बालिकेच्या मृत्यूप्रकरणी डॉक्टरवर गुन्हा दाखल करा वेठबिगारी प्रकरण; राष्ट्रीय छावा संघटनेची मागणी


नायक वृत्तसेवा, संगमनेर
तालुक्यातील शिंदोडी येथे मेंढपाळ करण्यासाठी इगतपुरी तालुक्यातून आणलेल्या अल्पवयीन बालिकेच्या मृत्यूप्रकरणी संबंधित डॉक्टरांवर देखील गुन्हा दाखल करावा, अशी मागणी राष्ट्रीय छावा संघटनेचे उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष प्रवीण कानवडे यांनी संगमनेरचे उपविभागीय पोलीस अधिकारी राहुल मदने यांच्याकडे केली आहे.

सदर निवेदनात म्हटले आहे की, गेल्या काही दिवसांपूर्वी मेंढी पालन करण्यासाठी शिंदोडी येथील एका कुटुंबाने नाममात्र पैसे देऊन इगतपुरी तालुक्यातील दहा वर्षाच्या मुलीला आणले होते. परंतु मुलीला अचानक अकोले बाह्यवळण रस्ता येथील एका हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी आणले होते. अचानक मुलीच्या तब्येतीला काय झाले? मुलीची अवस्था बघता सदर हॉस्पिटल सर्वात प्रथम पोलिसांना एमएलसीसाठी खबर देणे गरजेचे असताना देखील उपचार सुरू ठेवले, पोलिसांना कुठलीही खबर दिली नाही, मुलीला काय आजार होता काय घटना झाली होती. तिच्या गळ्याभोवती जखमा कशा? मुलीची परिस्थिती नाजूक होती तर इतर हॉस्पिटलमध्ये का हलविण्यात आले नाही, मुलीच्या कुटुंबियांना त्वरीत का कळविण्यात आले नाही, पीडित मुलगी पुन्हा या मेंढपाळ कुटुंबाकडे कशी गेली हे सर्व प्रकार संशयास्पद असून तिच्या मृत्यूला संबंधित डॉक्टर हे देखील तितके जबाबदार आहे. त्यामुळे त्यांच्यावर देखील खुनाचा गुन्हा दाखल करावा. अन्यथा आमच्या संघटनेच्यावतीने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा दिला आहे.

तसेच संगमनेर नगरपरिषद प्रशासनाने व वैद्यकीय अधीक्षक ग्रामीण रुग्णालयाने त्वरीत संबंधित हॉस्पिटलला क्लिनिकसाठी का, हॉस्पिटलसाठी परवानगी होती, ना हरकत दाखला दिला होता का? तसेच सदर हॉस्पिटलकडे बॉम्बे नर्सिंग होम अ‍ॅक्ट नोंदणीचे सर्टिफिकेट आहे का? सदर हॉस्पिटल बोगसपणे चालू होते का? सदर हॉस्पिटल महाराष्ट्र रिजनल टाऊन प्लॅनिंग अ‍ॅक्टनुसार व यूडीसीपीआर नियमाप्रमाणे आहे का? याचीही चौकशी करावी, अशा मागण्या राष्ट्रीय छावा संघटनेचे उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष प्रवीण कानवडे, जालिंदर राऊत, संपर्क प्रमुख दिनकर घुले, शहराध्यक्ष दीपक चोरमले, उपाध्यक्ष विलास रसाळ, कार्याध्यक्ष बाबासाहेब गुंजाळ, विजय पवार, राजू चरवंडे, वासुदेव महाराज सोनवणे, अक्षय पन्हाळकर, राजू उदावंत, सोमानाथ कुलथे, चंद्रकांत पवार आदी कार्यकर्त्यांनी केल्या आहेत.

Visits: 14 Today: 2 Total: 115708

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *