पठारभागात पावसाचे थैमान; जनजीवन विस्कळीत! रस्ते गेले वाहून तर घरांच्या भिंती पडल्याने मोठे नुकसान

नायक वृत्तसेवा, घारगाव
संगमनेर तालुक्याच्या पठारभागात पावसाने चांगेलच थैमान घातले आहे. त्यामुळे सर्वत्र पाणीच पाणी झाल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. ओढे-नाले तुडूंब भरून वाहू लागले असून रस्त्यांवरूनही पाणी वाहत आहे. याचबरोबर गावांसह वाड्या-वस्त्यांचे संपर्क तुटले असून, शेतीचे बांधही फुटले तर काही घरांच्या भिंतीही पडल्या असल्याने मोठे नुकसान झाले आहे.

गेल्या दोन-तीन दिवसांपासून पठारभागात पावसाने अक्षरशः धूमशान केले. आज पहाटे तुफान पाऊस झाल्याने सर्वत्र पाणीच पाणी झाले आहे. कधी न वाहणारे ओढे-नालेही तुडूंब भरून वाहू लागले आहेत. शेतांमध्येही मोठ्या प्रमाणात पाणीच पाणी साचल्याने बांध फुटल्याने मातीही वाहून गेली आहे. तसेच अनेक गावांमधील मातीच्या घरांच्या भिंती पडल्या आहेत. तर काही ठिकाणी रस्तेही वाहून गेल्याने सर्वसामान्य नागरिकांचे मोठे हाल झाले आहे.

केळेवाडी ते अकलापूर येथील पुलावरून पुन्हा पाणी वाहत असल्याने गावांचा संपर्क तुटला आहे. नांदूर-खंदरमाळ परिसरातही पावसाने थैमान घातल्याने अनेक रस्ते वाहून गेले आहेत. गावांसह वाड्या-वस्त्यांवर जाणार्‍या रस्त्यांची पावसाने अक्षरशः वाट लावली आहे. रस्त्यांवरून पाणीच पाणी वाहत आहे. लहुचामळा ते ऐठेवाडी येथेही पावसामुळे रस्ता वाहून गेला आहे. त्यामुळे मोठे नुकसान झाले आहे. तर दुसरीकडे छोटे सिमेंट बंधारेही तुडूंब भरून वाहू लागले आहे तर पाझर तलावाही निम्म्याच्या वर भरून गेले आहे.

माळेगाव पठार ते आंबीखालसा रस्त्यावरूनही मोठ्या प्रमाणात पाणी वाहत आहे. शेंडीवाडी येथील बाळू चंद्रभान उगले, बाळू पांडुरंग संभेराव, निवृत्ती नामदेव उगले यांच्या घरांच्या भिंती पडल्या आहेत. तर हिवरगाव पठार येथील बाबुराव कारभारी डोळझाके, ठकूबाई रामदास नागरे यांच्याही घरांची पडझड झाली आहे. जांबुत खुर्द येथेही नाला फुटून पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. पठारभागात ज्याठिकाणी पावसामुळे नुकसानी झाल्या आहेत त्या सर्वांचे पंचनामे करण्यात यावे अशी मागणी शिवसेनेचे तालुकाप्रमुख जनार्दन आहेर, शांताराम उर्फ बापू गाडेकर, किशोर डोके, दिलीप साळगट, उत्तम ढेरंगे, अशोक वाघ, दत्ताभाऊ गाडेकर, गणेश धात्रक, एकनाथ मुंढे, भाऊसाहेब भागवत, नंदू कान्होरे आदिंनी केली आहे.

Visits: 110 Today: 1 Total: 1112882

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *