आम्हांला विधवा म्हणू नका, तर एकल महिला म्हणा! करोना एकल महिलेने भावनांना करुन दिली मोकळी वाट

नायक वृत्तसेवा, श्रीरामपूर
करोनाच्या पहिल्या लाटेत माझे सासरे, नंतर पती, तर दुसर्‍या लाटेत मी वडील गमावले. करोनामुळे आमच्या कुटुंबावर काय संकट आले… आमचे काय हाल झाले? हे आमचे आम्हांलाच माहीत. आता आम्ही कुठे त्यातून सावरत आहोत. अजूनही आमच्या मनाच्या जखमा भरलेल्या नाहीत. पण समाजाला हात जोडून एकच सांगणं आहे, आम्हांला विधवा म्हणू नका, तर एकल महिला म्हणा. विधवा म्हटलं की मनाला प्रचंड वेदना होतात,’ असं सांगत कधीही हाती माईक न घेतलेल्या संगीता संदीप कुरूंद या करोना एकल महिलेने आपल्या भावनांना मोकळी वाट करून दिली.

श्रीरामपूर येथील आझाद मैदानातील मानाच्या 72 वर्षांच्या सार्वजनिक गणेश मंडळाच्यावतीने श्रीरामपूर शहर व तालुक्यातील करोना एकल महिलांना समाजात मान-सन्मान मिळावा, दुःखाचे विस्मरण व्हावं, या उद्देशाने आरतीचा मान देण्यात आला. यावेळी कविता अशोक परभणे, दुर्गा राजेंद्र नाटकर, शालिनी बाळासाहेब ससाणे, भूमिका आशिष बागुल, सुनंदा बागुल, कावेरी पवार, वंदना संतोष काळे, चैत्राली प्रशांत गवारे, अरुणा राजू शेळके, माया जाधव, वेरूणिका गायकवाड, ज्योती क्षीरसागर, सविता क्षीरसागर या करोना एकल महिलांसह करोना एकल महिला पुनर्वसन समितीच्या जिल्हा समन्वयक मनीषा कोकाटे, सेवानिवृत्त मुख्याध्यापिका हेमलता कुदळ, अनुराधा डोखे यांच्या हस्ते गणेशाची आरती करण्यात आली.

या महिलांचे गुलाबपुष्प देऊन स्वागत करण्यात आले. करोनामुळे होरपळलेल्या या महिलांचे प्रश्न, अडचणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यापर्यंत पोहोचवून त्या सोडवण्यासाठी तसंच स्वतंत्र धोरण, योजना आखण्यासाठी प्रयत्न करण्यात येईल, असं करोना एकल महिला पुनर्वसन समितीचे तालुका समन्वयक व मिशन वात्सल्य शासकीय समितीचे सदस्य मिलिंदकुमार साळवे यांनी यावेळी सांगितले.

Visits: 132 Today: 1 Total: 1111521

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *