावून टिका करीत आहेत ही गोष्ट अत्यंत चुकीची असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.


कार्यक्रमाचे अध्यक्ष मंत्री थोरात यांनी संगमनेरच्या सांस्कृतिक क्षेत्रातील कवी अनंत फंदी व्याख्यानमालेचे महत्त्व आणि त्याचा इतिहास यावर भाष्य केले. दरवर्षी श्रोत्यांना वाट पाहायला लावणारी व्याख्यानमाला राज्यात या वैचारिक उत्सवाचा लौकिक असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. डॉ.तांबे म्हणाले की, सध्या देशात वेगवेगळ्या माध्यमांचा वापर करुन नागरिकांमध्ये गोंधळ निर्माण केला जात आहे. अशा प्रकारच्या गोंधळामुळे लोकशाहीच धोक्यात येत असल्याची भीती त्यांनी यावेळी व्यक्त केली. अ‍ॅड.प्रदीप मालपाणी यांनी प्रास्ताविक, अनिल राठी यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन तर अरुण ताजणे यांनी आभार मानले.

Visits: 11 Today: 2 Total: 114985

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *