नामदार साहेब संगमनेरात चाललंय काय? यंत्रणा नेमकी कोणासाठी; तरुणाचा जीव घेणारा अधिकारी मोकाटच..


नायक वृत्तसेवा, संगमनेर
राज्यातील सत्तांतरानंतर महसूलसह जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदी विराजमान झालेल्या राधाकृष्ण विखे पाटील यांनी ‘प्रशासन’ कशाला म्हणतात याची जिल्ह्याला चुणूक दाखवणार असल्याचे वक्तव्य केले होते. मात्र त्या गोष्टीला आता कितीतरी काळ उलटूनही स्वच्छ आणि पारदर्शी प्रशासनाची साधी झलकही दिसत नसल्याने पालकमंत्र्यांचे ‘ते’ वक्तव्य आता केवळ ‘वल्गना’च ठरले आहे. त्याचा प्रत्यय देणारी घटना सध्या चर्चेत असून मनमौजी आणि बेताल अधिकारी म्हणून अवघ्या तालुक्याला परिचित असलेल्या एका वैद्यकीय अधिकार्‍याला वाचवण्यासाठी अख्खी यंत्रणा झटत असल्याचे दुर्दैवी चित्र सध्या संगमनेरात बघायला मिळत आहे. या नशेबाज अधिकार्‍याने गेल्या रविवारी दोघांना उडवले होते. त्यातील एकाचा जागीच मृत्यू झाला तर दुसरा अजूनही जगण्यासाठी संघर्ष करीत आहे. या घटनेला पाच दिवस उलटूनही तालुका पोलीस मात्र दोषी अधिकार्‍यावर गुन्हा दाखल करण्यास टाळाटाळ करीत असल्याने संगमनेरची शासकीय यंत्रणा नेमकी कोणासाठी असाही प्रश्न निर्माण झाला आहे. विशेष म्हणजे ‘त्या’ वैद्यकीय अधिकार्‍याच्या वाहनाची विमा मुदतही संपल्याची माहिती मिळत असून त्याचा फटका मृतासह जखमी असलेल्या तरुणालाही बसणार आहे, मात्र ढिम्म यंत्रणेला कर्तव्याचाच विसर पडल्याने संगमनेरकर नामदार साहेबांच्या ‘आदर्श प्रशासना’चा अनुभव घेत आहेत.

गुरुपौर्णिमा उत्सवाच्या पूर्वसंध्येला रविवारी (ता.2) मद्यधुंद अवस्थेत भरधाव वेगाने कार चालविणार्‍या तालुक्याच्या आरोग्य सेवेतील एका वरिष्ठ वैद्यकीय अधिकार्‍याने कोकणगाव शिवारात दुचाकीला समोरासमोर जोरदार धडक दिली होती. हा अपघात इतका भीषण होता की धडक झाल्यानंतर दुचाकीचा अक्षरशः चेंदामेंदा होवून त्यात अमोल गजानन सानप हा तीसवर्षीय तरुण जागीच गतप्राण झाला, तर शुभम विलास ठाणेकर हा एकोणावीस वर्षीय तरुण गंभीर जखमी होवून रक्ताच्या थारोळ्यात कोसळला. वास्तविक या अपघातानंतर संबंधित अधिकार्‍याने जखमींना रुग्णालयात पोहोचवण्यासाठी प्रयत्न करणे अपेक्षित असताना ते टाळून त्याने चक्क आपल्या अपघातग्रस्त वाहनाच्या नंबर प्लेट काढण्याचा संतापजनक प्रकार करण्यास सुरुवात केली होती.

या भयंकर अपघाताच्या आवाजाने आसपासच्या नागरिकांनी तेथे धाव घेत जखमींना रुग्णालयात पोहोचवण्याचे काम केले. अपघाताचे बालंट आपल्या माथी येणार याची पूर्वकल्पना असल्याने संबंधित आरोग्य अधिकार्‍यानेही संगमनेरातील एका खासगी रुग्णालयात स्वतःला दाखल करुन घेतले. वास्तविक या घटनेनंतर एखाद् दोन दिवसांतच ‘त्या’ अधिकार्‍यावर सदोष मनुष्यवधाच्या कलम 304 (अ) नुसार गुन्हा दाखल होणे अपेक्षित होते. मात्र घटना घडून पाच दिवसांचा कालावधी लोटूनही पोलीस दप्तरी अद्यापही गुन्ह्याची नोंद नसल्याने सदरच्या अधिकार्‍याकडून पोलिसांवर आलेला दबावही स्पष्टपणे बघायला मिळत आहे.

सदरचा वैद्यकीय अधिकारी कोविड संक्रमणापासूनच चर्चेत आहे. त्या काळात जगभरात माणसं मरत असताना चक्क संगमनेरच्या उपविभागीय अधिकार्‍यांनी पकडलेल्या बोगस डॉक्टरांवर कारवाई करण्यास टाळाटाळ, शासकीय सेवेत असतांनाही बेकायदा पद्धतीने आपल्या पत्नीच्या नावाने कोविड सेंटर सुरु करण्याचा प्रताप आणि कोविड संक्रमणासाठी झालेल्या हंगामी नोकर भरतीमध्ये आपल्या सुपुत्राचे नाव घुसवून वर्षभर कमावलेला पगार आणि अन्य देयकांच्या माध्यमातून त्याने शासनीचीही फसवणूक केली. मात्र शिशुपालाहूनही अधिक कारनामे करुनही त्याच्यावर कारवाई करणारा श्रीकृष्ण मात्र अद्यापही जन्माला आला नाही.

सदरचा वैद्यकीय अधिकारी मूळचा राहाता तालुक्यातील रहिवासी आहे. त्यामुळेच स्थानिक यंत्रणा त्याच्याविरोधात कारवाईसाठी धजावत नसल्याची आजवर चर्चा होती. मात्र कोकणगाव अपघातात त्याचे थेट नाव समोर येवूनही आणि या अपघातात पोलीस दप्तरी त्याच्या वाहनाची नोंद होवूनही पोलिसांकडून कोणतीही कारवाई होत नसल्याने या मद्यपी अधिकार्‍याच्या डोक्यावर नेमके कोणाचे छत्र आहे?, जिल्ह्याला स्वच्छ आणि पारदर्शी प्रशासन दाखवण्याची घोषणा करणार्‍या पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या वक्तव्याला कोण हरताळ फासत आहे असा प्रश्न निर्माण झाला असून आता नामदार विखे यांनाच त्यांच्या ‘त्या’ वक्तव्याची आठवण करुन देण्याची वेळ आली आहे.

मद्यधुंद अवस्थेत दुचाकीला समोरासमोर धडक मारुन एकाच्या मृत्यूला तर दुसर्‍याला गंभीर जखमी करणार्‍या ‘त्या’ मद्यपी वैद्यकीय अधिकार्‍याच्या अपघातग्रस्त वाहनाची विमा मुदत संपुष्टात आल्याची माहिती दैनिक नायकला मिळाली आहे. असे असेल तर त्याने घडवलेल्या या अपघातात जीव गमावलेल्या तरुणासह जखमी तरुणाला वाचवण्यासाठी शर्थ करणार्‍या त्याच्या कुटुंबाला या गोष्टीचा आर्थिक फटका बसणार आहे. पोलिसांच्या मनातील माणूस जीवंत असल्यास त्यांनीच आता पुढाकार घेण्याची गरज आहे, अन्यथा हा सगळा प्रकार थेट मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांपर्यत पोहोचवण्यासाठी शहरातील तरुणांचा एक गट सक्रीय झाला आहे.

Visits: 119 Today: 1 Total: 1106855

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *