अखेर सुगाव मारहाण प्रकरणी आठ जणांवर खुनाचा गुन्हा! आरोपींमध्ये तीन महिलांचा समावेश; अकोले पोलिसांकडून चौघांना अटक..


नायक वृत्तसेवा, अकोले
संपूर्ण राज्याला हादरवणार्‍या सुगाव महिला हत्याकांडातील आरोपी अण्णा उर्फ मच्छिंद्र पांडुरंग उर्फ मुक्ताजी वैद्य याला रविवारी सुगावमध्ये संतप्त जमावाने लाठ्या-काठ्यांसह लाथाबुक्यांनी बेदम मारहाण केली होती. या घटनेनंतर अत्यवस्थ झालेल्या वैद्यला सुरुवातीला अकोले व नंतर संगमनेर येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले होते, मात्र त्याचा मृत्यू झाला. याप्रकरणी मयत वैद्यच्या मुलाने अकोले पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली असून त्यावरुन पोलिसांनी सुगाव खुर्दमधील आठ जणांवर खुनाचा गुन्हा दाखल केला असून त्यातील चौघांना अटक करण्यात आली आहे. गुन्हा दाखल झालेल्या आरोपींमध्ये तीन महिलांचाही समावेश आहे.

याबाबत अकोले पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार सदरची घटना रविवारी (ता.१०) सायंकाळी साडेचार वाजण्याच्या सुमारास सुगाव खुर्दमध्ये घडली. गावात राहणार्‍या एका बारावर्षीय अल्पवयीन मुलीला तिच्या घराचा दरवाजा तोडून आरोपी अण्णा वैद्य याने मारहाण केली व केसांना धरुन फरफटत तिला आपल्या घरापर्यंत आणले. या दरम्यान गावातील काही महिलांनी त्याच्या या कृत्याला विरोध करण्याचाही प्रयत्न केला, मात्र त्याने प्रत्येकाला धमक्या दिल्याने त्याच्या दहशतीसमोर सगळ्यांनाच माघार घ्यावी लागली. या घटनेनंतर संतप्त झालेल्या सुगावमधील ग्रामस्थांनी एकत्रित होवून सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास आरोपी वैद्य याच्या घरी जावून त्याला जाब विचारला. यावेळी त्याने दिलेल्या उत्तराने संतप्त झालेल्या गावकर्‍यांनी लाठ्या-काठ्यांसह लाथाबुक्यांनी मारहाण करीत त्याच्या घरात नासधूसही केली.

वास्तविक सुगावमध्ये शेतकर्‍यांच्या विद्युत मोटारींच्या वायर चोरल्याच्या संशयावरुन २००५ साली आरोपी अण्णा वैद्य याच्या शेतजमिनीची पोलिसांनी तपासणी केली होती. त्यावेळी पोलिसांना श्रीमती राऊत (रा. संगमनेर), पुष्पा देशमुख (रा. कुंभेफळ), शशिकला गोरडे (रा. पानसरवाडी) व कमल कोल्हे (रा. धांदरफळ) या महिलांचे मृतदेह आढळून आले होते. त्यावरुन आरोपी अण्णा वैद्य याच्यावर एकामागून एक चार खुनाचे गुन्हे दाखल होवून पोलिसांनी त्याला अटक केली होती. तेव्हापासून २०१८ पर्यंत तो पुण्यातील येरवडा कारागृहात कैद होता. पुष्पा देशमुख यांच्या खून प्रकरणात त्याला संगमनेरच्या अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयाने जन्मठेप सुनावली होती. मात्र त्याने त्या विरोधात उच्च न्यायालयात अपील केल्याने २०१८ मध्ये तो निर्दोष ठरला, त्यामुळे त्याची सुटका करण्यात आली.

तेव्हापासून अण्णा वैद्य एकटाच सुगाव खुर्दमध्ये तर त्याची पत्नी व मुलगा कळस येथे वास्तव्यास आहेत. आरोपी वैद्य याने अत्यंत शांत डोक्याने केलेल्या चार खुनांच्या प्रकरणातून त्याची निर्दोष मुक्तता झाल्याने सुटून आल्यानंतर गावात त्याची प्रचंड दहशत होती. कोणीही त्याच्या विरोधात बोलायला धजावत नसत. रविवारी (ता.१०) घडलेला प्रकारही दहशतीतूनच घडला होता, मात्र यावेळी त्याने अल्पवयीन मुलीच्या घरात घुसून तिला मारहाण केल्याने आणि फरफटत आपल्या घरापर्यंत नेवून तिला फाशी देवून नदीत फेकण्याची धमकी दिल्याने गावकरी संतप्त झाले.

रविवारी दुपारी एक वाजता घडलेल्या या प्रकारानंतर सायंकाळी साडेचार वाजण्याच्या सुमारास गावातील सहा ते आठ जणांनी लाठ्याकाठ्या घेवून त्याचे घर गाठले आणि त्याला जाब विचारला. यावेळी तो थातूरमातूर उत्तरे देवू लागल्याने आधीच संतप्त असलेल्या ग्रामस्थांनी त्याला मारहाण करीत त्याच्या घरातही नासधूस केली. यावेळी गावकर्‍यांनी त्याला बेदम मारहाण करीत रस्त्याच्या लगत असलेल्या चिंचेच्या झाडाजवळ आणले आणि तेथेही पुन्हा त्याला लाठ्याकाठ्यांनी आणि लाथाबुक्यांनी मारहाण केली. जवळपास आठ जणांनी मारहाण केल्याने बेशुद्ध झालेल्या आरोपी अण्णा वैद्य याला आरोग्य सेवेच्या १०८ रुग्णवाहिकेतून अकोले ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले.

याबाबतची माहिती त्याचा मुलगा प्रशांत वैद्य याला समजल्यानंतर त्याने रुग्णालयात जावून वडिलांना असे कृत्य का केले अशी विचारणा केली असता त्याने आठ जणांची नावे सांगत या सर्वांनी आपल्याला खूप मारल्याचे मुलाला सांगितले. त्या दरम्यान डॉक्टरांनी त्याला पुढील उपचारांसाठी खासगी रुग्णालयात नेण्याचा सल्ला दिल्याने सुरुवातीला अकोल्यातील एका खासगी रुग्णालयात व नंतर संगमनेरातील मेडिकव्हर रुग्णालयात त्याला आणण्यात आले. मात्र संगमनेरात पोहोचण्यापूर्वीच त्याचा मृत्यू झाला होता. त्यामुळे सोमवारी त्याचे संगमनेर येथेच शवविच्छेदन करुन मृतदेह त्याच्या मुलाकडे देण्यात आला. मोजक्या लोकांच्या व पोलिसांच्या उपस्थितीत सोमवारी सायंकाळी सुगावमध्ये त्याच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

त्यानंतर रात्री आठच्या सुमारास प्रशांत अण्णासाहेब वैद्य याने अकोले पोलीस ठाण्यात वरील आशयाची फिर्याद दाखल केली. त्यावरुन पोलिसांनी रवींद्र सूर्यभान सोनवणे, बापू दिलीप अभंग, सोमनाथ गबाजी मोरे, सागर मंगेश दिवे, दत्ता शिवराम सोनवणे यांच्यासह सुनीता रवींद्र सोनवणे, सविता गणेश वाकचौरे व स्वाती सागर दिवे अशा आठ जणांविरोधात भारतीय दंडसंहितेच्या कलम ३०२, ४५२, १४३, १४४, १४७, १४८, १४९ प्रमाणे गुन्हा दाखल करुन पहिल्या चार आरोपींना अटक केली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपअधीक्षक सोमनाथ वाघचौरे यांच्या मार्गदर्शनाखाली अकोल्याचे पोलीस निरीक्षक विजय करे करीत आहेत.

Visits: 4 Today: 1 Total: 23130

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *