लालपरी पूर्वीप्रमाणे गावागावांत धावणार कधी? श्रीरामपूर तालुक्यातील विद्यार्थ्यांसह प्रवाशांचे होताहेत हाल

नायक वृत्तसेवा, श्रीरामपूर
तालुक्याच्या ग्रामीण भागातील बहुतांशी गावात सर्वसामान्यांसाठी असलेली महाराष्ट्र शासनाची एसटी बस (लालपरी) अद्याप अपेक्षेप्रमाणे धावत नसल्याने ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसह प्रवाशांना तासननतास रस्त्यावर खासगी वाहनांची वाट पाहत लागत असल्याचे चित्र सर्वत्र दिसत आहे.

करोना काळात तब्बल दोन वर्ष बसेस बंद होत्या. त्यानंतर एसटी कर्मचार्यांच्या आंदोलनामुळे अंदाजे 6 ते 7 महिने बसेस बंद राहिल्या. त्यानंतर ग्रामपंचायत व ग्रामस्थांच्या निवेदनानंतर श्रीरामपूर आगाराच्या एक-दोन बसेस फिरल्या. मात्र त्यानंतर गणेशोत्सवाच्या काळात कोकणामध्ये जास्त बसेस सोडल्याने तसेच राहुरी विद्यापीठ येथे अग्नीवीर भरतीप्रसंगी तिथेही अतिरिक्त बस दिल्याने ग्रामीण भागात सुरु असणार्या बस पुन्हा बंद झाल्या. त्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. श्रीरामपूर तालुक्यातील नाऊर-रामपूर बस गेल्या अनेक दिवसांपासून बंद करण्यात आली होती. वैजापूर आगाराची एकमेव फेरी करणार्या बसमधूनच विद्यार्थी व प्रवासी प्रवास करत असून ही बस वैजापूर स्थानकातूनच फुल्ल होऊन येत असल्याने नाऊर, रामपूर, जाफराबाद, नायगाव, निमगाव खैरी येथील विद्यार्थ्यांना कधी उभे राहून तर कधी जागाच शिल्लक राहत नसल्याने शिक्षणापासून वंचित राहण्याची वेळ आली आहे. तसेच श्रीरामपूर आगाराच्या बसचा वेळ आणि महाविद्यालयीन वेळेचा ताळमेळ नसल्यानेही बसची ‘अवस्था असून अडचण नसून खोळंबा’ अशी झाली आहे.

मुख्यमंत्री शिंदे यांनी देशाच्या अमृत महोत्सवानिमित्त 75 वर्षांवरील ज्येष्ठांना एसटी प्रवास मोफत केला असला तरी श्रीरामपूर आगाराची बस कधी येते तर कधी वेळेवर नसते. त्यामुळे पर्यायी वाहनाने प्रवास करावा लागत असून शासनाच्या सुविधेपासून वंचित राहावे लागत असल्याची भावना ज्येष्ठ नागरिकांमधून व्यक्त होत आहे. दरम्यान, यासंदर्भात श्रीरामपूर आगाराचे आगारप्रमुख राकेश शिवदे यांच्याशी संपर्क साधला असता, वैजापूर आगाराच्या दोन बसेस आणि श्रीरामपूर आगाराच्या दोन फेर्या आठ दिवसांपासून सुरु केल्या आहेत. दिवसभर चालणार्या सर्व फेर्या सुरु करायच्या आहेत. मात्र आगारामध्ये अवघ्या 40 गाड्या उपलब्ध असल्यामुळे सध्या तरी पूर्वी सुरु असलेल्या सर्व फेर्या सुरु करणे शक्य नसल्याचे त्यांनी सांगितले.
