सावधान! अकोले तालुक्यात 65 जनावरे लंपीने बाधित लसीकरणावर सर्वाधिक भर; 20 हजार जनावरांचे लसीकरण

नायक वृत्तसेवा, अकोले
तालुक्यात लंपी आजाराने 65 जनावरे बाधित झाली असून धामणगाव आवारी येथील एका गायीचा मृत्यू झाला आहे. तर आत्तापर्यंत 20 हजार जनावरांचे लसीकरण करण्यात आल्याची माहिती तालुका पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. अशोक धिंदळे यांनी दिली.

अकोले तालुक्यात सरकारी आकड्यानुसार मोठी जनावरे 98 हजार असून छोटी जनावरे शेळ्या मेंढ्या 70 हजार आहेत. देशात व राज्यात लंपी आजाराने जनावरे मृत्युमुखी पडत असून तालुक्यात पशुवैद्यकीय विभागाने सतर्क होत लसीकरण सुरू केले आहे. गेल्या तीन दिवसांपूर्वी 18 जनावरे बाधित झाली होती. मात्र मंगळवारी (ता.13) हा आकडा 65 वर जाऊन पोहोचला आहे. त्यात एका गायीचा मृत्यू झाला आहे. टाकळी, गर्दणी, ढोकरी, धामणगाव आवारी येथे मोठ्या प्रमाणात तर सातेवाडी, मुतखेल, शेलविहिरे येथे तुरळक प्रमाणात बाधित जनावरे सापडली आहेत. दरम्यान, तालुक्यात 100 खासगी प्रॅक्टिस करणारे पशुवैद्यक असून त्यांची पंचायत समिती येथे बैठक घेऊन सूचना देण्यात आल्या आहेत. ग्रामसेवकांमार्फत स्थानिक ग्रामस्थांना गोठे स्वच्छ व फवारणी करण्यासही सांगण्यात आले आहे.

वन विभागाने 8 हजार लस दिल्या असून दहा पथके त्या उद्यापर्यंत देऊन होतील. तर लालतारा मेडिकल यांनी 29 बॉटल दिल्या आहेत. औषधांचा तुटवडा येत असल्याने दात्यांनी मदत करण्याचे आवाहनही करण्यात आले आहे. दुभत्या जनावरांमध्ये हे प्रमाण जास्त असून डास व माशांमुळे हा आजार वाढत असल्याचे समोर आले आहे. तसेच शेतकरी खासगी ठिकाणी जाऊन लसीकरणही करत असून चार दिवसांत पन्नास हजारांपेक्षा अधिक जनावरांना लसीकरण देऊन पूर्ण होईल असे चित्र आहे. परंतु, लसींचा तुटवडा असल्याचे समोर आले आहे.

कोविड, मंकीपॉक्स, स्वाईन फ्ल्यू, मलेरिया आणि डेंग्यू यांसारख्या समस्यांना नागरिक तोंड देत असताना लम्पी त्वचारोग हा चिंतेचा विषय बनला आहे. आठ राज्ये आणि एका केंद्रशासित प्रदेशात ‘लम्पी चर्मरोगा’मुळे आत्तापर्यंत 7 हजार 300 हून अधिक पशूंचा मृत्यू झाला आहे. हा संसर्ग रोखण्यासाठी लसीकरण मोहिमेला गती देण्यात आली असून सर्व शेतकरी व पशुपालकांना प्राण्यांचे त्वरीत लसीकरण करून घेण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
– डॉ. अशोक धिंदळे (अकोले तालुका पशुवैद्यकीय अधिकारी)

Visits: 227 Today: 1 Total: 1584287

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *