आता गुंजाळवाडीतील बिबट्याही झाला जेरबंद! मधल्या मळ्यात अडकला पिंजर्‍यात; आईशी ताटातुट झाल्याची चर्चा..


नायक वृत्तसेवा, संगमनेर
संगमनेर तालुक्याच्या वेगवेगळ्या भागात सध्या बिबट्या आणि त्यांचा नागरी वस्त्यांच्या परिसरातील वावर यातून भीतीचे वातावरण निर्माण झालेले असतानाच आता गुंजाळवाडीतही ऐन तारुण्यात आलेला बिबट्या अडकला आहे. मागील अनेक दिवसांपासून पकडण्यात आलेला बिबट्या आणि त्याच्या आईचा या परिसरात मुक्त संचार होता. त्यांच्याकडून माणसावर हल्ला झाल्याचे एकही उदाहरण नाही. मात्र गेल्या महिन्याभरात तालुक्यातील दोन घटनांमध्ये बिबट्यांनी दोघा महिलांचा बळी घेतल्याने बिबट्यांचा संचार असलेल्या गावांमध्ये दहशत निर्माण झाली आहे. त्यातूनच गुंजाळवाडीतील या दोन्ही बिबट्यांना पकडण्याची मागणी समोर आल्याने वनविभागाने शिवारातील मधल्या मळ्यात पिंजरा लावला होता. त्यात आज सकाळी एक बिबट्या अटकला असून त्याला संगमनेर खुर्दच्या नर्सरीत हलवण्यात आले आहे.


गेल्या महिन्यात 11 सप्टेंबररोजी सकाळी अकराच्या सुमारास निमगांव टेंभी येथील वर्पेवस्तीवर घराबाहेर धुणे धुणार्‍या संगिता शिवाजी वर्पे (वय 40) या महिलेवर पाठीमागून हल्ला करीत बिबट्याने त्यांना सुमारे 25 फूट फरफटत नेले होते. आसपासच्या नागरिकांनी मदतीसाठी धाव घेत आरडाओरड केल्यानंतर त्याने हल्ला केलेल्या महिलेला तेथेच सोडून धूम ठोकली. मात्र त्याच्या हल्ल्यात सदरील महिलेचा जागीच मृत्यू झाला होता. या घटनेनंतर परिसरातील नागरिकांनी माणसांवर हल्ले करणार्‍या बिबट्यांचा लागलीच बंदोबस्त करण्याची मागणी समोर आली. मात्र बनविभागाने त्याकडे फारसे गांभीर्याने पाहिले नाही.


त्याचा परिणाम गेल्या आठवड्यात ऐन विजयादशमीच्या पूर्वसंध्येला 11 ऑक्टोबररोजी निमगांव टेंभीच्या घटनेची पुनरावृत्ती या गावालगतच्या देवगाव शिवारात झाली. या घटनेत सायंकाळी सहाच्या सुमारास देवगाव परिसरातील पानमळा भागात मका कापणीचे काम करणार्‍या योगिता आकाश पानसरे (वय 38) या महिलेवरही बिबट्याने झडप घालीत त्यांच्यावर जीवघेणा हल्ला केला. विशेष म्हणजे यावेळी आसपासच्या भागात अन्यकाही महिलाही मका कापणीचे काम करीत होत्या. त्यांनी आरडाओरड केल्यानंतर बिबट्या पळून गेला खरा, मात्र त्याच्या तीक्ष्ण दातांनी खोलवर जखमा झाल्याने त्यातून मोठ्या प्रमाणात रक्तस्राव होवून उपचारापूर्वीच अवघ्या महिनाभरातच दुसर्‍या एका महिलेचाही बळी गेला.


या दोन्ही घटना अवघ्या महिन्याभरातच घडल्याने संगमनेर तालुक्यातील ज्या भागात बिबट्यांचा संचार आहे अशा सर्वच ठिकाणच्या ग्रामस्थांमध्ये प्रचंड दहशत निर्माण होवून परिसरातील बिबट्यांना पकडण्यासाठी पिंजर्‍यांची मागणी होवू लागली. त्यातूनच मागील अनेक महिन्यांपासून संपूर्ण गुंजाळवाडी शिवारात सर्वत्र संचारणार्‍या बिबट्याच्या मादीसह वयात आलेल्या तिच्या बछड्याला पकडण्याची मागणी समोर आली. गुंजाळवाडीचे ग्रामपंचायत सदस्य पंडित गुंजाळ यांनी वनविभागाकडे तशी मागणी केल्याने मधला मळा परिसरात पिंजरा लावण्यात आला होता. त्यात आज (ता.18) सकाळी वयात आलेला बिबट्या अडकला. मात्र त्याची आई अजूनही मोकळीच आहे.


पिंजर्‍यात बिबट्या अडकल्याची माहिती मिळताच वनविभागाने मधला मळा परिसरात जावून सदरील पिंजरा संगमनेर खुर्दच्या नर्सरीत हलवला आहे. मात्र या उपरांतही गुंजाळवाडीकरांच्या मनात असलेली भीती दूर झालेली नसून बछडा पकडला गेल्याने त्याची आई सैरभैर होवून माणसांवर हल्ला करण्याची शक्यता असल्याने वनविभागाने आई पकडली जाईस्तोवर येथील पिंजरा कायम ठेवावा अशी मागणी करण्यात आली आहे.


गुंजाळवाडी शिवारात गेल्या अनेक दिवसांपासून बिबट्याची मादी आणि तिच्या बछड्याचा संचार असून मधला मळा भागातील लिंबाच्या झाडावर कोंबड्या बसत असल्याने या परिसरातच त्यांचा वावर आहे. आज सकाळी वनविभागाच्या पिंजर्‍यात अडकलेला बिबट्या बछडा असून तो पकडला गेल्याने त्याच्या आईकडून माणसांवर हल्ला होण्याची भीती आहे. त्यामुळे वनविभागाने मादी बिबट्या पिंजर्‍यात अडकेपर्यंत येथील पिंजरा कायम ठेवावा व नागरिकांना दिलासा द्यावा.
आरती गुंजाळ
सदस्य, ग्रामपंचायत

 

Visits: 86 Today: 3 Total: 113030

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *