राहुरीमध्ये सलग तीन दिवस दोन गटांत धुमश्चक्री महिलांच्या ठिय्यानंतर चार जणांविरोधात गुन्हा दाखल


नायक वृत्तसेवा, राहुरी
शहरात दुचाकीची धडक लागल्याच्या कारणावरून तरुणांच्या दोन गटांत हाणामारी झाली. त्यानंतर एका गटाने शहरातील विविध भागांत दुसर्‍या गटाच्या तरुणांना एकेकटे गाठून मारहाण सुरू केली. सलग तीन दिवस धुमश्चक्री सुरू राहिली. महिला व नागरिकांनी पोलीस ठाण्यात ठिय्या दिल्यावर चार जणांविरोधात गुन्हा दाखल झाला.

राहुरी शहरातील राजवाडा परिसरात काही तरुण 31 डिसेंबरच्या संध्याकाळी नववर्षाच्या स्वागताचा जल्लोष करीत होते. त्यावेळी एकलव्य वसाहतीतील तीन दुचाकी भरधाव आल्या. एका मुलाला दुचाकीची जोरदार धडक बसली. त्यावरून राजवाडा विरुद्ध एकलव्य वसाहत तरुणांमध्ये भांडण, मारामार्‍या झाल्या. त्यावेळी दुचाकीवरील तरुणांनी माघार घेतली. मात्र, सूड घेण्यासाठी पेटून उठले. दुसर्‍या दिवशी रविवारी (ता.1) राजवाडा येथील राहुरी कॉलेजमध्ये जाणार्‍या एका तरुणाला व कृषी विद्यापीठातील शाळेत जाणार्‍या एका मुलाला एकेकटे गाठून एकलव्य वसाहतीमधील दहा-बारा मुलांनी बेदम मारहाण केली. त्यामुळे राजवाडा परिसरात दहशत निर्माण झाली. सोमवारी (ता.2) सायंकाळी पाच वाजता प्रगती शाळा रस्त्यावर दहावीच्या एका मुलाला मारहाण झाली.

तीन मुलांना मारहाण झाल्यामुळे राजवाडा परिसरातील महिला व नागरिक संतप्त झाले. त्यांनी पोलीस ठाण्यात ठिय्या दिला. टारगटांचा बंदोबस्त करा, मारहाणीचे गुन्हे नोंदवा, अशी मागणीही केली. त्यानंतर मारहाण झालेल्या सार्थक संतोष साळवे (रा. राजवाडा, राहुरी) या मुलाच्या फिर्यादीवरून चार जणांविरोधात गुन्हा नोंदविण्यात आला. सुनील दळवी, आशिष उल्हारे, आदेश माळी (रा. एकलव्य वसाहत, राहुरी) व एक अनोळखी तरुण, अशी आरोपींची नावे आहेत. इतर मुले अल्पवयीन असल्याने त्यांना आरोपी करण्यात आलेले नाही. गुन्हा दाखल झाल्यानंतर मंगळवारपासून वातावरण शांत झाले.

Visits: 57 Today: 1 Total: 638608

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *