देशाला महासत्ता होण्यापासून कोणीही रोखू शकत नाही – कर्नल सिन्हा! कवी अनंत फंदी व्याख्यानमाला; देशाच्या संपन्नतेची माहिती श्रवतांना रसिक हरपले..
संगमनेर, प्रतिनिधी
आपल्या देशात तरुणांची सर्वाधीक संख्या असल्याने भारत जगातील सर्वात तरुण देश आहे. तरुणांच्या ऊर्जेचा योग्य वापर केल्यास त्यातून खर्याअर्थी देशाचा संपूर्ण विकास साधला जावू शकतो. गेल्याकाही वर्षात भारताने साधलेली प्रगती थक्क करणारी असून जागतिक पातळीवर देशाचा दबदबा वाढला आहे. भारताने व्यक्त केलेल्या मताची आजच्या महासत्तांनाही दखल घ्यावी लागणं हे देश महाशक्तिशाली होण्याच्या दिशेने जात असल्याचे द्योतक आहे. आज जगातील पाचवी अर्थव्यवस्था असलेला आपला देश पुढील पंचवीस वर्षात जगाची महासत्ता बनल्याशिवाय राहणार नाही असा विश्वास भारतीय लष्करातील कर्नल मनोज सिन्हा यांनी व्यक्त केला.
शनिवारी कवी अनंत फंदी व्याख्यानमालेच्या पाचव्या दिवसाचे पुष्प गुंफतांना ते ‘भारत भाग्यविधाता’ या विषयावरील आपल्या व्याख्यानात बोलत होते. शिक्षण प्रसारक संस्थेचे (संगमनेर कॉलेज) चेअरमन डॉ.संजय मालपाणी आजच्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. कवी अनंत फंदी प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रा.ओंकार बिहाणी, प्रकल्प प्रमुख राजेश मालपाणी, उपाध्यक्ष अरुण ताजणे व सचिव जसपाल डंग आदी मंचावर उपस्थित होते.
यावेळी आपल्या व्याख्यानात पुढे बोलतांना कर्नल सिन्हा म्हणाले की, जगातील अनेक महाशक्ती देश आपल्या देशाच्या प्रगतीत अडसर निर्माण करण्याचा सतत प्रयत्न करीत असतात. अशावेळी तरुण पिढीने त्वेषाने पेटून या महाशक्तींना धडा शिकवण्याचे आवाहन त्यांनी केले. आपल्या देशाकडे कोणी वाईट नजरेने पाहत असेल तर त्याचे जागेवर डोळे काढून घेण्याची हिंमत अपाल्या नसांत असली पाहिजे. शेजारच्या देशातील दहशतवादी संघटना आपला देश अस्थिर करुन त्याचे तुकडे करण्याचे मनसुबे बाळगून आहेत. मात्र असा मनसुबा बाळगून हातात हत्यार घेणार्यांना कंटस्नान घालण्यासाठी भारतीय लष्कर सछेव सज्जच असल्याचे ते यावेळी म्हणाले.
आता देशाची प्रत्युत्तर देण्याची धोंरणं पूर्णतः बदलली असल्याचे सांगत त्यांनी ‘सर्जिकल स्ट्राईक’ आणि ‘एअर स्ट्रईक’बाबत भाष्य केले. जगातील अनेक देश आजही आपल्या देशाविरोधात आंतरराष्ट्रीय षडयंत्र रचण्याचे उद्योग करीत आहेत. मात्र त्यातून कोणी भारताच्या महाशक्ती होण्याच्या मार्गात अडथळा आणील असे कोणाला वाटत असेल तर तो त्यांचा भ्रम ठरेल असा विश्वास व्यक्त करतांना त्यांनी देशाने महाशक्ती होण्याचे लक्ष्य गाठल्यानंतरही देशाला अडचणीत आणू पाहणार्यांची संख्या घटणार नाही, त्यामुळे सजग नागरीक म्हणून आपण अखंड सावधानता बाळगण्याचे आवाहनही त्यांनी यावेळी केले.
राजकारण मानव कल्याणाच्या धर्मावर आधारीत असते. आज मात्र देशातील राजकारणाने निचांकी गाठली आहे. राजकारण स्वच्छ करायचे असेल तर चांगल्या मनाच्या आणि विचारांच्या लोकांनी राजाकरणात येण्याची गरज त्यांनी व्यक्त केली. समाजासाठी, राष्ट्रासाठी राजकारणाचा भाव आज जवळपास संपला असून केवळ मनातील आशा आणि आकांक्षा पूर्ण करण्याच्या स्वार्थातूनच राजकारण केले जाते. आजच्या विद्यार्थीदशेतील तरुणांनी आजपासूनच राजकारणाचे धडे गिरवल्यास भविष्यात देशाचे राजकारण नितळ झाल्याशिवाय राहणार नाही असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.
आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ.संजय मालपाणी यांनी कर्नल मनोज सिन्हा यांचा अतिरेक्यांशी लढतांना कसा पुनर्जन्म झाला यामागचा थरार उपस्थितांना सांगितला. आज आपल्या देशासमोर असंख्य प्रश्न आ वासून उभे आहेत. मात्र त्यांची उत्तरे आपल्याकडे नाहीत, ती मिळवायची असतील तर कर्नल सिन्हा यांच्यासमोर बसायला हवे असे सांगत डॉ.मालपाणी यांनी कर्नल सिन्हा यांच्या पराक्रमी कारकीर्दीवर झोत टाकला. प्रत्यक्ष सिमेवर अतिरेक्यांशी लढतांनाचे प्रसंग आणि त्यातील हिरो आपल्या समोर असल्याचे पाहून उपस्थित श्रोतेही देशप्रेमाने भारावले होते. आजच्या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन अॅड.प्रदीप मालपाणी यांनी केले.