समशेरपूरचे वैद्यकीय अधिकारी चक्क रांगत आले कर्तव्यावर! संतापजनक प्रकार; अपघातात जखमी झालेला तरुण उपचाराविना अर्धातास पडून

नायक वृत्तसेवा, संगमनेर
सर्वसामान्य माणसांना सुलभ उपचार मिळावेत यासाठी जिल्हा परिषद व शासनाच्या माध्यमातून गावपातळीवर ग्रामीण रुग्णालये व प्राथमिक आरोग्य केंद्रांची रचना केली गेली. मात्र संगमनेर-अकोले तालुक्यातील काही आरोग्य केंद्रात अनागोंदी आणि गैरप्रकार घडत असल्याचे वारंवार समोर येवूनही कोणतीही कारवाई होत नसताना आता अकोले तालुक्यातील समशेरपूर येथील ग्रामीण रुग्णालयातून अत्यंत धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या केंद्रात हजर राहून सर्वसामान्यांच्या आरोग्याची जबाबदारी सोपवलेले वैद्यकीय अधिकारीच गुरुवारी चक्क मद्यधुंद अवस्थेत कर्तव्यावर रांगत आल्याने हा विचित्र प्रकार पाहून समशेरपूरमध्ये संताप उसळला असून या मद्यपी अधिकार्यावर तत्काळ कारवाईची मागणीही करण्यात आली आहे.

सर्वसामान्य नागरिकांना मोफत उपचार मिळावेत यासाठी राज्य सरकारने अगदी गावपातळीवर रुग्णालय व प्राथमिक आरोग्य केंद्रांची निर्मिती केली. त्यानुसार अकोले तालुक्यातील आढळा खोर्यात सर्वात मोठी बाजारपेठ समजल्या जाणार्या आणि आसपासच्या असंख्य गावांचे मध्यवर्ती ठिकाण समजल्या जाणार्या समशेरपूर येथे ग्रामीण रुग्णालयाची निर्मिती करण्यात आली. या रुग्णालयाचा आसपासच्या सर्वसामान्य नागरिक व शेतकर्यांना चांगला फायदा होत असताना आता एका वैद्यकीय अधिकार्याच्या मनमानी आणि गैरकारभारामुळे या रुग्णालयाची अवस्था ‘गंभीर’ बनली आहे.

यापूर्वीही अनेकांच्या तक्रारी असलेले या रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. श्रीराज आडभाई यांनी गुरुवारी (ता.13) तर कहरच केला. हा अधिकारी दिवसाढवळ्या चक्क दारुच्या नशेत झिंगून रांगत रांगतच रुग्णालयात कर्तव्यावर हजर झाला आणि कार्यस्थळी पोहोचताच त्याने आरोग्य कर्मचारी व गोरगरीब रुग्णांना अपशब्द वापरुन रुग्णालयच आजारी केले. हा प्रकार पाहून तेथील कर्मचार्यांसह रुग्णांचाही पारा चढला. मात्र वरीष्ठ अधिकारी असल्याने त्यांचाही नाईलाज झाला.

यावेळी रुग्णालयात उपचारासाठी आलेल्या रुग्णांची व त्यांच्या नातेवाईकांची मोठी गर्दी होती. मात्र त्याच्याशी काहीएक घेणंदेणं नसल्याने या तळीराम वैद्यकीय अधिकार्याने एका रुग्णाच्या नातेवाईकाला चक्क सलाईनच्या नळीने बांधून टाकण्याची अजब सूचना सहकारी महिलेला केली. वरीष्ठ अधिकार्याचा हा बेकायदा आदेश ऐकूण ‘त्या’ महिला कर्मचार्याला धक्का बसण्यासोबतच तेथे असलेल्या अन्य रुग्ण व नातेवाईकांचा संताप अनावर झाला. याबाबतची माहिती मिळताच सामाजिक कार्यकर्ते संदीप दराडे यांनी आपल्या सहकार्यांसह रुग्णालयात धाव घेतली. यावेळी डॉ. आडभाई त्यांच्या कक्षात मद्यधुंद अवस्थेत टेबलवरच पाय पसरुन निद्रीस्त झाल्याचे भयानक दृष्य त्यांना दिसले. हा प्रकार पाहून तेथे मोठ्या संख्येने जमलेल्या नागरिकांचा संताप उसळू लागल्याने पुढील अनर्थ टाळण्यासाठी दराडे यांनी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. संजय घोगरे यांच्याशी संपर्क साधून सदरचा धक्कादायक प्रकार त्यांना कळविला. त्यावर आपण तत्काळ चौकशी करुन संबंधितांवर कारवाई करणार असल्याची ग्वाही त्यांनी दिली. मात्र अद्यापपर्यंत कोणतीही कारवाई झाल्याची माहिती प्राप्त झालेली नाही. या प्रकाराने समशेरपूरमधून मात्र संताप व्यक्त होत असून संबंधित मद्यपी अधिकार्यावर कारवाई न झाल्यास आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे.

राज्यात रुग्णांच्या सेवेला ईश्वर सेवा मानून हजारो वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी रुग्णसेवा करीत आहेत. अशा स्थितीत अकोल्यासारख्या दुर्गम तालुक्यातील ग्रामीण रुग्णालयातून समोर आलेला हा प्रकार अतिशय धक्कादायक आणि संताप आणणारा आहे. डॉ. श्रीराज आडभाई या मद्यधुंद वैद्यकीय अधिकार्याचा रुग्णालयात धिंगाणा सुरु असतानाच अपघातात जखमी झालेल्या एका तरुणाला उपचारार्थ रुग्णालयात आण्णयात आले होते. मात्र या अधिकार्याच्या गोंधळामुळे जवळपास अर्धातास त्याच्यावर कोणतेही उपचार होवू शकले नाहीत. त्यांच्या या कृतीतून त्या तरुणाचा जीव जाण्याचीही शक्यता निर्माण झाली होती. हा प्रकार पाहून संबंधित अधिकार्याला बडतर्फ करण्याची मागणी जोर धरीत आहे.
