नेहे परिवाराकडून निराधरांना खाऊचे वाटप
![]()
नायक वृत्तसेवा, संगमनेर
समाजाचे आपण काहीतरी देणे लागतो, या भावनेतून निराधारांना मानसिक व शारीरिक आधार देत त्यांची उमेद जागवण्यासाठी आपल्या लहान मुलाच्या वाढदिवसाच्या वायफळ खर्चाला फाटा देत निराधार, निराश्रितांच्या मुखी प्रेमाचे दोन घास भरवण्याची केवळ कल्पना नसून प्रत्यक्ष कृतीतून वाढदिवसाला फाटा देत एक आगळा-वेगळा उपक्रम नेहे परिवाराने राबवून समाजामध्ये एक आदर्श निर्माण केला आहे. तर दुसरीकडे धनधांडग्यांकडे याबाबत उदासीनता दिसून येते.

परंतु समाजातील मानसिकता हेरून पत्रकार गोरक्ष नेहे यांनी आपल्या आयुषच्या वाढदिवसाचे औचित्य साधून संगमनेर येथील साई आश्रम येथील निराश्रित एड्सग्रस्तांच्या मुला-मुलींना खाऊचे वाटप करून एक सामाजिक भान जपले. प्रत्यक्ष भेट घेऊन जातीने विचारपूस करून या मुलांच्या चेहर्यावरचे हसू त्यांनी फुलवल्याने मुलांमध्ये एक आशेचा किरण पल्लवित झाला. या बालकांना आपल्या आई-वडिलांची जाणीव होत असली तरी अशा उपक्रमातून आपल्याही पाठीमागे कोणीतरी पाठिराखा आहे आणि आपल्यावर समाजाचे लक्ष असल्याची जाणीव त्यांच्या डोळ्यात दिसत होती. समाजाच्या गोष्टी समाजासाठी असाच उपक्रम समाजातील इतर सेवाभावी संस्था व सामाजिक कार्यकर्त्या आदिंनी राबवावा. जेणेकरून अशा अनेक संस्था समाजासाठी अहोरात्र परिश्रम करीत आहे. या चैत्र पालवीतून एक वेगळी हिरवळ उभी राहील व आपल्याकडील समस्यांचे निराकरण होईल असे आवाहनही गोरख नेहे यांनी केले. यावेळी संस्थेचे अध्यक्ष संतोष पवार, पत्रकार सुखदेव गाडेकर, संजय साबळे, गणेश नेहे, राजू नरवडे आदी उपस्थित होते.
