… अन् पोलिसी खाक्या पडताच पोपटासारखा बोलू लागला! राहुरीतील कांदा चोरी प्रकरण; फिर्यादीच निघाला आरोपी

नायक वृत्तसेवा, राहुरी
रस्त्याने जात असताना कापूराई देवी फाटा येथे पाठीमागून दुचाकीवर आलेल्या तीन जणांनी वाहन अडविले. खाली उतरवून मारहाण केली. धारदार शस्त्राने जखमी केले. खिशातील रोकड काढून नेली अशी फिर्याद त्याने नोंदवली पण स्वतःच्या वक्तव्यावर ठाम राहू शकला नाही, अन् पोलिसी खाक्या पडताच पोपटासारखा बोलू लागला.

नितीन भास्कर अंत्रे (वय 28, रा. अनापवाडी) असे आरोपीचे नाव आहे. अनाप याने राहुरी पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे, की 29 नोव्हेंबर रोजी रात्री आठच्या सुमारास आपण राहुरी-अनापवाडी रस्त्याने जात असताना कापूराई देवी फाटा येथे पाठीमागून दुचाकीवर आलेल्या तीन जणांनी वाहन अडविले. खाली उतरवून मारहाण केली. धारदार शस्त्राने जखमी केले. खिशातील 32 हजार 230 रुपये व आधार कार्डची कलर झेरॉक्स काढून नेली. चालकाने राहुरी पोलीस ठाण्यात फिर्याद नोंदवली होती. मात्र, पोलिसांना फिर्यादीच्या वागण्यात विसंगती आढळल्याने त्यांनी त्यास पोलिसी खाक्या दाखविल्यावर त्याने लुटीचा बनाव केल्याचे सांगितले.

पोलीस उपनिरीक्षक सोपान गोरे, हवालदार मनोज गोसावी, रणजीत जाधव, शिवाजी ढाकणे, जालिंदर माने, रोहिदास नवगिरे यांच्या पथकाने गुरुवारी (ता.30) घटनास्थळी पंचनामा करून फिर्यादीची कसून चौकशी केली. त्यात विसंगती आढळून आली. अंत्रे याने दोन शेतकर्यांचा कांदा टेम्पोतून मार्केटमध्ये विक्रीसाठी नेला होता. शेतकर्यांची कांद्याची पट्टी हडप करण्याच्या उद्देशाने 32 हजारांच्या लुटीचा बनाव त्याने केल्याचे चौकशीत समोर आले. फिर्यादी हाच आरोपी असल्याचे तपासात पुढे आले. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने आरोपीला राहुरी पोलिसांच्या ताब्यात दिले.

नितीन अंत्रे याने खोटी फिर्याद दाखल केल्याचे तपासात उघड झाले आहे. न्यायालयाच्या परवानगीने त्याच्यावर पुढील कारवाई करण्यात येणार आहे.
– नाना सूर्यवंशी (पोलीस उपनिरीक्षक)
