जातीच्या दाखल्यांअभावी ग्रामपंचायत सदस्य पदे रिक्त राहणार अकोले तालुक्यातील 45 ग्रामपंचायतींची निवडणूक; तीन बिनविरोध

नायक वृत्तसेवा, अकोले
तालुक्यातील 41 गावात सरपंच पदासाठी 175, तर सदस्य पदासाठी 378 उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. तळे येथे 11, केळुंगण येथे 8, केळी रुम्हणवाडी, मान्हेरे व शेणीत या तीन गावांत प्रत्येकी 7 उमेदवार सरपंच पदाच्या शर्यतीत नशीब आजमावत आहेत. मात्र, जातीच्या दाखल्यांअभावी सदस्य पदे रिक्त राहणार आहेत.

सध्या 45 ग्रामपंचायत निवडणुकांची रणधुमाळी सुरू आहेत. यातील तीन ग्रामपंचायतती बिनविरोध झाल्या आहेत. परंतु, अनुसूचित जमातीच्या दाखल्यांअभावी सदस्यपदाच्या बहुतेक जागा रिक्त राहिल्या आहेत. थेट जनतेतून सरपंच निवडीमुळे ग्रामपंचायत सदस्य होण्यास लवकर कुणी धजावत नसल्याचे चित्र काही गावांत दिसत आहे. सावरकुटे गावात सरपंच पदासाठी एकच अर्ज दाखल झाला होता. त्यामुळे सरपंच बिनविरोध झाले. पण येथे सदस्य होण्यासाठी एकही अर्ज नसल्याने ही सर्व पदे रिक्त राहिली आहेत. यावरून ही ग्रामपंचायत कारभार कशी करणार?

तळे ग्रामपंचायतीत 4 सदस्य बिनविरोध झाले, उर्वरित 3 जागांसाठी 7 उमेदवार रिंगणात आहेत. शेणित बुद्रुक ग्रामपंचायतीत 7 उमेदवार सरपंच पदाच्या निवडणूक रिंगणात असून, येथे 8 सदस्य बिनविरोध निवडून आले आहेत. 45 पैकी एकूण 4 सरपंच व 162 सदस्य बिनविरोध निवडून आले आहेत. सरपंच पदासाठी 263, तर सदस्य पदासाठी 753 अर्ज दाखल होते. 4 सरपंच पदाचे व 22 सदस्य पदाचे अर्ज अपात्र ठरले. सरपंच पदाच्या 79 व सदस्य पदाच्या 191 उमेदवारांनी अर्ज माघारी घेतले. काही ठिकाणी दोन ते तीन जागांसाठी लढत होत आहे. पाडोशी ग्रामपंचायत सरपंच पदासाठी 6, तर सदस्य पदासाठी 4 व पळसुंदे ग्रामपंचायत सरपंच पदासाठी 6 व राहणार आहेत. सदस्य पदासाठी 6 उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. दुर्गम आदिवासी भागातील खुंटेवाडी, शेलद व जामगाव या तीन ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या आहेत. तेरुंगण येथे सरपंच पदासाठी 4 उमेदवार रिंगणात असून, 1 सदस्यपद बिनविरोध झाले. मात्र, नामनिर्देशन अर्ज दाखल न झाल्याने सदस्य पदाच्या सहा जागा रिक्त राहणार आहेत. अशीच स्थिती माळेगाव येथे असून, सरपंच पदासाठी दोघांत लढत आहे. एक सदस्य बिनविरोध असून, सहा जागा रिक्त राहणार आहेत.
