गुजरातचे मन सांभाळण्यात महाराष्ट्राचं नुकसान ः थोरात वेदांता प्रकल्पावरुन राज्य सरकारवर जोरदार टीका


नायक वृत्तसेवा, नगर
वेदांता प्रकल्प महाराष्ट्रातून गुजरातला गेल्यानंतर विरोधकांकडून जोरदार टीका सुरू आहे. अशातच माजी महसूल मंत्री व काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांनी याचा संबंध थेट भाजपच्या ‘ऑपरेशन लोटस’शी जोडला आहे. थोरात म्हणाले, ‘भाजपच्या ऑपरेशन लोटसमध्ये सरकार आणण्यासह प्रकल्प पळवण्याचाही उद्देश असू शकतो. गुजरातचे मन सांभाळण्यात महाराष्ट्राचं नुकसान होत असताना आपण काय फक्त दहीहंड्या फोडायच्या का?’, असा सवालही त्यांनी केला.

अहमदनगर जिल्हा सहकारी बँकेच्या वार्षिक सभेनंतर थोरात यांनी पत्रकारांशी संवाद साधला. त्यावेळी ते बोलत होते. ते म्हणाले, ‘वेदांता प्रकल्प राज्याबाहेर जाणे दुर्दैवी आहे. त्यांना पुण्याजवळील तळेगावची जागाही मान्य होती. पण मागील दोन-तीन महिन्यात काय घडले व नवे सरकार काय करीत होते? हे कळत नाही. आता काहीही कारणे सांगण्यात अर्थ नाही. तीन महिने काय करीत होता, ते सांगा?’ असा सवाल त्यांनी केला.

राज्यातील सरकारवर बाळासाहेब थोरात यांनी जोरदार टीका केली. ते म्हणाले, ‘अतिवृष्टीने 20 लाख हेक्टर क्षेत्रातील शेतीचं नुकसान झाले आहे. नव्या राज्य सरकारने मदतीच्या घोषणा केल्या असल्या तरी अजून पंचनामेच झालेले नाहीत. प्रशासन ठप्प आहे. शासन म्हणून कोणाचंही लक्ष नाही. जनतेचे हाल सुरू आहेत. त्यामुळे कोठे आहे सरकार? या सरकारबद्दल सर्वोच्च न्यायालयात काय व्हायचा तो निर्णय होईल. पण दुसरीकडे या सरकारमध्येच गोंधळाची व मतभेदाची अवस्था आहे. साधे पालकमंत्री ते नेमू शकलेले नाहीत. हे सरकार कायदेशीर आहे की बेकायदेशीर याबाबत सर्वोच्च न्यायालयात निर्णय होईल. पण मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांचे सरकार जनतेसाठी असते. पण यांना मंत्रिमंडळ बनवायला दोन महिने लागले. त्यानंतर खातेवाटपात काही दिवस गेले. अजूनही पालकमंत्री नेमलेले नाहीत. असे कधी घडले नव्हते. हे यांना शोभत नाही,’ अशी टीकाही त्यांनी केली.

थोरात पुढे म्हणाले, ‘कोणी रिव्हॉल्व्हर काढते, कोणी अधिकार्‍यांना मारते, सारा सुसाट कार्यक्रम सुरू आहे. सरकार जनतेसाठी आहे. पण त्यांच्यात अजूनही एकमत होत नाही. तरीही अजूनही सत्कार सुरू आहेत. मतभेद होत असतील तर सरकार चालवण्याला काही अर्थ आहे की नाही, हे तुम्हीच पाहा?’ असेही ते म्हणाले. ‘गोव्यात काँग्रेसचे आमदार फोडण्याची घटना लोकशाहीला अभिप्रेत आहे का? तिची कार्यपद्धती काय आहे? हे जनतेने ओळखावे, असे आवाहनही त्यांनी केले. अशोक चव्हाण व पृथ्वीराज चव्हाण यांचा काँग्रेस सोडण्याचा काहीही विषय नव्हता. भाजपकडून समाजा-समाजात जी फूट पाडण्याचे प्रयत्न सुरू आहेत ते रोखण्यासाठी राहुल गांधींची भारत जोडो यात्रा आहे,’ असंही थोरात म्हणाले.

Visits: 3 Today: 1 Total: 23179

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *