मीनानाथ पांडे यांना जशास तसे उत्तर देण्याचा इशारा! मराठा समाजाविषयी आक्षेपार्ह वक्तव्य; पत्रकार परिषदेतून घेतला समाचार
नायक वृत्तसेवा, अकोले
मराठा समाजाच्या पाठबळावर सर्वच पदे मिळवल्यानंतर आज त्याच मराठा समाज व मराठा योद्धा मनोज जरांगे यांच्याविषयी आक्षेपार्ह वक्तव्य करणारे ज्येष्ठ नेते मीनानाथ पांडे यांचा निषेध नोंदवत त्यांनी जाहीर माफी मागावी. अन्यथा त्यांना जशास तसे उत्तर दिले जाईल असा इशारा अकोले तालुक्यातील मराठा समाजासह अन्य समाजातील कार्यकर्त्यांनी दिला आहे.
ओबीसी समाजाच्या ३ फेब्रुवारी रोजी अहमदनगर येथे होणार्या मेळाव्याच्या नियोजनाची बैठक नुकतीच अकोले येथे पार पडली. यावेळी ज्येष्ठ नेते मीनानाथ पांडे यांनी मराठा योद्धा मनोज जरांगे व मराठा समाजाविषयी आक्षेपार्ह वक्तव्य केल्याच्या निषेधार्थ सोमवारी (ता.२९) अकोले येथील शासकीय विश्रामगृहावर सकल मराठा समाजासह अन्य समाजातील कार्यकर्ते यांनी पत्रकार परिषद घेऊन पांडे यांचा खरपूस शब्दांत समाचार घेतला.
यावेळी बोलताना शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख महेश नवले यांनी मीनानाथ पांडे यांनी मराठा समाजावर बहिष्काराची भाषा करणे योग्य नाही, इतक्या टोकाची भाषा व मनात एवढे विष असेल तर मराठा समाजाच्या कोणत्याही कार्यक्रमाला त्यांनी उपस्थित राहू नये. अकोले तालुक्यात ओबीसी व मराठा समाज गुण्यागोविंदाने एकत्रित नांदत असताना पांडे यांनी समाजा-समाजात बुध्दीभेद करू नये अशी अपेक्षा व्यक्त केली.
अगस्ति कारखान्याचे ज्येष्ठ संचालक अशोक देशमुख यांनी पांडे यांचा ओबीसी समाजाशी काय संबंध असा सवाल करीत त्यांनी ओबीसी समाजासाठी आत्तापर्यंत कोणते काम केले हे जाहीर करावे. त्यांना त्यांच्या जीवनात ओबीसी पुरस्काराऐवजी आदिवासी सेवक पुरस्कार मिळाला यावरून त्यांनी कोणाची चाकरी केली हे सिद्ध होते. त्यांनी स्वतःला आता मानसोपचार तज्ज्ञाचा सल्ला घ्यावा अशी कोपरखळी मारली. पाटपाण्याच्या प्रश्नी माजी मंत्री मधुकर पिचड यांचे मोठे योगदान असून त्यांच्या बरोबर इतरांचेही योगदान असल्याचे सांगत पांडे यांना आपणहून मिरवून घेण्याचा धंदा करावा अशी टीका केली.
अकोले वकील संघाचे अध्यक्ष अॅड. वसंत मनकर म्हणाले, देशात व राज्यात कितीही जातीय दंगली झाल्या तरी अकोलेत जातीय तेढ कधीही निर्माण झाला नाही. मात्र पांडे यांनी केलेल्या वक्तव्यामुळे आयुष्यभर केलेली कमाई वाया घातली असल्याचे सांगितले. मुस्लीम समाजाचे नेते शाहिद फारुकी यांनी मराठा समाजाच्या प्रत्येक आंदोलनात मुस्लीम समाज कायम पाठिशी राहिला असून अकोलेतील मुस्लीम समाजाने कधीही जातीभेद केला नाही. पांडे यांच्या जातीभेद निर्माण करणार्या वक्तव्याचा मुस्लीम समाजाच्यावतीने त्यांनी जाहीर निषेध नोंदवला.
आरपीआयचे तालुकाध्यक्ष राजेंद्र गवांदे यांनी रामदास आठवले यांनी कायम मराठा आरक्षण बाजूने भूमिका घेतली आहे. अकोलेत जातीय तेढ निर्माण होणार नाही असे काम सर्वांकडून होणे अपेक्षित असताना ओबीसी समाजाच्या तथाकथित नेत्याने गरळ ओकली त्याचा आम्ही निषेध करत असल्याचे सांगितले. शैलेश देशमुख यांनी पांडे यांनी समाजात तेढ निर्माण करू नये, त्यांना ओबीसी मतदारांनीच मतदान केले नाही तर मराठा समाजानेही केले हे त्यांनी विसरू नये. त्यामुळे पांडे यांनी कारखान्याच्या संचालक पदाचा राजीनामा द्यावा अशी मागणी केली.
यावेळी माजी नगरसेवक सचिन शेटे, सामाजिक कार्यकर्ते संदीप दराडे, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष शरद चौधरी, राष्ट्रवादीचे नेते राजेंद्र कुमकर, काँग्रेसचे बाबासाहेब नाईकवाडी, राष्ट्रवादीचे नेते डॉ. मनोज मोरे, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष सुरेश नवले आदिंनी पांडे यांच्या बेताल वक्तव्याचा जाहीर निषेध केला. प्रास्ताविक डॉ. संदीप कडलग यांनी केले. सूत्रसंचालन दिलीप शेणकर यांनी केले तर आभार सोमनाथ नवले यांनी मानले.
मीनानाथ पांडे यांनी मराठा आरक्षणाच्या व मराठा योद्धा मनोज जरांगे यांच्या विरोधात आक्षेपार्ह विधान केल्यामुळे संतप्त मराठा समाजातील युवकांनी पांडे यांना सोशल मीडियावर ट्रोल केले आहे. यामध्ये अनेक राजकीय, सामाजिक क्षेत्रातील लोकांनी त्यांचा निषेध केला तर एका तरुणाने तर त्यांना फोन करून अतिशय खालच्या पातळीवर अर्वाच्च भाषेत खडे बोल सुनावले असल्याचा रेकॉर्डिंग कॉल व्हायरल केला आहे.