… अखेर नरभक्षक बिबट्या पिंजर्यात अडकला! आदिवासी महिलेवर हल्ला करुन केले होते ठार
नायक वृत्तसेवा, संगमनेर
तालुक्यातील निमगाव खुर्द येथील चंदन टेकडी परिसरातील मीराबाई रामभाऊ मेंगाळ (वय 62) या आदिवासी महिलेवर बिबट्याने 6 सप्टेंबरला पहाटेच्या सुमारास अचानक बिबट्याने हल्ला करून ठार केले होते. त्यानंतर सलग दुसर्या दिवशी 4 ते 5 किलोमीटरवर अंतरावरील सावरचोळ-मेंगाळवाडी येथील जिजाबाई वसंत कातोरे (वय 45) या आदिवासी महिलेवर पहाटेच्या सुमारास बिबट्याने पुन्हा प्राणघातक हल्ला करून जखमी केल्याची घटना घडली होती. त्यामुळे नरक्षभक बिबट्याला जेरबंद करण्यासाठी वनविभागाने निमगाव खुर्द येथील चंदन टेकडी व सावरचोळ-मेंगाळवाडी येथील जानकुबाईचा दरा येथे पिंजरे पिंजरा लावले होते. अखेर बिबट्या जेरबंद करण्यात यश आले आहे.
शुक्रवारी (ता.9) पहाटे चारच्या सुमारास हा बिबट्या पिंजर्यात ठेवण्यात आलेल्या बकरीची शिकार करण्याच्या नादात पिंजर्यात जेरबंद झाला. बिबट्या जेरबंद झाल्याचे समजतात कातोरे यांनी तातडीने संगमनेर वन विभागाला कळविले. त्यावर वन विभागाचे वनपरिक्षेत्र अधिकारी सचिन लोंढे, वनपाल संगीता कोंढार, जोत्स्ना बेंद्रे, गजानन पवार, वाहन चालक रवी पडवळ व वन कर्मचारी घटनास्थळी दाखल होऊन बिबट्याची रवानगी संगमनेर येथील वन विभागाच्या रोपवाटिकेत केली आहे.
दरम्यान निमगाव खुर्द, सावरचोळ-मेंगाळवाडी परिसरामधील नागरिकांनी हा नरभक्षक बिबट्या पिंजर्यात अडकल्याने समाधान व्यक्त केले आहे. डोंगर पायथ्याशी राहणार्या नागरिकांनी रात्रीच्या वेळेस, एकटे घराच्या बाहेर पडू नका, रात्रीच्या वेळेस नागरिकांनी हातात टॉर्च, काठी व आवाजाचे साधन घेऊनच बाहेर पडावे. आपले पशुधन हे जाळी लावलेल्या गोठ्यात बंदिस्त करावे. रात्रीच्या वेळेस कोणीही अंगणात किंवा वसरीत झोपू नये, घरातच झोपावे असे परिपत्रक वन विभागाने काढले असून, ते संपूर्ण परिसरात सोशल मीडियाच्या माध्यमातून प्रसारित करण्यात आले आहे.